सुशासनातील संवेदनशीलता...

    22-Mar-2023
Total Views |
Sensitivity is important in good governance
सुशासनात संवेदनशीलता किती महत्त्वाची असते, तीदेखील आपल्या महाकाय लोकसंख्या असलेल्या भारतात, हे अलीकडील काळात अनेकदा सिद्ध झाले. भ्रष्टाचारमुक्त वर्तन आणि प्रामाणिक कार्यनिष्ठा असली की, हे सहज शक्य होतं. भारताच्या लोकशाही प्रक्रियेला यामुळे चकाकी येते, यात शंका नाही.

काही दशकांपूर्वी ’सारांश’ नावाचा एक चित्रपट येऊन गेला. त्यातील एक प्रसंग ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट बघितला असेल, ते विसरू शकणार नाहीत. अभिनेते अनुपम खेर यांच्यावर चित्रित या प्रसंगात सामान्य माणसाला नोकरशाहीतील असंवेदनशीलतेमुळे किती मन:स्ताप आणि त्रास भोगावा लागतो, हे अत्यंत प्रभावीपणे दाखविले होते. इतर अन्य चित्रपटांतूनदेखील असे अनेक प्रहार नोकरशाहीतील या प्रवृत्तीवर केले गेले, पुस्तकातून मांडले गेलेत, वृत्तपत्रांतूनदेखील त्यावर वेळोवेळी ताशेरे ओढले गेले. मात्र, दुर्दैवाने समाजात त्याचे उलट परिणाम दिसले. नोकरशाहीतील दिरंगाई फोफावत गेली आणि सामान्य जनता त्यात पिचत गेली. याला महत्त्वाचे कारण ठरले ते उच्च पातळीवर फोफावलेल्या भ्रष्टाचाराचे. आपल्या देशातील त्या काळातील राज्यकर्तेदेखील यात सक्रिय दिसू लागल्याने तो सर्वमान्य होऊ लागला आणि सामान्य नागरिक अधिकच भरडत गेला.

नोकरशाहीत हे सर्वच जण करीत होते, असे नाही. मात्र, कितीतरी असंतोष बाळगून असलेले, प्रामाणिक नोकरशहादेखील या भ्रष्टाचारी नोकरदारांतच गणले जाऊ लागले. जनतेची कामे करूनदेखील त्यांना जनतेचा रोष पत्करावा लागला आणि असंवेदनशील लोक म्हणून या वर्गाकडे बघण्याचा प्रघात पडला.ही सर्व उजळणी करण्याचे कारण असे की, आजदेखील जनता या नोकरदारवर्गाकडे याच दृष्टिकोनातून पाहाते. त्यात हे लोक जेव्हा संप, आंदोलने, निदर्शने वगैरे आपल्या हक्क- मागण्यांसाठी करतात, तेव्हा जनतेचा आणखी रोष ओढवून घेतात. आपल्या लोकशाहीचा हा वर्ग एक मोठा घटक आहे आणि त्याच्या माध्यमातून सुशासनातदेखील संवेदनशीलता आणता येते, आपल्या देशाची शान यामुळे अखिल जगतात उंचावली जाते, हेदेखील आपण समजून घेतले पाहिजे. मात्र, त्यासाठी भ्रष्टाचार अजिबात खपवून घेणार नाही, असे प्रत्यक्ष कृती करणारे आणि लोकांचा विश्वास संपादन करणारे नेतृत्व असायला हवे. आपल्या सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विश्वासदेखील संपादन केला आणि ’Goverence in Human Touch’ हेदेखील कृतीत आणून दाखविले.

’Vibrant village scheme’ अंतर्गत या सरकारने जी किमया केली, ती अभूतपूर्व अशी आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशातील सीमेवरील गाव हे अंतिम आहे, असे सांगून तेथपर्यंत कोणीही जात नसे. मात्र, मोदी सरकारने नेमके उलट केले. ज्या लोकांची अशी भावना होती की, देशातील आपले गाव हे शेवटचे आहे, त्यामुळे विकास जेव्हा होईल तेव्हा होईल. कारण, इथपर्यंत आपले कल्याण करण्यासाठी कोणीही येणार नाही. अशा लोकांचा हा गमावलेला विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमावला आणि त्या लोकांना हा विश्वास दिला की, तुमचे गाव हे शेवटचे नाही तर पहिले आहे व त्यामुळे विकासाची सुरुवात इथूनच होईल; तेव्हा कुठे ज्या गावांना नोकरशाही माहीत नव्हती, त्यांना सुशासन म्हणजे काय हे समजू लागले. या गावात अधिकारी, कर्मचारी जाऊ लागले आणि तेथे मूलभूत सोईसुविधा ज्या स्वातंत्र्याच्या ५०-६० वर्षांत कधी मिळाल्या नाहीत, त्या या गावांतील लोकांना मिळू लागल्या. पूर्वोत्तर राज्यातील चित्र तर गेल्या नऊ वर्षांत अगदी पूर्णपणे पालटल्याचे दिसते.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तर नागालॅण्डमध्ये पहिली महिला आमदार निवडून आली. हे सर्व अद्भुत नसले, तरी अभूतपूर्व आहे. कारण, यामुळे केवळ या दुर्गम गावात विकास नाही, तर शांततादेखील निर्माण झाली. प्रशासन आणि जनता यातील संबंध दृढ होत जात आहेत, ही या देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अतिशय महत्त्वपूर्ण अशी उपलब्धी. नवेपण स्वीकारण्याचे सामर्थ्य असणारे, गतिमान कृतीची जोड देणारे, लोकांच्या क्षमता आणि सामर्थ्यावर विश्वास असणारे नेतृत्व असले की मग ’सबका प्रयास’ या न्यायाने कोणतीही समस्या डोके वर काढीत नाही. याच नोकरशहांच्या माध्यमातून भारताने अलीकडील काळात जगापुढे आदर्श निर्माण करणारी कृती केली. यात कोरोना काळात ज्या पद्धतीने सरकारने या कर्मचारी अधिकार्‍यांवर विश्वास टाकून लोकांना आजारातून नव्हे, तर मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याची कामगिरी केली, त्याबद्दल या सर्वांचे अभिनंदनच केले पाहिजे.

दुसरा एक प्रसंग म्हणजे, रशिया-युक्रेन युद्ध संकटात जेव्हा देशातील १४ हजार लोक तेथे अडकून पडले होते, तेव्हा हीच ‘ह्युमन टच इन गव्हर्नन्स’ नीती उपयुक्त ठरली. आपल्या परिवारातील सदस्यांचे युद्धकाळात काही बरेवाईट तर होणार नाही ना? या भीतीला दूर करण्याचे काम याच नोकरदार वर्गाने करून दाखविले. या लोकांच्या घरी जाऊन त्यांना रोज धीर देणारे हे कर्मचारी आणि अधिकारी आपल्या भारतीय लोकशाहीच्या सौंदर्यात भर घालीत होते. त्यांची कृती जनतेच्या मनात चीड उत्पन्न करणारी नाही, तर आपलेपणा निर्माण करणारी होती. सुशासनातील ही संवेदनशीलता ओळखता आली तर जगात ‘डेमोक्रसी कॅन डिलिव्हर’ हा संदेश दृढ विश्वासाने जाईल, याबाबत संदेह बाळगण्याचे कारण नाही. ज्यावेळी युक्रेनमधील संकटात सापडलेले लोक सुखरूप भारतात परतले, तेव्हा आपल्या कामगिरीचे अनोखे समाधान या नोकरदार वर्गाला आणि त्या परिवाराला मिळाले, हे कबूल करावेच लागेल!



-अतुल तांदळीकर



 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.