कल्याणमधील ‘या’ परिसरात दोन दिवसांपासुन कोल्ह्याचा वावर!
वनविभागामार्फत बचावकार्याचे प्रयत्न सुरू
04-Dec-2023
Total Views | 257
मुंबई (विशेष प्रतिनिधी): कल्याणमधील कोळशेवाडी येथील साई नगर परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासुन कोल्हा असल्याचे आढळुन येत आहे. शुक्रवार दि. १ डिसेंबर आणि शनिवार दि. २ डिसेंबर रोजी हा कोल्हा काही स्थानिकांना दिसला मात्र, बरीच वैशिष्ट्ये कुत्र्यासारखी असल्यामुळे तसाच वाटणारा कोल्हा सुरुवातीला कुणाला ओळखता आला नाही.
एका प्राणीप्रेमी व्यक्तीने त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला असता हा कुत्रा नसल्याचे त्याच्या लक्षात आले. याबाबत वनविभागाला कळवले असता वनविभागाने काही स्थानिक दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज तपासत या कोल्ह्याचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरात मिळालेल्या पंज्यांच्या आधारे या परिसरात कोल्हा असल्याचे समजले अशी माहिती वन्यजीव रक्षक आणि संशोधक सुहास पवार यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. वनविभागाने तात्काळ या कोल्ह्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला असून अद्याप या कोल्ह्याला पकडण्यात आलेले नाही.
रविवार दि. ३ डिसेंबर पर्यंत यश मिळाले नाही तर कोंबिंग ऑपरेशन करुन या कोल्ह्याला पकडले जाईल असे ही त्यांनी सांगितले असून वनविभाग या कोल्ह्याच्या बचावकार्यासाठी संपुर्ण प्रयत्न करित आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत शेड्यूल एक मध्ये येणारी ही प्रजात असून ती बचावकार्य करून पुन्हा वन्य अधिवासात सोडणे गरजेचे आहे. या अनुषंगाने या कोल्ह्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी हा कोल्हा आक्रमक नाही असा खुलासा ही वनविभागाकडुन करण्यात आला आहे. त्यामुळे, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.