कोकणातील सुप्रसिद्ध Red Soil Stories युट्यूब चॅनलच्या शिरीष गवस यांचं दुःखद निधन!

    02-Aug-2025   
Total Views |


मुंबई : ‘रेड सॉईल स्टोरीज’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कोकणातील पारंपारिक ग्रामीण जीवनशैली आणि खाद्यसंस्कृती अनोख्या पद्धतीने जगासमोर आणणाऱ्या शिरीष गवस यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पूजा गवस, लहान मुलगी, आईवडील आणि बहिण असा परिवार आहे. या बातमीमुळे शिरीष गवस आणि पूजा गवस या जोडप्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. शिरीष गवस यांच्या निधनाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाकाळात सगळं ठप्प झालं असताना मुंबईतील उच्चशिक्षित असलेले शिरीष आणि त्यांच्या पत्नी पूजा यांनी एक धाडसी निर्णय घेतला. दरम्यान, शिरीष हे आयटी क्षेत्रात कार्यरत होते तर, पत्नी पूजा या चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत होत्या. कोरोनामुळे सगळी कामं थांबली, अशात या दोघांनीही कोकणातील सिंधुदुर्गातील आपल्या सासोली पाट्ये या गावात जाऊन स्थायिक होण्याचे ठरवले.

त्यानंतर ‘रेड सॉईल स्टोरीज’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गावातील जीवनशैली, तिथली खाद्यसंस्कृती, लोकांचे दैनंदिन जीवन, त्यात येणारी आव्हाने, गमतीजमती या सगळ्या गोष्टी गवस दाम्पत्याने लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे हे युट्यूब चॅनल अल्पावधीतच लोकप्रिय झाले. सध्या त्यांच्या चॅनेलचे ४ लाख २७ हजार सबस्क्राइबर्स आहेत.

माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, शिरीष गवस हे काही दिवसांपासून मेंदूंशी निगडित आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर गोव्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती मिळत आहे. मात्र अखेर त्याचा दुःखद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\