अमेरिकेच्या धोरणांमुळे तसेच चीनबरोबरच्या व्यापार युद्धामुळे संपूर्ण जगाची वाढ मंदावली आहे. तथापि, भारतीय अर्थव्यवस्थेला त्याची फारशी झळ पोहोचलेली नाही. भारतीय अर्थव्यवस्था निश्चित वेगाने वाटचाल करत आहे. भारतीय बाजारही आता सावरले असून, त्यांनीही पुन्हा वाढीकडे वाटचाल सुरूच ठेवली आहे.
मेक अमेरिका, ग्रेट अगेन’ असा नारा देत सत्तेवर आलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जगभरात आर्थिक अनिश्चितता पसरली असून, त्याचा फटका भारतासह सर्वच देशांना थोड्याफार प्रमाणात बसतो आहे. आयातशुल्क लागू करण्याचे त्यांचे धोरण, जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे कंबरडे मोडणारे ठरले आहे. चीनबरोबर अमेरिकेचे व्यापार युद्ध सुरू असले, तरी त्याच्या झळा अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांनाही बसत आहेत. आक्रमक संरक्षणवाद ते सामंज्यसपूर्ण बोलणी अशा ज्या घोषणांचा धडाका ट्रम्प यांनी लावला आहे, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आणि चिंता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनिश्चितता हेच होय. त्यांनी वारंवार ‘ट्विटर’चा वापर करून, मोठ्या प्रमाणात शुल्क वाढ जाहीर केली.
स्वतःच्या प्रशासनाशी, आंतरराष्ट्रीय भागीदारांशी कोणतीही सल्लामसलत न करता, त्यांनी हे निर्णय जाहीर केले. यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी, अशा प्रकारे कधीही निर्णय घेतले नव्हते. कॅनडा आणि युरोपीय महासंघासारख्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांकडून त्यांनी स्टील आणि अॅल्युमिनियम आयातीवर जे शुल्क लागू केले, ते धक्कादायकच. यातूनच व्यापार युद्धाला चालना मिळाली आहे. अमेरिकेतील उद्योगांना चीनपासून संरक्षण देण्यासाठी म्हणून त्यांनी हे आयातशुल्क लागू केले असले, तरी त्याचा मोठा फटका अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना बसलेला दिसून येतो. व्यापार तूट संतुलित करण्यासाठी तसेच, उत्पादन क्षेत्रातील रोजगार अमेरिकेत परत आणण्यासाठीचे आवश्यक साधन म्हणून, ट्रम्प यांनी ‘व्यापार युद्ध’ ही संकल्पना मांडली. तथापि, शुल्काचा वापर अमेरिकेचे नुकसान करणाराच ठरला, असेही म्हणावे लागेल. अनुचित व्यापार पद्धती असलेल्या देशांमधील वस्तूंवरच नव्हे, तर तुलनेने खुल्या बाजारपेठेसह दीर्घकालीन मित्र राष्ट्रांच्या आयातीवरही त्याचा थेट परिणाम झाला. यामुळेच, त्यांच्या घोषित उद्दिष्टांची विश्वासार्हता कमी झाली.
ट्रम्प वारंवार अमेरिकी उत्पादनाचे समर्थन करत असताना, त्यांच्या शुल्क धोरणाचा शेतीसह विविध क्षेत्रांवर परिणाम झाला. ही क्षेत्रे पारंपरिकपणे निर्यातीवर अवलंबून असलेली क्षेत्रे होती. पायाभूत क्षेत्रातील एक प्रमुख लोकसंख्या असलेल्या शेतकर्यांना, चीनसारख्या देशांनी लादलेल्या शुल्काचा मोठा फटका बसला. त्यामुळे अमेरिकेतील निर्यातीत घट झाली असून, आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ट्रम्प यांनी प्रारंभी संघर्षाची भूमिका घेतली असली, तरी त्यांनी जगातील जवळपास सर्वच देशांवर जे शुल्क लादले, ते जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असेच ठरले. ट्रम्प यांच्या आयातशुल्काचे आर्थिक परिणाम लक्षणीय आणि दूरगामी असेच आहेत. आयात केलेल्या वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे अमेरिकेत महागाईचे संकट तीव्र झाले असून, त्यामुळे तेथील ग्राहक आणि व्यवसाय दोन्हीही प्रभावित झाले आहेत.
पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. प्रत्येक देश अमेरिकेच्या आयातशुल्काला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातही घट झाली असून, त्यामुळे जागतिक अनिश्चिततेत वाढ झाली आहे. परिणामी, जागतिक आर्थिक वाढची गतीही मंदावली आहे. ‘जागतिक व्यापार संघटने’कडे दाव्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. एक विश्वासार्ह व्यापारी भागीदार म्हणून अमेरिकेची विश्वासार्हता निश्चितच कमी झाली असून, त्याला ट्रम्प यांची धोरणेच कारणीभूत आहेत. म्हणूनच, मित्र राष्ट्रे आणि स्पर्धकांमध्ये अविश्वासाची भावना निर्माण झालेली दिसून येते. अमेरिकन बाजारपेठेवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत असून, पर्यायी पुरवठादार शोधण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. याचा अमेरिकेतील व्यवसायांवर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ट्रम्प यांच्या मनमानीपणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेचा पायाच ढासळला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेलाही ट्रम्प यांच्या आयातशुल्काचा, थोडाफार फटका बसला आहेच. स्टील आणि अॅल्युमिनियवर वाढलेल्या शुल्कामुळे भारतातून अमेरिकेला होणार्या निर्यातीवर परिणाम झाला असून, भारतीय बाजारावर दबाव राहिला. त्यामुळे प्रारंभी भारतीय बाजारात काही प्रमाणात घसरण उडालेली दिसून आली. भारतीय उद्योजकांनी पर्यायी बाजारपेठांचा शोध घेण्यास सुरुवातही केली. तथापि, याच आयातशुल्कामुळे काही भारतीय उद्योगांना अमेरिकेत नव्याने संधी उपलब्ध होताना दिसून येत आहेत. अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे औषध निर्मिती, आयटी, वस्त्रोद्योग क्षेत्रांत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. म्हणूनच, गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारपेठ सावरत असून, भांडवली बाजारातही त्याचे स्पष्ट पडसाद उमटलेले दिसून येतात.
विदेशी संस्थागत गुंतवणूकदार पुन्हा एकदा, भारतीय बाजारपेठांकडे वळले आहेत. ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला. अनेक देशांनी अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीला प्रत्युत्तर म्हणून आपल्या आयातशुल्कात वाढ केली, ज्यामुळे व्यापार युद्धाची स्थिती निर्माण झाली. यामुळे जागतिक व्यापारात घट झाली आणि आर्थिक वाढ मंदावली. ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे, जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आणि अस्थिरता निर्माण झाली असून, त्यांच्या विरोधाभासी वक्तव्यांमुळे आणि अनपेक्षित निर्णयांमुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तथापि, भारतासाठी ही एक मोठी संधी उपलब्ध झाली असून, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून जागतिक पातळीवर स्थान मिळविण्यासाठी तो सज्ज झाला आहे. ट्रम्प यांच्या व्यापार धोरणाने जागतिक अर्थव्यवस्था मंदावली असली, तरी भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ कायम आहे, ही दिलासादायक अशीच बाब होय.
- संजीव ओक