मुंबई : बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध संप्रदायाची दीक्षा नागपूर येथील दीक्षाभूमीवर घेतली तेव्हा आपल्यासोबत हजारो नागरिकांनाही ती मिळवून दिली. हा दिवस होता विजयादशमी आणि तारीख होती १४ ऑक्टोबर. या दिवशी दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून अनेक बौद्ध संप्रदायाचे अनुयायी बाबासाहेबांना आणि गौतम बुद्धांना वंदन करण्यासाठी दीक्षाभूमीला भेट देतात. यादिवशी दीक्षाभूमी केवळ माणसांनी गजबजून जातं नाही तर अनुयायायांचा हा मेळावा असतो. दीक्षाभूमीला जत्रेचं स्वरूप येतं.
अनुयायी येताना आपल्या पोतडीत भाकऱ्यांची शिदोरी घेऊन येतात आणि पार्ट जाताना येथील ग्रंथ विक्री ठेल्यांवरचे ज्ञानरूपी शिदोरी आपल्या पोतडीत घेऊन जातात. दरवर्षी या दिवशी बाबासाहेबांच्या साहित्याची विक्रमी विक्री होते. यावर्षीही आंबेडकरांच्या लेखांवरचे समीक्षणात्मक लेख आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीला गेलं.