नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला सर्वतोपरी सहकार्य करू - अमित शाह
26-May-2025
Total Views | 14
नागपूर, कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबियांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत व संवेदना जपण्याचे केंद्र म्हणून स्वस्ती निवास ओळखले जाईल, असा विश्वास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.
अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. २६ मे रोजी जामठा परिसरातील स्वस्ती निवास या इमारतीचे भूमिपूजन तसेच कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर, वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, पर्नो रिका इंडियाचे जॉन तुबुल आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, अनेक संस्थांची कार्यपद्धती मी जवळून पाहिली आहे. अनेक संस्थांमध्ये प्रत्यक्ष काम केले आहे. तथापी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे ज्या संवेदनशीलतेने कॅन्सर रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना धीर देत उपचार केले जातात ती भावनिक आपुलकी इतरत्र कमी आढळते. येत्या काळात देशातील सर्वात चांगल्या संस्थेमध्ये नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटची गणना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोठ्या प्रमाणावर मुखकर्करोग आपल्या देशात आढळतो. सर्वाइकल कॅन्सर ही आढळतो. काही वर्षांपूर्वी कॅन्सर हा दुर्धर आजार समजला जायचा. मात्र, आता देशभरात अनेक चांगल्या कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापना झाल्या आहेत. त्यापैकी नागपुरातील कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र राज्यातील रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. या इन्स्टिट्यूटला केंद्राकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील आरोग्य क्षेत्रातील सेवा सुविधा अधिक भक्कम करण्यात येत आहेत. यात नवीन एम्सची निर्मिती, एमबीबीएस विद्यार्थी क्षमतेत वाढ, नवीन रुग्णालयांची निर्मिती व अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री शाह यांनी सांगितले.
'एनसीआय'ला बळकट करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही संस्था देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. येत्या काळात हे ध्येय आम्ही नक्की साकारू. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा रुग्ण आणि कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- कर्करोगावरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना निवासाची चांगली सुविधा निर्माण व्हावी यासाठी स्वस्ती निवासची निर्मिती करण्यात येत आहे. लवकरात लवकर ही व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. इन्स्टिट्युटमार्फत अनेक उपक्रम राबविले आहेत. जागतिक स्तरावर जे सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संस्थेचा आतापर्यंत यशाचा चढता आलेख राहिला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.