मुंबई : महाराष्ट्राच्या मातेचा सिंहासनी राजा, छत्रपती शिवाजी महाराज आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर साजरे होणार आहेत, पण यावेळी एका वेगळ्याच दृष्टिकोनातून! महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित आणि सिद्धार्थ बोडके अभिनित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्याने अक्षरशः मनात वादळ उठवलं आहे.
आषाढी एकादशीच्या मंगलदिनी, विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने पावन झालेल्या महेश मांजरेकरांनी हा टीझर रिलीज केला. चित्रपटाचे निर्माते राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध असून, हा सिनेमा या येणाऱ्या दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. “राजं… राजं…” – त्या दोन शब्दांतून उठणारा इतिहासाचा हुंकार
टीझरची सुरुवात होते ती भारावलेल्या आवाजात उच्चारल्या गेलेल्या “राजं… राजं…” या दोन शब्दांनी. हे शब्द ऐकताच, एक अदृश्य लाट मनातून पसरते आणि अंगावर काटा येतो. त्यात मिसळलेला अभिनेता सिद्धार्थ बोडकेचा शिवरायांच्या भूमिकेतील आवाज, भावभावना आणि डोळ्यांतून झळकणारा तेज, यामुळे ते क्षण निव्वळ दृश्य न राहता अनुभूती बनतात.
त्याच्यासोबत दिसणारी बालकलाकार त्रिशा ठोसर आपल्या निरागस पण तीव्र भावनांनी कथा अधिक खोलवर नेत आहे.
दिग्दर्शक महेश मांजरेकर सांगतात,
“‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा शिवाजी महाराजांचा गौरवगाथा सांगणारा असला तरी, तो फक्त ऐतिहासिक घटनांमध्ये अडकलेला नाही. हा चित्रपट आजच्या काळाशी नातं जोडतो. समाजातील अस्वस्थता, दिशाहीनता, आणि निराशा यांना शिवरायांच्या विचारांनी उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे.” नव्या पिढीसाठी नव्या पद्धतीनं शिवराय
या चित्रपटात शिवाजी महाराजांचा अभिजात इतिहास तर आहेच, पण त्याबरोबरच त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसून येतो. महेश मांजरेकरांनी या भूमिकेला भूतकाळात अडकवून ठेवण्याऐवजी, एक चालतं-बोलतं, श्वास घेणारं ‘विचार’ म्हणून सादर करण्याचं धाडस केलं आहे.
दिवाळीत होईल नवा स्फोट , प्रेरणेचा!
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाच्या टीझरने जेवढा इतिहास जागवला, तेवढाच तो आजचं वास्तव भिडवतो. दिवाळीमध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल, तेव्हा तो केवळ मनोरंजन करणारा सिनेमा न राहता, शिवाजी महाराजांच्या विचारांची पुन्हा एकदा प्रज्वलित होणारी ज्वाला ठरेल, अशी मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.