हेरगिरीची आरोपी ज्योती मल्होत्रा १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत
26-May-2025
Total Views |
नवी दिल्ली, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला हरियाणाच्या हिसार येथील स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ज्योती मल्होत्राची सुरुवातीची पाच दिवसांची कोठडी गेल्या गुरुवारी संपल्यानंतर न्यायालयाने तिची पोलिस कोठडी चार दिवसांनी वाढवली होती. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या १२ जणांपैकी ती एक आहे. ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणवणाऱ्या ज्योती मल्होत्रावर १९२३ च्या अधिकृत गुपिते कायदाच्या कलम ३ आणि ५ आणि भारतीय न्याय संहिताच्या कलम १५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली सीआरपीएफच्या एका जवानाला अटक केली आहे. एनआयएने निवेदनात म्हटले आहे की मोती राम जाट हा पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी होता आणि २०२३ पासून तो पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षेबाबतची गोपनीय माहिती पुरवत करत होता.
आरोपी मोती राम जाट हा हेरगिरीच्या कार्यात सक्रियपणे सहभागी होता आणि २०२३ पासून तो राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तान गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत (पीआयओ) शेअर करत होता. एजन्सीला असेही आढळून आले आहे की तो पीआयओकडून विविध मार्गांनी निधी मिळवत होता. मोती राम जाटला दिल्लीत अटक करण्यात आली होती आणि त्याला ६ जूनपर्यंत एनआयए कोठडीत पाठवण्यात आले आहे. आरोपीची चौकशी सुरू आहे, असे एनआयएने निवेदनात म्हटले आहे.