अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित; खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा!

    11-Jul-2025
Total Views |



all india marathi natya parishad, mumbai organized; open state-level one-act play competition


मुंबई : रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित, शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला 'नाट्यकलेचा जागर' दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यंदा पुन्हा राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा महोत्सव म्हणजेच 'नाट्य परिषद करंडक' आयोजित करण्यात आला आहे असे परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी हा स्पर्धात्मक महोत्सव राज्यस्तरावर आयोजित केला असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे. मागील वर्षी 'नाट्यकलेचा जागर' हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर यशस्वीरित्या सादर झाला. यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा यांचा समावेश होता. यावर्षी पासून दरवर्षी 'नाट्य परिषद करंडक' ह्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ व कार्यकारी समितीने ठरविले आहे.

ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अश्या दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. शनिवार दिनांक २३ ऑगस्ट २०२५ व रविवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२५ पासून विविध केंद्रांवर प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक २५ कलाकृतींची अंतिम फेरी मुंबई येथे दिनांक १५, १६, १७ व १८ सप्टेंबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, माटुंगा - माहीम, मुंबई येथे होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकांकिका स्पर्धा घेण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे. ज्या जिल्ह्यातून किमान १० प्रवेशिका येतील त्याठिकाणी स्पर्धेचे केंद्र देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या मधून मिळणार आहे.
स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी रोख पारितोषिके
एकांकिका स्पर्धा सर्वोत्कृष्ट प्रथम रु.१,००,०००/-,
उत्कृष्ट द्वितीय रु.७५,०००/-, उत्तम तृतीय रु.५०,०००/,
दोन उत्तेजनार्थ पारितोषिके रु.१५,०००/-
 
तसेच लेखन/दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/रंगभूषा व वेशभूषा/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय वैयक्तिक रोख पारितोषिके (एकांकिका स्पर्धेसाठी) रु.७,०००/-, रु.५,०००/-, रु.३०००/- देण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस सहभाग घेणाऱ्या संस्थांना सादरीकरण मानधन रु.२०००/- रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी कलावंत, तंत्रज्ञ यांना सहभागपत्र देण्यात येणार आहे. एकांकिकेसाठी प्रवेश फी रु.१०००/- ठेवण्यात आली आहे.

या स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून एकांकिका स्पर्धेची माहिती,
नियमावली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ दिनांक १० ऑगस्ट २०२५ सायंकाळी ०७:०० वाजेपर्यंत आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ८५९१७०६८८७ या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, महाविद्यालय, हौशी संस्था, विद्यापीठाच्या व इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.