बारामतीत काका-पुतण्यांनी भरला अर्ज! शरद पवार विरुद्ध अजित पवारांच्या संघर्षात कुणाचा विजय होणार?

    28-Oct-2024
Total Views |
 
 Sharad Pawar vs Ajit Pawar
 
पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघाकडे केवळ राज्याचं नाहीतर देशाचे लक्ष लागले आहे. काका विरूद्ध पुतण्या अशी टफ फाईट होणार असल्याच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. बारामतीत दि: २८ ऑक्टोबर रोजी अजित पवार आणि शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत दिसणार आहे.
 
काही महिन्यांआधी बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भाऊजय अशी लढत होती. अर्थातच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या.
 
आता याच मतदारसंघात अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार यांच्यात चुरशीची लढत होईल. दरम्यान लोकसभा निवडणुकीवेळी बारामतीकरांनी लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला अजितदादांना निवडून देऊ असे समीकरण स्वत:हूनच तयार केले होते.
 
बारामतीचा विकास पाहता अजित पवार यांचे नाव अग्रेसर आहे. तर दुसऱ्या बाजूला युगेंद्र पवार हे राजकारणात नवोदित असल्याने अजित पवारांच्या तुलनेत त्यांचा राजकीय अनुभव कमी आहे. मात्र युगेंद्र पवार हा एक चेहरा असला तरीही त्यामागे शरद पवारांचे नेतृत्व असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघातील भावी आमदारावर आताच भाष्य करता येणार नाही.
 
मात्र अजित पवार यांचे काम पाहता बारामती मतदारसंघातील मतदार हे अजित पवारांना साथ देतील अशी शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही उमेदवार हे एकाच घरातील असल्याने मतदारांच्या मनात थोडाफार संभ्रम परिस्थिती आहे. मात्र दीड ते दोन लाख मतांनी विजयी होणाऱ्या अजित पवारांचा यंदाचा स्कोअर घसरू शकतो.