‘सर्वसामान्यांचा कार्यकर्ता’ म्हणून ओळख असणारे मच्छींद्र चिंचोळे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्यात विद्यार्थी, महिला यांच्या न्यायासाठी मोठा लढा देत आहेत. त्यांचा कार्यपरिचय करुन देणारा हा लेख..
मूळ लातूरचे असलेले मच्छींद्र चिंचाळे शेतकरी कुटुंबातील. त्यांची आई अंगणवाडी सेविका, तर वडील उपसरपंच होते. त्यांच्या वडिलांनी गावातील कित्येक अंतर्गत वाद आणि समस्या अगदी सामोपचाराने सोडविल्या. वडिलांच्याच तालमीत तयार झाल्याने लहानपणापासूनच मच्छींद्र यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. पुढे त्यांनी स्वत:चे आयुष्यच समाजकार्यासाठी वाहून घेतले. आजही वडिलांनी दिलेला समाजसेवाचा वसा त्यांना असाच चालू ठेवायचा असून, सर्वसामान्यांसाठी कायम झटत राहायचे आहे.
मच्छींद्र यांच्या वडिलांनी संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठीच समर्पित केले. गावातील सामाजिक कामांत व्यस्त असताना त्यांच्या वडिलांचे अचानक निधन झाले. त्यांच्या आईवर घरातील उदरनिर्वाहाची जबाबदारी येऊन पडली. त्यामुळे घरात आर्थिक चणचण जाणवू लागली. मग, नोकरीच्या निमित्ताने २००८ मध्ये मच्छींद्र यांनी पुणे गाठले. मिळेल ते काम मच्छींद्र यांनी स्वीकारले. एका किराणा दुकानात काम करताना वडिलांच्या समाजकार्याची त्यांना आठवण आली. त्यामुळे कामात त्यांचे मन काही लागेना. समाजासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, ही भावनाच त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. तेव्हापासून त्यांनी खर्या अर्थाने समाजकार्यास सुरुवात केली. मग रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आणि समाजप्रबोधनातून त्यांनी कामाचा श्रीगणेशा केला.
रुग्णालयात कोणाला मदत असो वा शासकीय कार्यालयात होणारी पिळवणूक, या विरोधात ते स्वत: लढा देत असे. परिणामी, या कामात लढणार्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढत गेली.पुढे हेच काम करीत असताना, सर्वसामान्य व झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्या कुटुंबांची गॅस सिलिंडरच्या नावाखाली फसवणूक होत असल्याचे समजले. गॅसचा काळाबाजार आणि फसवणुकीच्या विरोधात त्यांनी मोठी मोहीम सुरु केली. त्यासाठी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे घालून प्रसंगी पाठपुरावाही केला. अन्नपुरवठा अधिकार्यांच्या कार्यालयासमोर उपोषण केल्याची आठवणही ते सांगतात. विशेष म्हणजे, या मोहिमेत त्यांच्यामागे सर्वसामाान्यांची मोठी ताकद मागे उभी राहिली.
लातूर, बीड, अहमदनगर, सोलापूर, सातारा अशा ग्रामीण भागांतून पुण्यात येणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, पुण्यात आल्यावर त्यांना राहणे, खाणे आणि नोकरीची मोठी भ्रांत असते. ती गरज ओळखून अशा ग्रामीण भागातील मुलांना कामाला लावण्यासाठी मच्छींद्र चिंचोळे यांनी एक मोहीमच सुरु केली. यासाठी ते कंपन्यांमध्ये जाऊन, तेथील अधिकार्यांशी भेटून या विद्यार्थ्यांना छोटी-मोठी कामे मिळावी, यासाठी विनवण्या करु लागले.त्यासाठी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची मदतही घेतली. चाकण, भोसरी येथील एमआयडीसीमध्ये आत्तापर्यंत २०० विद्यार्थ्यांना सुरक्षारक्षक, हेल्पर अशी कामे त्यांनी मिळवून दिली. छोटे उद्योग उभारणीसाठी महिलांना साहाय्य केल्याचेही मच्छींद्र सांगतात.
पिंपरी-चिंचवडमधील पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाविरेाधात ‘स्वच्छ नदी’ ही मोहीमही मच्छींद्र यांनी राबविली. त्यासाठी गेल्या वर्षभर ते नदी परिसरात स्वच्छता आणि जनजागृती मोहीम राबवित आहेत. त्याचप्रमाणे नदीपात्रात थेट मिसळणारे दूषित पाणी, कंपन्यांचे सांडपाणी याविरोधातही त्यांनी वेळोवेळी आवाजही उठवला. त्यासाठी अगदी राज्यस्तरावर पत्रव्यवहार केल्याचेही मच्छींद्र सांगतात. मग पुढे याच माध्यमातून अनाथ मुलांसाठी आवश्यक त्या वस्तू देणे, गोरगरीब आणि गरजूंना रेशन साहित्य पुरवणे, सिग्नलवरील फिरस्तांना व घर नसलेल्यांना मदत करणे, महिला अत्याचारासंबंधित कायदेशीर मदत करणे, यासह अनेक उपक्रम पुढे सुरु केले, जे आजही सुरू आहेत. ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात आल्यावर अनेकदा तरुणांना काम नसल्याने ते व्यसनाकडे वळतात. काहीजण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात. नेमकी हीच समस्या ओळखून मच्छींद्र चिंचोळे हे या तरुणांचे समुपदेशन देखील करतात.
त्यासाठी ते लोकवस्तीतील विविध ठिकाणांच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन या विषयांवर चर्चा करतात. तसेच, त्यांना या व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी नोकरी-व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात. हे सामजिक काम करीत असताना गोरगरीब कुटुंबीयांमध्ये पैसे नसल्याने त्यांच्या मुलींचे विवाह होत नसल्याचे मच्छींद्र यांच्या निदर्शास आले. मग समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांच्यचा मध्यस्तीने पुढाकार घेऊन अशा गोरगरीब कुटुंबांतील मुलींचे स्वखर्चाने त्यांनी लग्नही लावून दिले. आत्तापर्यंत अशा प्रकाराची पाच लग्न लावून दिल्याचे ते सांगतात. एवढेच नव्हे, तर त्यांचे संसार पुढे चांगले चालण्यासाठी त्या महिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी उद्योग-व्यवसाय उभे केले आहेत.
मच्छींद्र चिंचोळे सांगतात की, “गेल्या २३ वर्षांपासून सामाजिक काम करीत आलो आहे. त्यामागे माझा कोणताही राजकीय व आर्थिक स्वार्थ नाही. या कामाची पावती म्हणून अखिल भारतीय छावा संघटनेचे उपाध्यक्ष पद मिळाले होते. त्या माध्यमातून मला आणखी सामाजिक कामाची आवड निर्माण झाली. सध्या पुणे जिल्ह्यात काम सुरू आहे. अशाच प्रकारची कामे राज्यांतील विविध ठिकाणी करायची आहेत.”भविष्यात अनाथ मुलांसाठी आश्रम सुरु करणे, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याची इच्छा असल्याचे ते सांगतात. अशा या सर्वसामान्यांसाठी झटणार्या मच्छींद्र चिंचोळे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!