धन्य रे बाळा! तुझा जन्म आज! वैदिक षोडश संस्कार (जातकर्म संस्कार)

    24-May-2023
Total Views |
Vedic Shodasha Sanskar

प्र ते ददामि मधुनो घृतस्य,
वेदं सवित्रा प्रसूभतं मघोनाम्।
आयुष्यमान् गुप्तो देवताभि:
शतं जीव शरदो लोके अस्मिन्॥
(आश्वलायन गृह्यसूत्र - १/१५/१)

अन्वयार्थ

पिता आपल्या नवजात बाळाला म्हणतो- “अरे बाळा! मी (ते) तुझ्यासाठी (मधुनो घृतस्य) मध आणि तुपाचे थेंब (प्र ददामि) चांगल्या प्रकारे प्रदान करत आहे. मध व तूप या दोन्हींना (मघोनाम्) धन-संपत्तींच्या (सवित्रा) निर्मात्याने (प्रसूतम्) उत्पन्न केले आहे, (वेद) ही गोष्ट तू चांगल्या प्रकारे जाणून घे. (देवताभि:) देवतांच्या द्वारे (गुप्त:) रक्षिला जाणारा तू (अस्मिन् लोके) या पृथ्वीलोकावर (शतं शरद:) १०० वर्षांपर्यंत (जीव) जगत राहा!

विवेचन

प्राणी कोणताही असो, जन्म ही त्यासाठी एक नैसर्गिक व अनिवार्य प्रक्रिया आहे. विशिष्ट कालावधी पूर्ण करून आईच्या उदरातून बाहेर येणे हे बाळासाठी आवश्यक असते. यालाच या विश्वात ‘प्रवेशणे’ असे म्हणतात. आजपर्यंत मातेची गर्भस्थळी हेच त्या शिशुचे जग होते. पण, नवी दुनियादारी पाहण्यासाठी त्याला या धरणीवर पाऊल त्याला ठेवावे लागते. याच प्रक्रियेला ‘प्रसवणे’ किंवा ‘बाळंत होणे’ असे म्हणतात. जन्मापूर्वीचे गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन हे तीन संस्कार, तर जन्मोत्तरीचे १३ संस्कार! जन्मानंतरचा पहिला संस्कार म्हणजेच १६ संस्कारमालेतील चौथा संस्कार म्हणजे जातकर्म संस्कार होय. ’जात’ हा शब्द ’जनी प्रादुर्भावे’ या धातूपासून बनला आहे. प्रादुर्भाव म्हणजेच उत्पन्न होणे किंवा जन्माला येणे! जन्मानंतर नवजात बाळावर मंत्रोच्चारपूर्वक ज्या काही क्रिया केल्या जातात, त्या सर्व जात कर्मसंस्काराच्या अंतर्गत येतात.

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचे मुख, नाक व शरीर स्वच्छ करणे आवश्यक असते. आईच्या उदरात असताना बाळ मुखाचा किंवा नासिकेचा उपयोग करीत नव्हता. जे काही भोजन किंवा श्वास-प्रश्वास ग्रहण करीत असे, ते सर्व आईच्या माध्यमातून नाभीद्वारे! गरोदर अवस्थेत बाळ पाण्याने भरलेल्या एका पिशवीत बंद असते, ते पाणी मुखात किंवा नाकात येऊ नये म्हणून निसर्गतः शेंबूड किंवा कफ तयार होतो व तो बाळाच्या तोंडाशी व नाकाशी चिकटलेला असतो. म्हणूनच जन्म झाल्यावर मुखावरील व नाकावरील शेंबूड व कफ स्वच्छ पुसून काढणे तसेच डोळे, कान व शरीरालादेखील स्वच्छ करणे आवश्यक असते. त्यानंतर बाळाची नाळ तोडण्यात येते. या क्रिया झाल्यानंतर बाळाला स्नान घालण्यात यावी.

बाळाची आई प्रसववेदनेमुळे दुःखात असल्याकारणामुळे ही सर्व कामे दाई किंवा घरातील ज्येष्ठ महिलांकडून केली जावीत. नंतर बाळाला कानाने ऐकू यावे, यासाठी चरक शास्त्रात म्हटले आहे- ’अश्मनो: संघटृनं कर्णमूले!’ म्हणजेच कानांच्या जवळ दगड वाजविण्यात यावा. यामुळे दोन्ही कर्णरंध्रांमध्ये ऐकण्याची शक्ती जागृत होते. कानामध्ये शब्दशक्ती जागृत झाली की अन्य चारही ज्ञानेंद्रिये जागृत होऊ लागतात, असे शरीरनिदान-तज्ज्ञांचे मत आहे. नंतर बाळाच्या डोक्यावर तुपाने भिजलेला बोळा ठेवण्यात यावा. सुश्रुत शास्त्रात म्हटले आहे -’घृताक्तं पिचुं मूर्धिं दद्यात्।’ बाळाच्या मस्तकात तीन प्रकारची हाडे आलेली असतात. त्यांनाच ‘टाळू’ असेदेखील म्हणतात. तुपाचा बोळा ठेवल्यामुळे टाळूला पोषकतत्वे प्राप्त होत असतात

हे सर्व काही संपन्न झाल्यानंतर प्रसूतीगृहाच्या बाहेर एका लघु अग्निहोत्राचे आयोजन करण्यात यावे. यामुळे बाळाच्या परिसरातील वातावरण शुद्ध राहते व पर्यावरणाचे रक्षण होते. यज्ञविधीच्या शेवटी ज्या दोन मंत्र्यांच्या आहुत्या दिल्या जातात, त्यात बाळाच्या मातेचे आरोग्य उत्तम राहावे आणि वडिलांनी संयमपूर्वक जीवन जगावे व नियमाचे पालन करावे, असा आशय दडला आहे. या छोटेखानी अग्निहोत्रानंतर पित्याने तुपाचे दोन थेंब आणि मधाचे सहा थेंब घेऊन बाळाच्या जिभेवर सुवर्णशलाकेने ‘ओम्’ असे ईश्वराचे मुख्य नाव लिहावे. त्यानंतर बाळाच्या दोन्ही कानांमध्ये वेदोऽसि या वाक्यांशाचा उच्चार करावा.

‘ओम्’ हे ईश्वराचे मुख्य नाव आहे. जन्म घेतल्याबरोबर त्या बाळाला आपल्या निर्मात्या भगवंताची आठवण असावी. जेणेकरून तो जीवनभर ईश्वराच्या ऋणात राहील. ’वेदोऽसि म्हणजेच हे बालका, तू ज्ञानस्वरूप आहेस, तू या मानवयोनीमध्ये आलेला आहेस. तुझे सर्व ज्ञान विकसित होत राहो. समस्त विद्यांचे आदिमूळ वेद आहेत. या वेदज्ञानानुसार, ‘तुझे जीवन अग्रक्रमित होत राहावे’ हा यामागचा उद्देश आहे. म्हणजेच ‘ओम्’ लिहिणे आणि ‘वेदोऽसि’ म्हणणे यापाठीमागे बाळाच्या जीवनात अध्यात्माचा प्रकाश पसरावा, हीदेखील पवित्र भावना व्यक्त होते.

सोन्याच्या तारेचा म्हणजेच शलाकेचा उपयोग करण्यामागे भौतिक समृद्धी हा हेतू आहे. या बालकाने आपल्या भावी आयुष्यात नेहमी सोने,चांदी किंवा इतर भौतिक वस्तू मिळवाव्यात आणि हा सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने परिपूर्ण व्हायला हवा, तसेच त्याने सर्व प्रकारच्या भौतिक सुखसुविधा प्राप्त कराव्यात, हाच एकमेव उद्देश आहे. भौतिक प्रगतीबरोबरच या बाळाने जीवनभर शारीरिकदृष्ट्या नेहमी उन्नत राहावयास हवे, याकरिता तूप आणि मधाचा प्रयोग करण्यात आलेला आहे. तूप हे शारीरिकदृष्ट्या स्वास्थ्यवर्धक, बुद्धीवर्धक आहे. तसेच ते पौष्टिक आहार व अहिंसक अन्नाचे प्रतीक आहे. त्याचबरोबर मध हे आरोग्यदायक औषध म्हणून उपयुक्त ठरणारे आहे.

वरीलप्रमाणे तूप आणि मध यांचे प्रमाणपूर्वक मिश्रण असलेले थेंब बाळाला चाटवावेत. या नवजात बाळाला दिले गेलेले हे पहिले अन्न! यामुळे त्याची क्षुधानिवृत्ती होते व शारीरिक विकृतीदेखील नाहीशी होते. तूप व मधाच्या थेंबांचे प्राशन करविताना पित्याने खालील तीन मंत्र म्हणावेत-
ओं भूस्त्वयि दधामि।
ओं भूवस्त्वयि दधामि।
ओं स्वस्त्वयि दधामि।
ओं भूर्भुव: स्वस्सर्वं त्वयि दधामि॥

म्हणजेच पिता म्हणतो-हे बाळा! मी तुझ्यामध्ये पृथ्वी लोकांचे, अंतरिक्ष लोकांचे आणि द्यु लोकांचे ज्ञान धारण करवितो. अर्थात शारीरिक व आत्मिक ज्ञान प्राप्त करून ब्रह्मानंद प्राप्तीचा मार्ग प्रशस्त करतो. त्यानंतर पिता उजव्या आणि डाव्या कानामध्ये कांही मंत्रांचे उच्चारण करतो आणि आशीर्वाद देतो की, हे बाळा! तुला दीर्घायुष्य प्राप्त होऊन तुझे जीवन आनंदी, सुखी व शांतमय राहो! पुनश्च पिता बाळाच्या खांद्याला स्पर्श करीत तीन मंत्रांचे उच्चारण करतो. यात तो प्रभू परमेश्वराकडे बाळाच्या सुंदर जगण्याकरिता श्रेष्ठ धन, चित्त व मनाची दक्षता, सौभाग्यप्राप्ती, उत्तम पुरुषार्थ, पौष्टिक जीवन स्वस्थ शरीर, मधुर वाणी आणि दिनांचे सुदिनांत रुपांतरण होत राहो, ही प्रार्थना करतो. एकूणच जातकर्म संस्कार म्हणजे नवजात शिशूचे सद्विचारपूर्वक स्वागत आणि त्याच्या उज्ज्वल आयुष्यासाठी सर्वांनी शुभसंकल्पांनी जागृत राहावयाचा मंगल प्रसंग!
 
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.