औरंगजेब क्रूरकर्माच!

    25-May-2023   
Total Views |
Aurangzeb Wasn't Cruel Mosque Committee Told Court

“औरंगजेब क्रूर नव्हता. त्याने ज्ञानव्यापी मंदिर उद्ध्वस्त केले नाही,” असा अजब दावा संबंधित मशीद कमिटीने केला आहे. आता ही मशिद समिती इतिहासकार आहे की समाजअभ्यासकी किंवा कायदेतज्ज्ञ की पुरातत्व विभागाशी संबंधित आहे? तर नाही. तरीसुद्धा ते ‘औरंगजेब हा क्रूर नव्हता’ हे सर्टिफिकेट का देत आहेत? आता काही लोक म्हणतात की, औरंगजेब क्रूर नव्हता. हे म्हणणार्‍यांचे पूर्वज तपासायला हवेत. या सगळ्यांचे पूर्वज काही फार जिथे मुस्लीम पंथांची निर्मिती झाली तिथून आलेले असतील का? ते पूर्वज किंवा त्यांच्या समकालीन लोकांचे औरंगजेबावर किंवा त्यांच्यापूर्वीच्या मुस्लीम हिंसक आक्रमणकर्त्यांवर खूप प्रेम आणि स्नेह होता म्हणून ते धर्मांतरित झाले का? या मशीद कमिटीच्या सदस्यांनी औरंगजेब क्रूर नव्हता, हा इतिहास शोधून काढताना पूर्वजांनी इस्लाम का स्वीकारला, याचा इतिहास शोधला, तर औरंगजेब किती दयाळू आणि मानवतावादी सहिष्णू होता, याचे उत्तर त्यांना मिळेल! औरंगजेबासंदर्भात ‘मासिर-ए-आलमगिर’ या पुस्तकाची मूळ पांडू लिपीमधील प्रत सध्या कोलकाताच्या एशियाटिक सोसायटीमध्ये उपलब्ध आहे. ‘मासिर- ए-आलमगिर’मध्ये लिहिलेले आहे की, दि. ८ एप्रिल, १६६९ रोजी औरंगजेबने काशिविश्वनाथ मंदिर तोडण्याचे फर्मान काढले. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी दि. २ सप्टेंबर, १६६९ रोजी औरंगजेबाला निरोप आला की, काशिविश्वनाथ मंदिर तोडले आहे. त्यावरच ज्ञानव्यापी मशिदीचे घुमट बांधले. औरंगजेब नुसते मंदिर उद्ध्वस्त करून थांबला नाही, तर त्याने तिथे मशीद बांधली. दुःख वाटते की, तत्कालीन मंदिरातले पवित्र शिवलिंग वर्तमानकाळात कुठे सापडले, तर ज्ञानव्यापी मशिदीमध्ये नमाज करण्यापूर्वी मुस्लीम हातपाय धुवायचे तिथे? हिंदूंच्या श्रद्धास्थानाची इतकी भयानक क्रूर अवहेलना करणारा औरंगजेब हा क्रूर नव्हता? औरंगजेब हा क्रूर नव्हता, याचे कितीही सर्टिफिकेट त्यांनी दिले तरीसुद्धा तो कसा क्रूर, धर्मांध होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुरतेपुढे त्याने कशी नांगी टाकली होती, त्याची कबर या महाराष्ट्राच्या भूमीत कशी बांधली गेली, हा इतिहास करोडो भारतीयांना माहिती आहे. असो. जोपर्यंत या जगात शेवटचा हिंदू जीवंत असेल, तोपर्यंत औरंगजेब किती क्रूर आणि धर्मांध होता, याचा इतिहास जीवंत राहणारच!

टिपूची काँग्रेसी टोळी!

कर्नाटकचे काँग्रेसचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी कुठे गेले असतील? कोणत्या शिवमंदिरात? संत बसवेश्वरांचा आशीर्वाद घ्यायला गेले का? छे छे, काँग्रेसच्या या बहुचर्चित उपमुख्यमंत्र्यांना आणि काँग्रेसच्या कर्नाटक प्रदेशाध्यक्षाने आशीर्वाद घेतला खरा. मात्र, तो टिपू सुलतानच्या थडग्याचा!!! टिपू सुलतान हा डी. के. शिवकुमार यांचा कोण लागतो? पूर्वज आहे की त्याचे आणि शिवकुमार यांचे काही लपूनछपून नाते आहे? काही कळत नाही! मात्र, टिपू सुलतानचा आशीर्वाद घेऊन शिवकुमार आता कामाला सुरुवात करत आहेत. कुणी कुणाचे किती लांगूलचालन करावे, अगदी समजेल अशा भाषेत किती कुणाचे पाय चाटावेत, थुंकी झेलावी, हा ज्याचा-त्याचा विषय असला, तरीसुद्धा आपल्याच समाजावर, आपल्याच पूर्वजांवर अत्याचार करणार्‍यांना डोक्यावर बसवणार्‍यांना काय म्हणावे? टिपूची कारकिर्द कुणी मिरवावी? भूतकाळात टिपूच्या अत्याचाराने नरकयातना भोगणार्‍या हिंदूंनी? इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, टिपूने हिंदूंचे क्रूरपणे धर्मांतर केले. त्याने ज्या काही लढाया लढल्या, त्या केवळ त्याची सत्ता अबाधित राहावी म्हणून! त्यात देशप्रेम किंवा जनतेचे कल्याण वगैरे काही नव्हते. मग हा असा टिपू काँग्रेसला वंदनीय का? ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अवघं आयुष्य मातृभूमीसाठी पणाला लावलं, अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगून नरकवास भोगला, त्या स्वातंत्र्यवीरांबाबत काँग्रेसचे राहुल गांधी असोत की त्यांचे नेते आणि अपवाद वगळता कार्यकर्ते सगळेच स्वातंत्र्यविरांविरोधात आक्षेपार्ह विधान करतात. (नंतर माफी मागतात, ही गोष्ट वेगळी!) कर्नाटकातला विजय केवळ मुस्लीम मतांमुळे मिळाला, असे काहीसे समीकरण सूत्र काँग्रेसचे आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे टिपूच्या थडग्यावर कपाळ आपटून आशीर्वाद घेतला, तर हे मतदार खूश होतील असे, तर शिवकुमारला वाटेल असेल, तर त्यात नवल ते काय! रामसेतू आणि प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मभूमीबद्दल, त्यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारणारे टिपूसारख्यालाच पूजणाार! अगदी उद्या महाराष्ट्रात हे असे लोक सत्तेत आले, तर औरंग्याच्या कबरीवर कुर्निसात करायलाही सरसावतील. दुर्दैव, दुसरे काय?


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.