३.७५ लाख कोटींची विक्रमी विक्री

    15-Nov-2023
Total Views |
Vocal for local Success in Diwali Fest

दिवाळीच्या निमित्ताने देशभरातील किरकोळ विक्रीने विक्रमी ३.७५ लाख कोटी रुपयांची नोंद केली. किरकोळ विक्रेते तसेच उत्पादनांसाठी ही दिवाळी त्यांच्या चेहर्‍यावर हसू आणणारी ठरली. ‘व्होकल ऑर लोकल’ या पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेला ग्राहकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असे म्हणता येते.

दिवाळीच्या निमित्ताने देशभरात किरकोळ विक्रीने विक्रमी ३.७५ लाख कोटी रुपयांची नोंद केली. देशभरातील किरकोळ विक्रेते तसेच उत्पादकांसाठी म्हणूनच ती विशेष महत्त्वाची ठरली. सोने, वाहनउद्योग, कपडे आदी सर्वच क्षेत्रांत ही वाढ नोंद झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ‘व्होकल फॉर लोकल’ या आवाहनाला देशभरातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने, चीनला एक लाख कोटींहून अधिक रुपयांचा फटका बसला. अद्याप काही सण बाकी असल्यामुळे आणखी ५० हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दिवाळीच्या कालावधीत चीनमध्ये बनवलेल्या वस्तूंना ७० टक्के भारतीय बाजारपेठ मिळत होती. मात्र, यंदा देशातील कोणत्याही व्यावसायिकाने यंदा चीनमधून दिवाळीशी संबंधित कोणतीही वस्तू आयात केली नाही. ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचे हे यश आहे.
 
‘रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार, दिवाळीच्या खरेदीमुळे किरकोळ क्षेत्रातील काही विभागांना, विशेषतः कपड्यांना दिलासा मिळाला, तर ’वर्क फ्रॉम होम’ संबंधित वस्तू, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्राहकोपयोगी वस्तू यांना मागणी राहिली. कपड्यांनाही मागणी राहिली. विशेषतः साड्यांना मागणी राहिली. हातमागावरील तसेच कलाकूसर केलेल्या पारंपरिक साड्यांना विशेष मागणी होती. फार्मसी तसेच दैनंदिन गरजांच्या बाजारपेठांनीही चांगली कामगिरी केली. द्वितीय तसेच तृतीय श्रेणीच्या शहरांमध्येही दिवाळीच्या विक्रीने चांगली नोंद केली आहे. दक्षिण आणि पूर्व भारतातील बाजारपेठांनी पश्चिम तसेच उत्तर भारतांच्या तुलनेत चांगली कामगिरी केल्याचे हा अहवाल सांगतो. महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मागणी चांगली राहिली.

धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५-२५ टक्के वाढ झाली. महानगरे तसेच शहरांमधून सोन्याला वाढती मागणी होती. भारतीय अर्थव्यवस्थेत होत असलेली वाढ, सोन्याच्या गुंतवणुकीत मिळणारा चांगला परतावा; तसेच येणार्‍या लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदीत वाढ झाली, असे मानले जाते. या वर्षी सोन्या-चांदीची नाणी ‘ई-कॉमर्स’ प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्यात आली होती, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. एका ग्राहकाने १०० चांदीच्या नाण्यांची नोंदवलेली मागणी ही ई-कॉमर्समुळे बाजारपेठेला कशी चालना मिळते, याचे चांगले उदाहरण ठरावे. त्याचबरोबर रेफ्रिजरेटस, वॉशिंग मशिन, वातानुकूलित यंत्र यांसारख्या उपकरणांच्या विक्रीतही दहा ते १५ टक्के वाढ झाली. सणासुदीच्या निमित्ताने देण्यात येत असलेल्या सवलती तसेच बाजारपेठेत सादर केलेली नवी उत्पादने यांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. वाहन उद्योगानेही चांगली कामगिरी केली. दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या जोरदार विक्रीने किरकोळ विक्रेते तसेच उत्पादकांना अतिशय आनंद दिला आहे. साथरोगाच्या कालावधीत तसेच त्यानंतरच्या एक वर्षात विक्री मंदावली होती. वाढलेल्या विक्रीमुळे संपूर्ण उद्योगाला बळ मिळाले आहे.

दिवाळीच्या विक्रीतील वाढीला अनेक घटक कारणीभूत आहेत. यात भारतीय अर्थव्यवस्था ७.५ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे, तिचाही हातभार आहे. ग्राहकांच्या खर्चाला चालना देणारा, हा अंदाज ठरला. सोन्यात केलेली गुंतवणूक चांगला परतावा देत असल्यामुळे, तो गुंतवणुकीसाठी आकर्षक पर्याय म्हणून समोर आला आहे. सणासुदीच्या निमित्ताने दिल्या गेलेल्या सवलती तसेच त्यांचा करण्यात आलेला प्रचार ग्राहकांना खरेदीस प्रवृत्त करणारा ठरला. अनेक कंपन्यांनी दिवाळीच्या सुरुवातीला नवीन उत्पादने सादर केली. ही उत्पादनेही ग्राहकांची मागणी वाढवणारी ठरली.

अर्थव्यवस्थेची सकारात्मक वाढ ग्राहकांची भावना बदलणारी ठरली असून, ते पैसे खर्च करण्यास इच्छुक असल्याचे दिसून आले. दिवाळीच्या निमित्ताने झालेली मजबूत विक्री ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अर्थातच सकारात्मक संकेत आहे. येत्या काही महिन्यांत ती कायम राहण्याची शक्यता आहे. दिवाळीतील या जोरदार विक्रीने देशभरातील विक्रेते तसेच उत्पादकांना बळ दिले आहे. विविध क्षेत्रांतील वाढती मागणी हे अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सुधारणा तसेच ग्राहकांच्या वाढत्या भावनांचे प्रतिबिंब आहे. विशेष बाब म्हणजे, बाजारपेठाही गर्दीने ओसंडून वाहत होत्या. तसेच ‘ई-कॉमर्स’ क्षेत्रानेही विक्रीचे उच्चांक स्थापित केले. म्हणूनच सर्व घटकांना सणासुदीच्या हंगामात चांगला प्रतिसाद मिळाला.
 
भारतात सणासुदीचा हंगाम सप्टेंबरच्या मध्यावर गणेश चतुर्थीपासून सुरू होतो आणि तो डिसेंबरपर्यंत चालतो. तसेच या कालावधीत किरकोळ विक्रेत्यांच्या वार्षिक विक्रीत सुमारे ४० टक्के योगदान देतो. एका अहवालानुसार, यावर्षी सणासुदीच्या विक्रीसाठी सकारात्मक दृष्टिकोन असून, ग्राहकांचा उत्साह वाढत असल्याने, किरकोळ विक्रेत्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत किमान दहा ते १२ टक्के वाढ अपेक्षित होती. तथापि, विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीत काढत २०२३च्या हंगामाने नवा विक्रम प्रस्थापित केले. संवत २०८०च्या मुहूर्ताच्या सत्रात ’बीएसई’ निर्देशांक ४०० अंकांनी वधारला, तर ’निफ्टी’ १०० अंकांनी वधारला. मुहूर्ताला शेअर बाजाराने दिलेला सकारात्मक प्रतिसाद भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक प्रतिसाद म्हणून पाहिले जाते.
 
’अ‍ॅमेझॉन’चा विक्रम
 
‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’दरम्यान ‘अ‍ॅमेझॉन’वर १.१ अब्ज ग्राहकांनी भेट दिल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. आजपर्यंतचा हा विक्रम असल्याचे कंपनीनेच म्हटले आहे. यापैकी ८० टक्के ग्राहक हे द्वितीय तसेच तृतीय श्रेणी शहरातील आहेत. ३८ हजारांहून अधिक विक्रेत्यांनी त्यांची आतापर्यंतची सर्वाधिक एक दिवसाची विक्री तसेच १५ लाखांपेक्षा अधिक नवीन ग्राहकांनी त्यांच्या खरेदीसाठी पहिल्यांदाच ‘अ‍ॅमेझॉन’चा वापर केला. या कालावधीत पाच हजारांपेक्षा अधिक नवीन उत्पादने सादर करण्यात आली होती, जी आतापर्यंतची सर्वाधिक होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ‘अ‍ॅमेझॉन’ने अडीचपट जास्त स्मार्टफोनची विक्री केली. त्यापैकी ६० टक्के हे ’५ जी’ फोन होते. सुलभ हप्त्यांचा वापर करून, खरेदी करण्याकडेही कल राहिला. लहान आणि मध्यम व्यवसाय, नवोद्योग तसेच महिला उद्योजकांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच पट अधिक ६ हजार, ५०० विक्रेत्यांसह उत्पादनांची विस्तृत श्रेणी सादर केली.

संजीव ओक 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.