‘कलम 370’, ‘35 अ’ हटविल्यामुळेच ‘अथवास’सारख्या कार्यक्रमाचे आयोजन शक्य

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन, जम्मू-काश्मीर, लडाखच्या नवउद्योजकांना मार्गदर्शन

    18-Mar-2023
Total Views |

Athwas
(Athwas)

मुंबई (ओंकार मुळ्ये) :
“ ‘अथवास’ हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या आणि एकाअर्थी भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा कार्यक्रम आहे. भारतात यापूर्वी असे कार्यक्रम आयोजित होणे कठीण होते. ’कलम 370’ आणि ’35 अ’ रद्द करण्याचे मोठे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. जम्मू आणि काश्मीर हे भारताचेच अविभाज्य भाग आहेत. यामुळे आपण ‘अथवास’सारखे कार्यक्रम आज आपण आयोजित करू शकतोय,” असा विश्वास राज्याचे महिला व बालविकास आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जम्मू-काश्मीर आणि लडाखहून मुंबईत आलेल्या नवउद्योजकांना संबोधित करताना व्यक्त केला. मुंबईतील ’वर्ल्ड ट्रेड सेंटर’ येथे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्‍याने व ‘गुलशन फाऊंडेशन’तर्फे आयोजित ’अथवास’ हा जम्मू-काश्मीर-लडाख आणि महाराष्ट्राला ‘सोशिओ-इकोनॉमिक कॉरिडोर’च्या माध्यमातून जोडणारा सहा दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि. 17 मार्च रोजी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
 
मुंबईत आलेल्या नवउद्योजकांना प्रकाशझोतात आणण्यासाठी मंत्री लोढा यांनी माध्यमांना या कार्यक्रमाची दखल घेण्यासही सांगितले. यासोबतच मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे सुरू असलेल्या ’लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो’ला उपस्थित राहून महाराष्ट्राची संस्कृती अनुभवण्याचे आवाहन त्यांनी येथील मुलांना केले आहे. ’अथवास’सारखे कार्यक्रम दरवर्षी होत राहो, अशी इच्छा मंत्री लोढा यांनी व्यक्त केली असून राज्याच्या पर्यटन विभागातर्फे ‘अथवास’साठी आर्थिक साहाय्य करण्याची इच्छाही यावेळी व्यक्त केली. ‘अथवास’ या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन ‘पॉलिसी अ‍ॅण्ड अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ अर्थात ‘पार्क’च्या जम्मू-काश्मीर क्षेत्र विकास प्रमुख रुचिता राणे यांनी केले.
 
दि. 17 ते 22 मार्च असे सहा दिवसीय आयोजित या कार्यक्रमात जम्मू-काश्मीर आणि लडाखसह नजीकच्या प्रांतातील अनेक उदयोन्मुख नवे उद्योजक सहभागी होणार आहेत. तेथील उद्योजकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या संधींची माहिती तर होईलच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यातील लोकांनाही काश्मीर प्रांतात सुरू असलेल्या अनेक नव्या उद्योगांविषयी, योजनांविषयी सविस्तर माहिती मिळू शकेल. सदर कार्यक्रमाच्या नियोजनात ‘पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर’, ‘फाऊंडेशन फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट’ अर्थात ‘एफएचडी’, ‘एस. आर. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट’, ‘सॅटर्डे क्लब’, ‘ग्लोबल ट्रस्ट’, ’चेंबर फॉर स्मॉल अ‍ॅण्ड मीडियम बिझनेस’, ‘पनाश फाऊंडेशन’, ‘उद्योग मित्र’ आणि ‘सहकार भारती’ या सर्व संस्थांचा मोठा वाटा आहे.
 
यावेळी मंचावर ‘गुलशन फाऊंडेशन’चे(मुंबई) सचिव इरफान अली पिरजादे, ‘बीडब्ल्यू बिझनेस वर्ल्ड’चे अध्यक्ष आणि मुख्य संपादक डॉ. अनुराग बत्रा, ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई इकोनॉमी’चे अध्यक्ष विजय कलंत्री, माधुरी सहस्त्रबुद्धे, गगन महोत्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
 
’अथवास’च्या माध्यमातून जम्मू-काश्मीर-लडाखमधील नवउद्योजक आपली संस्कृती, विचारधारा आणि आपले उत्पादन खास मुंबईकरांसमोर घेऊन आले आहेत. याच मुंबईच्या माध्यमातून संपूर्ण जगाला जम्मू-काश्मीरची ओळख होईल. भारताला समजायचं असेल, तर आधी भारताच्या अंतरआत्म्याला समजण्याची गरज आहे. आज जगभरात ‘इस्कॉन’ची बरीच मंदिरे आहेत. मात्र, सध्या जम्मू-काश्मीरमध्ये एखादं ‘इस्कॉन’चं मंदिर बनावं, अशी इच्छा आहे.

- गौरंग दास, संचालक, गोवर्धन इकोव्हिलेज

प्रत्येक राज्याची एखाद्या विशिष्ट उत्पादनासाठी ओळख असते. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरचीसुद्धा अशी ओळख आहे. अथवासच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरचे उद्योजक त्यांचे स्वतःचे उत्पादन खास मुंबईकरांसाठी घेऊन आले आहेत. ही भारताच्या विकासाच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे. केवळ स्पर्धा म्हणून नाही तर जम्मू-काश्मीरला विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी हे नवउद्योजक उद्योगक्षेत्रात उतरले आहेत.

- डॉ. अनुराग बत्रा, अध्यक्ष आणि मुख्य संपादक, बीडब्ल्यू बिझनेसवर्ल्ड
जम्मू-काश्मीरच्या स्थानिक रहिवाशांना उद्योग क्षेत्रात चालना देणारा अथवास हा कार्यक्रम आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाबरोबरच औद्योगिक विकास करण्याचीही आवश्यकता आहे. जम्मू-काश्मीरच्या स्थानिकांसाठी भारत सरकारने बऱ्याच योजना सुरु केल्या आहेत. त्याचा फायदा घेऊन जम्मू-काश्मीर विकासाच्या दृष्टीने नक्कीच मार्गक्रमण करेल.

- विजय कलंत्री, अध्यक्ष, वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई इकोनॉमी
अथवास या जम्मू-काश्मीर-लडाख आणि महाराष्ट्राला सोशिओ इकोनॉमिक कॉरिडोअरच्या माध्यमातून जोडणारा कार्यक्रम मुंबईत यशस्वीपणे पार पडतोय. आज या ठिकाणी १०० हून जास्त स्टॉल्स जम्मू-काश्मीर-लडाखहून आलेल्या उद्योजकांनी लावले आहेत. या विद्यार्थ्यांचे या कार्यक्रमामागे मोठे योगदान असून त्यांच्या पुढाकाराने होत असलेल्या हा कार्यक्रम नक्कीच यशस्वीपणे पार पडेल.

- इरफान अली पिरजादे, सचिव, गुलशन फाऊंडेशन, मुंबईआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.