कोल्हापुरी चपलांवरून वादंग! करीना कपूरने प्राडा ब्रँडला झोडपलं; “ही प्राडा नाही, माझी मूळ कोल्हापुरी आहे”

    06-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिने प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड प्राडा यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत एक ठाम आणि अभिमानास्पद भूमिका घेतली आहे. कोल्हापुरी चपलांच्या डिझाईनची नक्कल केल्याचा आरोप प्राडा ब्रँडवर झाल्यानंतर करीना कपूरने सोशल मीडियावरून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?


प्राडा या नामवंत ब्रँडने आपल्या नव्या कलेक्शनमध्ये काही सॅंडल्स सादर केल्या आहेत, ज्या पारंपरिक कोल्हापुरी चपलांसारख्या दिसतात. या डिझाईनमध्ये पारंपरिक भारतीय शिल्पकलेचा स्पष्ट प्रभाव असूनही, या डिझाईनला भारतीय मूळ असलेलं श्रेय प्राडाने दिलं नाही.

यामुळे सांस्कृतिक अपप्रयोग (सांस्कृतिक चोरी) आणि भारतीय परंपरेचा वापर केवळ व्यावसायिक फायद्यासाठी केल्याचा आरोप प्राडावर होत आहे.

करीना कपूरचा ठाम संदेश


रविवारी करीना कपूरने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती स्वतः पारंपरिक कोल्हापुरी चपला घातलेली दिसते. फोटोमध्ये तिचा चेहरा दिसत नव्हता, परंतु चपलांवर लक्ष केंद्रित केलं गेलं.

प्राडाविरुद्ध न्यायालयात याचिका

प्राडाच्या या डिझाईनविरोधात आता बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये कोल्हापुरी चपलांचे डिझाईन चोरले गेले असून, कारागिरांना कोणतेही श्रेय न देता फक्त व्यवसायासाठी वापरले गेले, असा आरोप करण्यात आला आहे.

याचिकेत पुढील मुद्दे मांडले गेले आहेत :

• कोल्हापुरी चपलांचे डिझाईन हे शतकानुशतकांपासून चालत आलेलं भारतीय परंपरेचं प्रतीक आहे.

• या चपला तयार करणारे कारागीर महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागांमध्ये आजही मेहनतीने हा वारसा जपत आहेत.

• त्यामुळे या डिझाईनचा वापर करताना मूळ कलाकारांना श्रेय आणि योग्य भरपाई मिळणं आवश्यक आहे.

समाजमाध्यमांवर चर्चा आणि लोकांचा रोष


करीनाच्या या स्टोरीनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. अनेक वापरकर्त्यांनी प्राडावर टीका केली असून, भारतीय परंपरेचा सन्मान राखण्याची मागणी केली आहे.

कोणी म्हणालं, “भारतीय वस्त्र आणि शिल्प परंपरा यांचं श्रेय आंतरराष्ट्रीय ब्रँडने लाटणं चुकीचं आहे,” तर काहींनी करीना कपूरचे समर्थन करत लिहिलं, “आपली संस्कृती फक्त ‘प्रेरणा’ म्हणून वापरली जाऊ नये, तर ती जपली आणि ओळखलीही जावी.”



अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.