तबलावादनात विशेष कौशल्य प्राप्त करणारा आणि संगीत क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा नाशिकचा युवा तबलावादक गौरव तेजाळे याच्याविषयी...
लहानपणापासून कानावर संगीताचे सुमधूर सूर पडल्यामुळे आपसुकच गौरवचा संगीताचा कान तयार झाला. जसजसे वय आणि समजही वाढत गेली, तसतसे संगीत मैफिलींमध्ये गौरवचे मन रमू लागले आणि त्याला संगीताविषयी अधिकच आकर्षण निर्माण झाले.
गौरवचे आजोबा आणि पणजोबा भजन- कीर्तन करायचे. त्यामुळे गौरवच्या रक्तातच संगीत भिनलेले. नंतर वडिलांना त्यांच्या वाढत्या कामकाजामुळे संगीतात पूर्णपणे एकरूप होता आले नाही. पण, त्यांनी त्यांचे स्वप्न आणि आवड गौरवमार्फत पूर्ण करून घेतली. गौरव अवघा १५ वर्षांचा असताना त्याला संगीत क्षेत्र खुणावू लागले. संगीत हेच आपलं सर्वस्व आहे, ही जाणीव त्याला सदैव होत असे. म्हणूनच आता संगीत क्षेत्रातच करिअर करावे, असे गौरवला मनोमन वाटू लागले.
सातवीत असताना गौरवच्या घराशेजारीच संगीत शिकवले जात असे. गौरव तिथे केवळ उत्सुकता म्हणून जात असे. पुढे ही आवड आणि या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी त्याला खुणावू लागल्याने संगीत क्षेत्रालाच वाहून घेण्याचे त्याने मनाशी पक्के ठरविले. यातून वाशी येथील गांधर्व महाविद्यालय व पुणे विद्यापीठातून संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. आपली आवडती गोष्ट करता येणे, त्यातच आपली ओळख निर्माण होणे आणि तेच आपल्या उपजीविकेचे साधनही असणे, ही आनंद देणारी गोष्ट असते, असे गौरव सांगतो.
आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे व मानसिकदृष्ट्याही समाधानी असणे, असा दुहेरी समतोल साधणे ही तसे अवघडच. मात्र, या दोन्ही बाजूचा उत्तम समतोल गौरवने साधला. त्यात अजून पुढचा बराच पल्ला गौरवला गाठायचा होता. २०१५ मध्ये ‘शिवगौरव म्युझिक अकॅडमी’ची गौरवने स्थापना केली. येथे पाच वर्षांपासून पुढे सर्व वयोगटातील १०० पेक्षा अधिक मुले-मुली त्याच्याकडे वाद्य शिकण्यासाठी येतात.
गौरवने शास्त्रीय संगीताचे शिक्षण नितीन भानुदास पवार यांच्याकडून, तर पंडित मुकुंदराज देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. उस्ताद तौफिक कुरेशी यांच्याकडून एकलव्याप्रमाणे शास्त्रीय संगीत आत्मसात केल्याचे गौरव सांगतो. ‘पाडवा पहाट’, कालिदास कलामंदिरात झालेला ‘तेलाचे गाणे’, ‘औंदा लगीन करायचं’, ‘विठाबाईचा कावळा’, ‘राजदंड’ यांसारखी मराठी नाटके आणि कित्येक शास्त्रीय संगीत मैफिलींमध्ये गौरवने साथ दिली आहे. यासाठी गौरवला ‘वामनदादा कर्डक पुरस्कार’, ‘कला गौरव पुरस्कार’, ‘भानुदास पवार पुरस्कार’, ‘कार्यगौरव पुरस्कार’, जलसंपदा विभागाचा पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कोणतीही कला असो, गौरव त्याकडे एक कला म्हणूनच पाहतो. ती कला आत्मसात करण्यासाठी त्या कलेला सर्वस्व वाहून घेणे गरजेचे असल्याचे त्याचे म्हणणे. संगीताचा मूळ गाभा हा शास्त्रीय संगीतातूनच उदयाला आला आहे. आज ‘इन्स्टा रील्स’ आणि युट्यूबसारख्या माध्यमातून संगीताची जाण नसलेले लोकही रातोरात ‘व्हायरल’ होतात. मात्र, ही प्रसिद्धी अगदी क्षणिक असते. एखाद्या कलेसाठी केलेली साधना, तपश्चर्या ही आयुष्यभराचा उत्तरोत्तर समृद्ध करत जाणारा अनुभव असतो, असे गौरवला वाटते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीरस्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ हे ‘म्युझिक थेरपी’चा पर्याय सुचवतात.
शास्त्रीय संगीतातील अनेक प्रकारचे राग हे यासाठी उपयोगी पडतात. उदा. अनेकदा निरुत्साहीवाटणे, थकवा येणे, अशा समस्या वाढीस लागल्यानंतर राग जयजयवंतीवरील गाणी ‘मोहब्बत की राहों मे चलना संभल के’ (उड़न खटोला), ‘मनमोहना बड़े झूठे’ (सीमा), तर अॅसिडिटीवर उपाय म्हणून राग खमाजवर आधारित असलेली गाणी ‘छू कर मेरे मन को’ (याराना), ‘तुम कमसीन हो नादान हो’ (आई मिलन की बेला), ‘तकदीर का फसाना जाकर किसे सुनाएं’ (सेहरा), अशी गाणी ऐकल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होतो, असे गौरव सांगतो. शास्त्रीय संगीतातील राग दुर्गा आत्मविश्वास वाढविण्यासाठी, राग यमन कार्यशक्ती वाढविण्यासाठी, राग देसकार संतुलन साधण्यासाठी, राग बिलावल आध्यात्मिक उन्नतीसाठी, राग हंसध्वनी सत्य-असत्याची जाणीव करून देण्यासाठी, राग अहिर भैरव-आध्यात्मिक उन्नती वाढीस लागण्यासाठी अमलात आणले जातात.
कोरोना काळात गौरवची म्युझिक अकॅडमी बंदच होती. सांस्कृतिक कार्यक्रमही ठप्प असल्याने एक कलाकार म्हणून गौरवलाही साहजिकच प्रचंड त्रास झाला. यावर उपाय म्हणून ऑनलाईन क्लास, सोशल मीडियाच्या माध्यमातून वाद्य सराव त्याने सुरू ठेवला. कोरोना काळात उत्तम संगीताचे आणि ताल-सुराचे महत्त्व अधिकच वाढले,असेही गौरव अधोरेखित करतो.
“भविष्यात मला शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार परदेशातही करायचा आहे. स्वतःला अधिकाधिक उत्तम कलाकार म्हणून घडवायचे आहे. त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. कलेची अविरत सेवा करणे, एक प्रसिद्ध आणि गुणी तबलावादक होणे, हेच माझे स्वप्न,” असे गौरव सांगतो. गौरवला या सुरेल स्वप्नपूर्तीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
गौरव परदेशी
८६०५७६८३६६