मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावरून गायब आहे. २०१७ मध्ये आपल्या पहिल्या बाळंतपणानंतर दिशाने मालिकेपासून विश्रांती घेतली आणि त्यानंतर ती पुन्हा परतलीच नाही. प्रेक्षक मात्र आजही तिच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत.
दिशा वकानी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसली, तरी नुकतेच तिचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आणि पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. दोन मुलांची आई झाल्यानंतर दिशाचा संपूर्ण लूक आणि व्यक्तिमत्त्वात मोठा बदल झाल्याचं या फोटोंमधून स्पष्टपणे जाणवतं. ती सध्या आपल्या कौटुंबिक आयुष्यात रमली असून, ग्लॅमरपासून थोडी दूरच आहे.
व्हायरल फोटोंमध्ये दिशा पारंपरिक गुजराती लूकमध्ये साडी नेसलेली दिसते. तिच्या हातात एका गोंडस मुलीचा हात आहे, त्यामुळे ही मुलगी तिचीच मुलगी आहे का, यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. हा फोटो कुठल्या खास कौटुंबिक कार्यक्रमातला वाटतो, आणि दिशाच्या चेहऱ्यावरचं समाधान या चित्रातून सहज जाणवतं.
गेल्या काही वर्षांतील तिचं ट्रान्सफॉर्मेशन चाहत्यांसाठी आश्चर्यकारक ठरतंय. दयाबेनच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, अनेकांनी तिच्या पुनरागमनाची आशा व्यक्त केली आहे. “दिशा परत यावी,” अशी भावना कमेंट्समध्ये सातत्याने दिसून येते. सध्या तरी तिच्या पुनरागमनाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण दिशा वकानीचा हा नव्या रुपातील फोटो चाहत्यांसाठी एक सुखद धक्का ठरला आहे, एवढं मात्र नक्की!
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.