सण-उत्सवात प्रदूषणात वाढ होणे, आता नवीन राहिलेले नाही. न्यायालयाने तंबी दिली. शासनाकडून जनजागृती करण्यात येतच असते. तसेच स्वयंसेवी संस्थादेखील प्रदूषण नियंत्रणाबाबत सक्रिय असतात, तरीही जनमानसातील उदासीन असलेला फार मोठा वर्ग या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून वातावरणात प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत असतो. यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा आवाज काहीसा कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, पर्यावरणवाद्यांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आवाजाची तीव्रता तब्बल २७ टक्क्यांनी वाढल्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी दिवाळीत ७०.१ डेेसिबल आवाजाची तीव्रता नोंदली गेली होती. यंदा मात्र ती ८९.3 डेसिबल असल्याचे निष्पन्न झाले आहे. दिवाळीच्या आधी आणि दिवाळीनंतरची ही आकडेवारी आहे. आवाजाचे प्रदूषण वाढले, त्याचबरोबर त्याची तीव्रताही वाढली. मुंबईत मरीन ड्राईव्ह या उच्चभू्रंच्या क्षेत्रात सर्वाधिक ११७ डेसिबल आवाजाची तीव्रता नोंदली गेली आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी ७२ डेसिबल आवाज असल्याचे ’आवाज फाऊंडेशन’ने केलेल्या नोंदीत म्हटले आहे. वास्तविक आवाजाचे प्रमाण सरासरी ५० ते ५५ दिवसा आणि रात्रीच्या वेळी ४० ते ४५ डेसिबल असणे अपेक्षित आहे. मात्र, दक्षिण मुंबईसारख्या क्षेत्रात दिवाळीच्या कालावधीत सर्वाधिक आवाजाची तीव्रता नोंदवली गेली आहे. वास्तविक या भागात राहणारी मंडळी अधिक सजग, विद्वान असल्याचे म्हटले जात असतानाही, याच भागाने आवाजाच्या प्रदूषणाची पातळी ओलांडली आहे. त्या तुलनेत मुंबई उपनगर तसेच ठाणे, रायगड तसेच ग्रामीण महाराष्ट्रात फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होण्याचे प्रमाण कमी नोंदले गेले आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली. त्याचा परिणाम हवेची गुणवत्ता तसेच आवाजाचे प्रदूषण वाढण्यासही कारणीभूत ठरली आहे. देशातील अन्य महानगरांतील चित्रही असेच आहे. दिल्ली, बंगळुरू या महानगरांतही प्रदूषणाचा स्तर वाढल्याची नोंद झाली आहे. शहरी अधिक सुज्ञ असल्याचे म्हटले जाते. मात्र, तेच अज्ञानी असल्याचे यातून निदर्शनास आले आहे.
देशातील प्रदूषणाचे प्रमाण सातत्याने वाढत असून, राजधानी दिल्लीची नोंद अलीकडेच जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून नोंदली गेली आहे. मुंबईसह अन्य महानगरांतही फारसे वेगळे चित्र नाही. वाढत्या प्रदूषणाबाबत न्यायालयाने हस्तक्षेप करून, फटाके फोडण्याची वेळ ८ ते १० निश्चित केली. ‘प्रदूषण महामंडळ’, विविध स्वयंसेवी संस्था यांनी याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून प्रदूषण वाढेल, असे कृत्य करू नका. सण-उत्सव साजरे करा, आतिषबाजीही करा; पण प्रदूषण वाढणार नाही, न्यायालयाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन शासनानेही केले होते. मात्र, सातत्याने करण्यात येत असलेल्या या आवाहनांकडे दुर्लक्ष करणार्यांचे प्रमाण कायम आहे. न्यायालयाने आदेश देऊनही, त्या आदेशाचे उल्लंघन करण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या. रात्री १० वाजेनंतर अनेक शहरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. त्याचा परिणाम हवेचा गुणवत्ता दर्जा आणखीनच खराब झाला. फटाक्यांमुळे विविध प्रकारची रसायने वातावरणात मिसळली गेली असून, त्याचा प्रभाव अनेक दिवस टिकून राहत असतो. नुकत्याच एका संशोधनात असे निदर्शनास आले आहे की, वातावारणातील प्रदूषणाचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होत असतो. त्यात पशू-पक्ष्यांसह वनस्पतींवरही वातावरणात असलेल्या रसायनांचा प्रभाव दिसून येतो. रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे अनेक पशुपक्षी नामशेष झाले, तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्याची भयावहता प्रचंड आहे, त्यासाठीच न्यायालयासह पर्यावरणप्रेमी आणि शासनाकडून सातत्याने जनजागृती आणि इशारे देण्यात येत असतात. मात्र, त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. यंदाच्या दिवाळीत आधीच वायू प्रदूषणाने उच्चांक गाठला असताना, त्यात दिवाळीतील फटाक्यांच्या अतिरेकाची भर पडली. दिवाळीनंतर करण्यात आलेल्या पाहणीत हवेत बेरियम या घातक रसायनाचे प्रमाण वाढल्याचे निष्पन्न झाले आहे. सण-उत्सव साजरे करताना नियमात व्हावे, आतिषबाजी जरूर करावी. मात्र, पर्यावरणाला हानी होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. मात्र, तसे होताना दिसत नाही, ही फार मोठी शोकांतिका भारतासाह सर्वच देशांत दिसून येते.