निदान झाले सुकर

    17-Mar-2023
Total Views |
Dr. m. Vs. Govilkar Hospital Seva Sadan

 
सर्वसामान्यांसाठी उत्कृष्ठ वर्धिष्णू, पारदर्शी आणि आपुलकीची आरोग्यसेवा योग्य दरात उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या श्रीगुरूजी रुग्णालयाचे कार्यास २००८मध्ये नाशिक येथे प्रारंभ झाला. कर्करोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना येणार्‍या समस्या जाणून घेत स्व. डॉ. म. वि. गोविलकर रुग्ण सेवा सदन साकारले आहे.

 
गुरूजी रुग्णालयात कर्करोग रुग्णांवरील उपचारासाठी २०१३मध्ये सुसज्ज कर्करोग निदान आणि उपचार केंद्र सुरू करण्यात आले. किरणोपचार (रेडिएशन), केमोथेरपी, कर्करोग शस्त्रक्रिया या कर्करोगावरील सर्वंकष उपचार या केंद्रात आज उपलब्ध आहेत. कर्करोगासारख्या दुर्धर आजारावरील उपचार हे अत्यंत खर्चिक आणि अनेकदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात, ही अडचण लक्षात घेऊन उपचाराचे दर कमीत कमी ठेवण्याचा रुग्णालयाचा कायम प्रयत्न राहिला आहे. श्रीगुरूजी रुग्णालयाच्या कर्करोग उपचार केंद्रात येणार्‍या रुग्णांपैकी साधारण ८० टक्के रुग्णांवर काही शासकीय योजना, अनेक रुग्णांना सवलतीच्या दरात तर काही अत्यंत गरजू रुग्णांना मोफत उपचारदेखील केले जातात.


किरणोपचारासारखे काही उपचार हे दीर्घकाळ चालणारे असतात. या उपचाराचा कालावधी १५ दिवसांपासून तर साधारणतः दोन महिन्यांपर्यंत असू शकतो. या कालावधीत रुग्णाला रुग्णालयात भरती राहण्याची आवश्यकता नसते. परंतु, दर काही दिवसांनी काही तासांसाठी उपचार घेण्याकरिता रुग्णालयात यावे लागते. नाशिक जिल्ह्यासह जळगाव, धुळे, नंदूरबार, नगर येथून येणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे. अशा रुग्णांना उपचार कालावधी दरम्यान नाशिक शहरामध्ये निवास आणि भोजनाच्या सुविधेसाठी बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो


त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. या समस्येवर तोडगा म्हणून कर्करोग रुग्ण आणि त्यांचा एक नातेवाईक यांच्या निवास व भोजनाची सोय असणारे सर्व सोयींनी युक्त रुग्ण सेवा सदन साकारले आहे.रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. विनायकराव गोविलकर यांच्या प्रेरणेने आणि त्यांनी व्यक्तीशः केलेल्या मोठ्या योगदानामुळे रुग्ण सेवा सदनाच्या निर्माणाचा प्रारंभ करण्यात आला.समाजातील काही औद्योगिक प्रतिष्ठाने, सामाजिक संस्था आणि अनेक दानशूर व्यक्तींच्या भरीव सहयोगामुळे साधारण ११ महिन्यांच्या कालावधीत ही इमारत पूर्णत्वास आली.आज या रुग्ण सेवा सदनात आठ खाटांचा सामान्य कक्ष, १६ सेमी स्पेशल खोल्यांचा विभाग, आठ स्पेशल खोल्यांचा विभाग असून एका परिपूर्ण उपाहारगृहाची देखील व्यवस्था उपलब्ध आहे. या सुविधेमुळे दीर्घकालीन उपचारांची गरज असणार्‍या कर्करोग व इतर आजाराच्या रुग्णांची निश्चितच चांगली सोय होणार असून त्यांचा खर्च कमी होण्यासही मदत होणार आहे.


 
-डॉ. गिरीश बेद्रे

(लेखक श्रीगुरूजी रुग्णालयातील कॅन्सर तज्ज्ञ आहेत.)



 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.