पाकिस्तान रेल्वेची रडकथा...

    03-Jan-2023   
Total Views |
railway service in Pakistan


एकीकडे ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी)ने पाकिस्तानमध्येच ‘जिहाद’ छेडण्याची दिलेली धमकी आणि दुसरीकडे या देशाची ढासळती अर्थव्यवस्था, अशा दुहेरी संकटात हा देश सापडलेला दिसतो. त्यामुळे पाकिस्तानचे केवळ राजकीय आणि सामाजिक वातावरणच नाही, तर अर्थकारणही पूर्णपणे कोलमडले आहे. त्याचीच झळ आता पाकिस्तानी रेल्वेलाही बसली असून पुढील काही दिवसांत देशातील रेल्वेसेवाच ठप्प होण्याची भीती सरकारी अधिकार्‍यांनी नुकतीच वर्तविली.पाकिस्तानमध्ये रेल्वेचे भारतासारखे विद्युतीकरण प्रगतीपथावर नाही. त्यामुळे येथील रेल्वेसेवा ही इंधनावरच अवलंबून. पण, रेल्वे मंत्रालयाने सांगितल्यानुसार, त्यांच्याकडे पुढील तीन दिवस पुरेल इतकाच तेलसाठा उरल्याने आता देशभरातील रेल्वेसेवा ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री ख्वाजा साद रफिक यांनी रेल्वेसाठी तेलाचे साठे कमी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे साहजिकच देशाच्या तिजोरीची अवस्था बिकट असून, रेल्वे मंत्रालयालाही आता हा बोजा सहन होत नाही, असेच दिसते. पण, ही काही आजच अचानक उद्भवलेली स्थिती नाही. काही दिवसांपूर्वी असाच पाकिस्तानी रेल्वेकडे एक दिवस पुरेल इतकाच तेलसाठा उपलब्ध होता. परिणामी, कराची आणि लाहोरसारख्या महत्त्वाच्या शहरांतील प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वेसेवा ठप्प पडली होती. आताही तशीच परिस्थिती उद्भवली तर पुन्हा एकदा पाकिस्तानी रेल्वेसेवाही गोठलीच म्हणून समजा.

त्यातच पाकिस्तानी रेल्वेचे कंबरडे आधीच इतके मोडले आहे की, कर्मचार्‍यांना पगार द्यायलाही सरकारच्या तिजोरीत खडखडाटच. त्यातच गेल्या वर्षभरातील निवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांची ग्रॅच्युईटी, निवृत्तीवेतनही अजूनही थकलेले. जी गत निवृत्त कर्मचार्‍यांची, तीच अवस्था विद्यमान कर्मचार्‍यांचीही. त्यांचेही पगार द्यायला पाकिस्तानी रेल्वेकडे दमडी नाही. म्हणूनच देशभरात रेल्वे चालकांनी सरकार विरोधात निदर्शने करत संपही पुकारला होता. पण, त्यानंतरही तिजोरी रिकामीच असल्याने हतबल असलेल्या या सरकारला काहीही ठोस कृती करता आली नाही. त्यातच गेल्या काही काळात कोळशाच्या वाहतुकीतून रेल्वेला मिळणारे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले. अफगाणिस्तानातून कोळशाची आयात करण्याचा निर्णय यासाठी कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. तसेच गेल्या वर्षी आलेल्या महापुराने तर पाकिस्तानी रेल्वेचे कंबरडेच मोडले.

 रुळांपासून ते अगदी सिग्नल यंत्रणेपर्यंत सगळेच पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पाकिस्तानी रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अजूनही पाकिस्तानी रेल्वे या संकटातून सावरलेली नसताना आता इंधनटंचाईच्या भीतीने ही संपूर्ण सेवाच पुन्हा एकदा कोलमडण्याच्या मार्गावर आहे.पाकिस्तानी रेल्वेची पायाभरणीही १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी केली. १८५८च्या सुमारास कराची ते कोटरी या मार्गावर पहिली पाकिस्तानी रेल्वे धावली. त्यानंतर अनेक खासगी कंपन्यांनी विशेष करून मालवाहतुकीसाठी पाकिस्तानी रेल्वेचा वापर केला. पण, प्रारंभीपासून रेल्वेसेवेकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आजही या देशात रेल्वेचे जाळे हे फक्त ११ हजार किमींपर्यंत मर्यादित आहे. याउलट भारतीय रेल्वेचे जाळे हे ६८ हजार,१०३ किमी इतके असून जगात भारतीय रेल्वेचा विस्ताराच्या बाबतीत चौथा क्रमांक लागतो.

परंतु, पाकिस्तानमध्ये प्रवासीसंख्या जास्त असूनही रेल्वेच्या आधुनिकीकरणाला दुर्दैवाने गतिमान करता आले नाही. त्यातच पाकिस्तानी रेल्वेमध्ये चीनचीही मोठ्या प्रमाणात भागीदारी असून, चिनी कंपन्यांकडूनच देशातील रेल्वे डब्बे, इंजिन यांची आयात केली जाते. नुकतेच चीनमधून पाकिस्तानने हायस्पीड रेल्वेसाठी अशाच ४६ डब्ब्यांचीही आयात केली. त्यावरूनही आधीच रेल्वेसेवा डबघाईला आलेली असताना, रेल्वेची, स्थानकांची अवस्थाही बिकट. तरीही केलेल्या या वायफळ खर्चावरून सरकारला चहूबाजूने टीका सहन करावी लागली.एकूणच काय तर जवळपास वार्षिक सहा कोटी प्रवाशांची ने-आण करणारी पाकिस्तानची रेल्वे सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानात रेल्वेच्या खासगीकरणाच्या चर्चांनी वेग घेतला असून सरकारला धारेवर धरले आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची