मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देणार का? खासदार नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
02-Jul-2025
Total Views | 27
मुंबई : एवढे प्रेम उतू येत आहे तर उद्धव ठाकरे मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देतील का? असा खोचक सवाल खासदार नारायण राणे यांनी बुधवार, २ जुलै रोजी केला. विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या यूतीबाबत भाष्य केले.
खासदार नारायण राणे म्हणाले की, "राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडण्यास उद्धव ठाकरे कारणीभूत आहे. पक्षात असताना त्यांनी राज ठाकरेंना प्रचंड छळले. त्यामुळेच त्यांनी शिवसेना सोडली. तेच उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंच्या स्वागताला तयार आहे. उद्धव ठाकरेंनी इतकी वर्षे भावाचे नाते जपले नाही. त्यांनी कुटुंब म्हणून किती जणांना जवळ केले? ठाकरे कुटुंबांबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण राज ठाकरेंना घराबाहेर जायला उद्धव ठाकरेंनी प्रवृत्त केले. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनीच त्रिभाषा सूत्रीचा प्रस्ताव मंजूर केला. देवेंद्र फडणवीस यांनी आता तो प्रस्ताव रद्द केला. आता ५ तारखेला मेळावा भरवून ठाकरे विजयोत्सव साजरा करणार आहेत. स्वत:मध्ये कर्तृत्व नसल्याने नको त्या विषयाचे श्रेय घेण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे," अशी टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरेंची शिवसेना बनावट!
"राज ठाकरेंनी शिवसेनेत यावे, असे उद्धव ठाकरे कधीच म्हणू शकत नाही. कारण राज ठाकरे शिवसेनेत आल्यास तेच प्रमुख राहतील. उद्धव ठाकरे नगण्य होतील. त्यामुळे ते त्यांना स्वत:हून बोलवणार नाहीत. बाळासाहेबांनी ४८ वर्षांत जे मिळवले ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात साफ करुन टाकले. त्यामुळे आता शिवसेना राहिलीच नाही. शिवसेना आता एकनाथ शिंदेंचीच आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना बनावट आहे. एवढे प्रेम उतू येत असल्यास उद्धव ठाकरे मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देतील का? दोन भाऊ काय सगळे भाऊ एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्या महायूतीतील तिन्ही पक्षांकडे आज २३५ आमदार आहे. त्यामुळे आम्हाला चिंता नाही," असेही ते म्हणाले. मराठी माणसासाठी काय केले?
"उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी, मराठी तरुणांच्या रोजगारासाठी काय केले? आज मुंबईत फक्त १८ टक्के मराठी उरलेत. १९६० साली ते ६० टक्के इतके होते. याला जबाबदार कोण? मराठी आणि हिंदुत्वावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी काहीही केले नाही. त्यांना आता मराठीचा पुळका आला आहे. मग मुलांना इंग्लिश मीडियममध्ये का शिकवले? मुलाला बॉम्बे स्कॉटिशमध्ये का पाठवले?" असा सवालही नारायण राणे यांनी केला.