स्वातंत्र्यसेनानी : गोपाळ कृष्ण पाटणकर

    23-May-2023
Total Views |
article on Gopal Krishna Patankar

स्वातंत्र्याच्या रणागंणात कित्येक तेजस्वी वीरांनी त्यांच्या त्यागाने इतिहास घडवला. त्यांचा त्याग, निष्ठा शब्दातीत. त्यापैकीच एक गोपाळ कृष्ण पाटणकर. देशासाठी जगणे आणि देशासाठीच मरणे या मंत्रजागरात देशासाठी त्याग करणारे गोपाळ कृष्ण पाटणकर यांची देशनिष्ठा आणि त्याग याबद्दल या लेखात मांडणी केली आहे.

पाळ कृष्ण पाटणकर यांचा जन्म कोकणातील छोटेसे गाव बिवली येथला. १८८१ सालाचा. १९०६ साली आपलं नशीब आजमावयाला ते कोकणातून मुंबईत आले. पहिलीच नोकरी कस्टम खात्यात मिळाली. खात्यांर्गत परीक्षा नापास झाल्यामुळे नोकरी सोडली. उदरनिर्वाहाचा प्रश्न हा प्रत्येक जीवाला लागला आहे, त्याचबरोबर पुढे काय हा प्रश्नसुद्धा. नाशिकच्या गोर्‍हे, बुरकुले आणि कंपनीची एजंट म्हणून काम करायची तयारी दाखवली. साखरेच्या व्यवहारात विशेष फायदा दिसला नाही. त्यामुळे या कामाला पण रामराम ठोकला. पुढे १९०८ साली नोव्हेंबर महिन्यात कोलकात्त्यातील ’हिंदुस्थान को-ऑपरेटीव्ह लाईफ इन्शुरन्स’ कंपनीत एजंट म्हणून काम करू लागले. आयुष्याला दिशा मिळाली असं म्हणायला हरकत नाही.

याचदरम्यान त्यांचा संपर्क बाबाराव सावरकर यांच्याशी झाला. आता आयुष्याला खरी दिशा मिळाली असे म्हणता येईल का? असो. तात्याराव सावरकर तोपर्यंत इंग्लंडमधून भारतात बॉम्ब तयार करण्याच्या पद्धती, पिस्तूलं पाठवू शकतील, असे तयार झाले होते. तिथल्या लोकांचा संपर्क, विश्वास त्यांनी संपादन त्यांनी केला होता. सावरकर बधूंनी स्थापलेली ’अभिनव भारत’ ही संस्था आता बाळसं धरू लागली. त्याच्या शाखा महाराष्ट्रभर पसरू लागल्या. अनेक क्रांतिकारक त्याचे सदस्य होऊ लागले. आता ब्रिटिशांविरुद्ध जाळे विणले जाऊ लागले. मुंबईत पाटणकर, बाळकृष्ण गोरे व रामभाऊ भाटे कांदेवाडीत केशवजी नायकांच्या चाळीत एकत्र राहत असतं. सगळेच ‘अभिनव भारत’चे खंदेवीर. पुढे भाटे वसईला चित्रकला मास्तर म्हणून रुजू झाले. ‘अभिनव भारता’ची नवी शाखा गोपाळरावांनी तिकडे सुरू केली.

तात्याराव सावरकरांकडून आलेले बॉम्ब बनविण्याचे पुस्तिका घेऊन पाटणकर भटांच्या घरी गेले. ‘अभिनव भारत’च्या निवडक सभासदांना घेऊन बॉम्ब बनविणे सुरू झाले. तयार बॉम्ब वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले. या कामात कधी पाटणकर कधी कर्वे जातीने लक्ष घालत आणि कामसुद्धा स्वतः करत असत. दि. २१ डिसेंबर, १९०९ साली जॅक्सन वध झाली. दि. १ जानेवारी, १९१०च्या वर्तमानपत्रात या खटल्याची तपशीलवार माहिती आली. ती वाचून, पाटणकरांना आपण या खटल्यात गोवले जाऊ याची सुतराम कल्पना आली नाही. बॉम्बसाठी लागणारे ‘पिक्रीक अ‍ॅसिड’चा त्यांच्याकडे भरपूर साठा होता. जॅक्सन वधानंतर इंग्रज चवताळले, ‘अभिनवर भारत’च्या सभासदांची कुठल्याही कारणाने धरपडक सुरू झाली होती. गोपाळराव सावध झाले. त्यांनी आपल्याकडील सगळा साठा गणपतराव काळ्यांबरोबर पेणला पाठवून दिले. चाळीच्या एका जिन्याने गोपाळराव उतरले आणि दुसर्‍या जिन्याने पोलीस पाटणकरांना पकडायला आले.

इंग्रजांनी फुटनीतीची कुटनीती इथेही वापरली. जॅक्सनवध तपास अधिकारी गायडरने पाटणकरांना सरळ कर्व्यांसमोर उभे केले. कर्व्यांचा तोपर्यंत अतोनात शारीरिक छळ करण्यात आला होता. क्रांतिकारकांच्या अलिखित धोरणानुसार, जेव्हा शारीरिक छळ अपरिमित होत, त्यावेळी समोर आलेल्या एखाद्या गोष्टीची कबुली देऊन टाकायची म्हणजे बाकी गोष्टी मनाच्या तळात घट्ट राहतात. कर्वेंनी मान्य केले की, त्यांना पिस्तूलं पाटणकरांकरवी मिळालीत. क्षणभर पाटणकर नक्कीच दुःखी झाले असतील, ज्या कर्व्यांवर आपण एवढा विश्वास ठेवला त्यांनी आपला कबुलीजवाब दिला. पण लागलीच ते भानावर आले, बाकी माहिती फोडण्यापेक्षा त्यांनी आरोप मान्य करणे जास्त योग्य समजले. गोपाळ कृष्ण पाटणकर जॅक्सन वधात आरोपी ठरले.

पाटणकरांना जेव्हा पकडले गेले तेव्हा ‘पिक्रीक अ‍ॅॅसिड’ने रंग उडालेला शर्ट त्यांच्या अंगावर होता, तो जर तेव्हा गायडरच्या लक्षात आला असता, तर वसई बॉम्ब कारखाना आयता इंग्रजांच्या हाती लागला असता. त्यामुळेच पिस्तुलाच इतिहास त्यांनी सांगायचे ठरवले, श्री भट आणि श्री चतुर्भुज यांची नावे सांगावी लागली. यामुळे थत्ते, सावरकर, पुणे गटातले खरे या प्रकरणात गोवले गेले. पुढची खबरदारी महत्त्वाची होती. रात्री झोपेचे सोंग घेऊन आपल्या डोक्यावरून पांघरूण घेऊन, आपल्या अ‍ॅॅसिडच्या डागाने रंग उडालेला शर्ट त्यांनी उंदिराप्रमाणे कुरतडून फाडून टाकला व दुसर्‍या दिवशी सकाळी शौचकुपात टाकला. कारखान्याचा पुरावा बेमालूमपणे नाहीसा करण्यात आला.गोपाळरावांनी कबुलीजवाब दिल्यामुळे त्यांना शारीरिक छळाला सामोरे जावे लागले नाही. दि. २२ डिसेंबर रोजी न्यायालायाचे कामकाज पूर्ण झाले.

दि. २४ डिसेंबरला गोपाळरावांना दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. पहिली पाठवणी सबरमतीच्या तुरुंगात झाली. पण तिथले हवामान गोपाळरावांना मानवले नाही या सबबीवर त्यांना अन्यत्र हलविण्यात आले. त्याच तुरुंगातील डॉ. वा. वि. आठले यांनी आपल्या आत्मचरित्रात गोपळरावांचे वर्णन केलेले आढळते. गोपाळराव येणार्‍या राजकैद्याला कधी आपले अनुभव सांगून कधी सूचना करून त्याचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत. त्यांचे वागणे अतिशय साधे, सरळ आणि प्रेमळ होते. शिपायांना, जमदारांना सांगून, समजावून राजकीय कैद्यांविषयी खोटीनाटी गार्‍हाणी उत्पन्न होऊ नये, यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे. स्वतःच्या निर्मळ वागणुकीने त्यांनी अधिकारी समूहात आपला मान निर्माण केला होता. निमोनियाचे निमित्त होऊन दि. ११ ऑक्टोबर, १९१८ रोजी येरवडा तुरुंगात त्यांना देवाज्ञा झाली. एक क्रांतिज्योती अवघ्या २८-२९ वर्षांचे आयुष्यमान घेऊन तेजाने फडफडली. पण जसा सगळ्या क्रांतिकरकांचा विश्वास होता की जरी लवकर मृत्यू आला तरी पुनर्जन्म आहे, तो निश्चित आहे आणि तो या भारतभूमीतच आहे. पाटणकर नव्या रूपाने नक्कीच परतले असतील आपली देशसेवा पूर्ण करायला.

सोनाली तेलंग 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.