राज ठाकरेंनी शिवसेनेत यावं असं उद्धव ठाकरे कधीच म्हणणार नाहीत, कारण...; काय म्हणाले नारायण राणे?
02-Jul-2025
Total Views | 23
मुंबई : राज ठाकरेंनी शिवसेनेत यावे, असे उद्धव ठाकरे कधीच म्हणू शकत नाही. कारण राज ठाकरे शिवसेनेत आल्यास तेच प्रमुख राहतील, असे विधान खासदार नारायण राणे यांनी बुधवार, २ जुलै रोजी केले. विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या यूतीबाबत भाष्य केले.
खासदार नारायण राणे म्हणाले की, "राज ठाकरेंनी शिवसेनेत यावे, असे उद्धव ठाकरे कधीच म्हणू शकत नाही. कारण राज ठाकरे शिवसेनेत आल्यास तेच प्रमुख राहतील. उद्धव ठाकरे नगण्य होतील. त्यामुळे ते त्यांना स्वत:हून बोलवणार नाहीत. बाळासाहेबांनी ४८ वर्षांत जे मिळवले ते उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात साफ करुन टाकले. त्यामुळे आता शिवसेना राहिलीच नाही. शिवसेना आता एकनाथ शिंदेंचीच आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना बनावट आहे. एवढे प्रेम उतू येत असल्यास उद्धव ठाकरे मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देतील का?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडण्यास उद्धव ठाकरे कारणीभूत आहे. पक्षात असताना त्यांनी राज ठाकरेंना प्रचंड छळले. त्यामुळेच त्यांनी शिवसेना सोडली. तेच उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंच्या स्वागताला तयार आहे. उद्धव ठाकरेंनी इतकी वर्षे भावाचे नाते जपले नाही. त्यांनी कुटुंब म्हणून किती जणांना जवळ केले?" असाही सवाल नारायण राणे यांनी केला.