
मुंबई : आषाढी वारीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, या वारीत शहरी नक्षलींचा शिरकाव झाल्याची धक्कादायक माहिती शिवसेना आ. मनिषा कायंदे यांनी बुधवार, दि. २ जुलै रोजी विधान परिषदेत दिली. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, राज्य सरकार या प्रकरणाची दखल घेत योग्य कारवाई करेल, असे आश्वासन दिले.
विधान परिषदेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मुद्दा मांडताना मनीषा कायंदे म्हणाल्या की, आषाढी वारीमध्ये देवाला न मानणाऱ्या नास्तिक लोकांचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झालेला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण हे शहरी नक्षलवादी संविधान दिंडी, पर्यावरण वारी आणि लोकायत यासारख्या वेगवेगळ्या नावाखाली वारीमध्ये जाऊन पथनाट्य करतात, भाषणे करतात आणि लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे. हे विधेयक अशा व्यक्तींना अटकाव करण्यासाठी आहे.
यापूर्वी काही जणांकडून वारीवर मटणाचे तुकडे फेकण्याचा प्रकार घडला होता. बंडातात्या कराडकर यांनीही या प्रकारावर सविस्तर भाष्य केले आहे. तसेच या सर्व प्रकारावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. तसेच दोन दिवसांमध्ये आषाढी एकादशी येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर सरकारने तातडीने गंभीर कारवाई करावी, अशी मागणी मनीषा कायंदे यांनी विधान परिषद सभागृहात केली. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, राज्य सरकार या प्रकरणाची दखल घेत योग्य कारवाई करेल, असे आश्वासन दिले.