खगोलशास्त्राची ‘तारांकित’ लेखिका

    15-Mar-2023
Total Views |
Sujata Babar

सुजाता बाबर यांनी आकाशदर्शनाचे आजवर ७०० हून अधिक उपक्रम यशस्वी केले आहेत. खगोलशास्त्राची आवड निर्माण करणार्‍या उपक्रमशील लेखिकेचा हा ‘तारांकित’ प्रवास...

सुजाता बाबर यांचा जन्म पंढरपूरमधील सांगोला येथील राऊळ कुटुंबात झाला. त्यांच्या आई-वडिलांना शिक्षणाची विलक्षण आवड. वडिलांनी ‘ओव्हर सियर’चा कोर्स करुन सिव्हिल इंजिनिअर म्हणून नोकरीला, तर आई शिक्षका. घरातूनच शिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या सुजाता यांनाही अभ्यास, संशोधनात आवड निर्माण होणे स्वाभाविकच. सुजाता बाबर यांनी पुण्याच्या स. प. महाविद्यालयामधून रसायनशास्त्रात ‘एमसएसी’ पूर्ण केले. पुढे मुक्त विद्यापीठात पत्रकारितेची पदवीही घेतली. मिलिंद बाबर यांच्याशी विवाह झाल्यानंतर सुजाता नाशिककर झाल्या. संशोधनाची आवड असल्याने त्यांनी डॉ. बालसुब्रमण्यम् यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे काम प्रारंभी सुरू केले. यादरम्यान, ‘अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हल्पमेंट’ या स्वयंसेवी संस्थेशी त्या जोडल्या गेल्या. तिकडे पर्यायी माध्यमातून समाजप्रबोधनाच्या कामाचा अनुभव त्यांना मिळाला. सामाजिक कार्याच्या वाढत्या कार्यामुळे सुजाता यांचे संशोधन मागे पडले. तरीही ‘अभिव्यक्ती मीडिया’मुळे विविध स्तर, पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांना काम करण्याचा अनुभव खूप शिकवून गेला.

आकाशनिरीक्षण, खगोलशास्त्राची आवड असलेल्या आपल्या मुलासाठी त्यांनी घरातच दुर्बीण लावून आकाशवाचन सुरु केले. या क्षेत्रात आवड असल्याने त्यांना पूढे काही कुटुंबेही जोडली गेली. घरातच आकाश निरीक्षण केंद्राची अशी पायाभरणी झाली होती. १९९२ मध्ये विज्ञानप्रेमी प्रा. आचार्य, प्रा. प्रदीप देवी, पूर्णिमा कर्डीले, अ‍ॅड. मिलिंद बाबर यांच्या सहकार्याने मुंबईच्या खगोल मंडळाची नाशिक येथे शाखा स्थापना करण्यात आली. मंडळाद्वारे आकाशवाचन, खगोल अभ्यासाचे उपक्रम सुरु झाले. खगोलशास्त्रकुतूहल वाढवणारे, आनंदादायी असल्याने विविध लोक यात जुळत गेले. मुलांसोबत मोठी मंडळीही संस्थेशी जोडली गेली. या माध्यमातून दर रविवारी ‘विद्याप्रबोधनी’ येथे खगोलीय घटनांवर चर्चासत्रे, भाषणे, व्याख्यान असे उपक्रम घेतले जाऊ लागले. याचकाळात सुजाता यांनी विज्ञान आणि खगोलीय विषयांसह माध्यम साक्षरता, स्त्रियांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, संगोपन, सुजाण पालकत्व या विषयावर विविध माध्यमातून लिखाण बहरत गेले. खगोलशास्त्रांची अनेकांना विलक्षण आवड असते. दुर्बिणीसह मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक मात्र उपलब्ध होत नाहीत. ही गरज ओळखून सुजाता यांनी आकाश निरीक्षण उपक्रमाला अधिक गतिमान केले.

उपक्रमातून वैज्ञानिक माहिती, विश्वाची निर्मिती, ग्रह-तारे, पृथ्वीव्यतिरिक्त सजीव सृष्टी असे रस निर्माण करणारे विषय रंजन कथा, माहितीसह सादर केले जात. “विषय अधिक रंजक रसपूर्ण होतो. खगोलशास्त्र शिकवताना मुले आणि पालकांनाही यात समाविष्ट करुन घेतले जात असल्याने मुलांचा सभाधीटपणा, संदर्भग्रंथ कसे वाचावे, विषय सोप्या पद्धतीने कसा मांडावा, याचा अभ्यास झाल्याने ‘व्यक्तिमत्त्व विकास’ होत जातो,” असे त्या सांगतात. “खगोलशास्त्राचा अभ्यास करताना इतक्या मोठ्या आकाशगंगेत माणूस किती नगण्य आहोत, ही जाणीव अधिक विकसित होते आणि अहंकार दूर होतो,” असेही सुजाता नमूद करतात. आकाश निरीक्षण, खगोलीय विषयांवर कार्यशाळांचे आयोजन खगोल मंडळ, नाशिकतर्फे केले जाते. त्यात ‘बेसिक’ तसेच ‘अ‍ॅडव्हान्स’ खगोलशास्त्र, ‘अ‍ॅस्ट्रो फोटोग्राफी, ‘अ‍ॅस्ट्रो फिजिक्स’, ‘अ‍ॅस्ट्रो बायोलॉजी’, ‘टेलिस्कोप’संबंधी ज्ञान व त्याचे मार्गदर्शन केले जाते.खगोल मंडळातर्फे सुजाता यांच्या मार्गदर्शनात वनवासी पाडे, आश्रमशाळांमधून खगोलशास्त्राचे मार्गदर्शन केले जाते. रविवारचे चर्चासत्र, जॉगिंग ट्रॅक, मैदाने, क्रीडांगणे येथील खगोल रोड शोज् मोफत घेतले जातात. ‘खगोलविश्व’ या नियतकालिकाच्या बाबर संपादकही आहेत. सुधाकर भालेराव, डॉ. गिरीश पिंपळे यांनी खगोलशास्त्रासंबंधी उपक्रमात मोठे योगदान दिले. मात्र, संस्था म्हणून व्यापक काम करता आले.

लाखो लोकांना दुर्बिणीतून आकाश दाखवता आले, याचे समाधान आहे, असे बाबर नमूद करतात. नाशिकमध्ये आजवर त्यांनी सातशेहून अधिक आकाशनिरीक्षणाचे उपक्रम घेतले आहे.जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, पर्यावरण याविषयांची बाबर यांना आवड आहे. आज त्या विविध संस्थांसाठी अनुवाद, आशय लिखाणासह मुक्त पत्रकार म्हणून काम करतात. “खगोलशास्त्रात काम करताना लोकांमध्ये सामाजिक संवेदना, बांधिलकी निर्माण करण्यासाठी अधिक योगदान देता यावे. मानव्याची संवेदना कायम राहावी, यासाठी काम करत राहीन,“ असे त्या सांगतात. विज्ञान, सामाजिक विषयांवर पुस्तक लिहिण्याचा त्यांचा मानस आहे. बदलापूरजवळील उमरोली येथील खगोलभवन केंद्रासाठी काम करताना नाशिकमध्येही खगोलभवन निर्माण व्हावे, असे सुजाता बाबर यांचे स्वप्न आहे. आज खगोलशास्त्राच्या विविध शाखा उपलब्ध असून यात पूर्ण वेळ करिअर उपलब्ध आहे. त्यांच्या अभ्यासासाठी खगोल मंडळ, मुंबई आणि नाशिक केंद्र मार्गदर्शन करतात. शेकडो मुलांनी नाशिक खगोल मंडळाच्या मार्गदर्शनात संशोधन, ’पीएच.डी’ याचे समाधान वाटते, असे त्या नूमद करतात. सुजात बाबर यांच्या पुढील वाटचालीसाठी दै.’मुंबई तरुण भारत’ कडून शुभेच्छा...!
 



-निल कुलकर्णी


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.