काँग्रेस माझी कबर खोदण्यात व्यस्त, मी एक्स्प्रेस-वे बनवण्यात मस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

    13-Mar-2023
Total Views |
narendra-modi-karnataka-update-bangalore-mysore-expressway


बंगळुरू
: “काँग्रेस नेते माझी कबर खोदण्याची स्वप्ने पाहण्यात व्यस्त आहेत. मात्र, मी ‘एक्स्प्रेस-वे’चं उद्घाटन करण्यात आणि देशातील गरीब लोकांसाठी काम करण्यात मस्त आहे,” असा जोरदार हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्यांवर केला आहे.पंतप्रधान मोदी कर्नाटकच्या दौर्‍यावर असून त्यांनी रविवारी मंड्यात पोहोचल्यावर जोरदार रोड शो केला. त्यानंतर मोदींनी बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस-वेचे लोकार्पण केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते. कर्नाटकात पंतप्रधानांनी सुमारे १६ हजार कोटींचे प्रकल्प जनतेला समर्पित केले.

‘एक्सप्रेस-वे’चे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “ ‘सागरमाला’ आणि ‘भारतमाला’सारख्या प्रकल्पांनी कर्नाटक आणि देश आज बदलत आहे. जग ‘कोविड’शी झुंजत असताना, भारताने पायाभूत सुविधांचे बजेट अनेक पटीने वाढवून मोठा संदेश दिला. २०१४ पूर्वी काँग्रेस सरकारने गरीब कुटुंबांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले आणि त्यांच्या विकासाचा पैसा लुटला, असा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला.या द्रुतगती मार्गामुळे बंगळुरू आणि म्हैसूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ तीन तासांवरून अवघ्या ७५ मिनिटांवर येईल. हा द्रुतगती मार्ग दोन्ही शहरांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

कुशलनगरची बंगळुरूशी ’कनेक्टिव्हिटी’
 
पंतप्रधान मोदींनी म्हैसूर-खुशालनगर चार मार्गिका महामार्गाची पायाभरणी केली. सुमारे ४,१३० कोटी रुपये खर्चून ९२ किमी पसरलेला हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. कुशलनगरची बंगळुरूशी ‘कनेक्टिव्हिटी’ वाढवण्यात आणि प्रवासाचा वेळ सुमारे पाचवरून फक्त अडीच तासांपर्यंत कमी करण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.“या सर्व प्रकल्पांमुळे प्रदेशातील प्रत्येकाच्या विकासाला गती मिळेल आणि समृद्धीचा मार्ग खुला होईल,” असेही पंतप्रधान म्हणाले.
 
’रोड शो’त पंतप्रधानांवर चहुबाजूंनी पुष्पवृष्टी

पंतप्रधान मोदींनी मंड्यात रोड शो सुरू करताच लोकांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, मोदींनीही जनतेवर पुष्पवृष्टी केली.

जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्मचे उद्घाटन
 
पंतप्रधान मोदी यांनी मंड्या आणि हुबळी-धारवाड या जिल्ह्यात सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली, त्यानंतर त्यांनी श्री सिद्धरुद्ध स्वामीजी हुबळी स्थानकावरील जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म राष्ट्राला समर्पित केला. या प्लॅटफॉर्मची नुकतीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे. प्लॅटफॉर्मची लांबी १,५०७ मीटर म्हणजे सुमारे दीड किलोमीटर आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.