स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस

    22-Jan-2023
Total Views |
subhash chandra bose

आज दि. २३ जानेवारी... सुभाषचंद्र बोस यांच्या आजच्या १२६व्या जयंती निमित्ताने स्वातंत्र्यसंग्रामाच्या या महानायकाचे स्मरण करत, त्यांच्या काबुल ते रशियामार्गे बर्लिनपर्यंतच्या चित्तथरारक अनुभवांचे हे शब्दचित्रण...

 
सुभाषबाबूंचे प्रयाणवृत्त दि. २६ जानेवारी, १९४१ पर्यंत गुप्त ठेवण्यात सर्व संबंधित व्यक्तींनी खूप जबाबदारीने साथ दिली. दि. २७ जानेवारीला त्यांना न्यायालयात हजर होणे आवश्यक होते. त्यामुळे खूप नियोजनपूर्वक ते घरून निघून गेले आहेत. कुठे गेले आम्हाला काहीच माहीत नाही. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी आम्हाला मदत करावी, अशी पोलीस खात्याला विनंती करण्यात आली. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. पोलीस शोध घेऊच शकत नव्हते.सुभाषबाबूंच्या या अनपेक्षित अज्ञातवासामुळे सारा देश भारावून गेला. सर्वत्र चर्चा फक्त सुभाषबाबू, सुभाषबाबू आणि सुभाषबाबू...


दुसरा कोणता विषयच नाही किंवा अन्य नेत्याचे कुणाच्या तोंडी नाव नाही. त्यांचे खच्चीकरण करणारे नेतेच तोंडघशी पडले. सुभाषबाबूंचा द्वेष करणे भल्याभल्यांना महागात पडणार याची जाणीव प्रत्येकाला होऊ लागली. खरंच लोकविलक्षण साहस म्हणतात ते हेच. असे साहस खूप दुर्मीळ, सहजासहजी पाहावयास मिळणार नाही. भारतमातेच्या मुक्तीसाठी अधीर झालेला एखादाच तिचा लाल हे धाडस करू शकतो.


कुठे गेले असतील सुभाषबाबू? लोकांच्या मनातील त्यांची प्रतिमा किती उंचावली? नाही... नाही...सांगताच येणार नाही. त्या प्रतिमेची उंची. अशक्य, अवर्णनीय अनाकलनीय.सरकारची खूपच दयनीय अवस्था झाली. आपल्या गुप्तचर खात्याबद्दल अतिगर्वाने बोलत असताना शासकीय प्रवक्त्याची छाती फुगून ती फुटते की काय, अशी शंका निर्माण होत असे. एवढ्या जागृत आणि भव्य व्यवस्थेचे चक्रव्यूह फोडून हुलकावणी देणे हे केवळ असाध्य. पण, ते साध्य केले सुभाषबाबूंनी. केवळ दृढ निश्चयाच्या बळावरच हा महामानव हे शिवधनुष्य उचलू शकला.

दि. २७ जानेवारी, १९४१ कोलकात्त्याच्या न्यायालयात त्यांना हजर राहणे आवश्यक होते. राजद्रोहाचा आरोप असल्यामुळे पोलीस अधिकारी जार्विनच्या अंगाची लाहीलाही झाली. आपल्या सहकारी पोलिसांवर त्याचे नुसते किंचाळणे सुरू होते. ‘’सुभाषचंद्र बोस यांना ताबडतोब शोधून काढा आणि माझ्यासमोर उभे करा. यावेळी त्यांची कोणतीच अडचण मी ऐकून घेणार नाही. बेड्या ठोकून त्यांना लॉकअपमध्ये टाकतो.” या सूक्ष्म प्राणिमात्राला एका गोष्टीची कल्पना नव्हती की, आपण जे बोलतोय ते आपल्यालाच काय, पण आपल्या सरकारलाही शक्य नाही. त्याला हवा असलेला हा वीरपुत्र केव्हाच अटकेपार जाऊन पोहोचला होता.



subhash chandra bose


पेशावर ते काबुल अनेक अडचणींवर मात करीत सुभाषबाबू काबुलपर्यंत पोहोचले. डोंगराळ भाग असल्यामुळे काही भाग पायी, तर काही खेचरावर बसून, कधी खेचरावरून घसरून पडण्यातही आनंद मानणारे सुभाषबाबू. अंगाला मार लागल्यावर होणार्‍या ठणका, पायी प्रवासामुळे येणारा थकवा, मिळेल ते अन्न खाऊन पुढे चालण्याची त्यांची तयारी. प्रवासात संशयाने पाहणार्‍यासमोर मुक्या-बहिर्‍याचा बेमालूम अभिनय सुभाषबाबू करायचे. भारतमातेच्या मुक्तीसाठी हा सर्वश्रेष्ठ नाट्याविष्कार आणि अविश्रांत मेहनत. भगतराम भारावून गेला. तो मनाशीच विचार करायचा एवढा मोठा माणूस, पण या मोठेपणाचा आव आणणे या माणसाला कधी जमले नाही. त्याची कधी गरजही वाटली नाही. पायी चालणे, खेचरावर बसणे, मालमोटारीतून प्रवास करणे, मिळेल ते खाणे, जमेल त्या ठिकाणी मुक्काम करणे, प्रकृती स्वास्थ्य नसताना चेहर्‍यावर त्रासिक भाव नाही.



जे सोसायचे आहे ते अगदी आनंदाने. कशाचीही तक्रार नाही. अनेक मोठी माणसे पाहिली, पण भारतमातेचा तळपता सूर्य अनुभवतोय फक्त सुभाषबाबूंच्या सहवासातच! मोठे म्हणून ओळखले जाणारे अनेक पाहिले - ढोंगी, नाटकी, बदफैली, भ्रष्ट, चारित्र्यहीन केवळ इंद्रिय सुखाचा आनंद घेऊन जनमानसात मोठेपणा मिरवणारे नेते म्हणजे राजकारणाला लागलेली कीड. देशाला गिळंकृत करणार्‍या मगरीच त्या. आपण सुभाषबाबूंच्या सहवासात आहोत, याचा त्याला आणखीच अभिमान वाटला. तो मनाशीच म्हणायचा, “भगतराम तेरा मानवीजीवन धन्य हो गया।”


काबुलला पोहोचल्यावर कसलीच व्यवस्था नसल्यामुळे सुरुवातीला त्यांनी एका धर्मशाळेचा आश्रय घेतला. अनेक अडचणींवर मात करीत दिवस काढणे, रशियन वकिलातीमार्फत मास्कोला जाण्यासाठी प्रवासी परवाना काढण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे सुरू होते. जानेवारी महिना म्हणजे कडाक्याची थंडी.काबुलमध्ये रात्री बर्फ पडे. पण, काही वेळेस दिवसाही बर्फ पडे. रस्त्यात दीड दोन फुटांचा बर्फाचा थर. सराईत काबुली माणूसही त्या पांढर्‍या चिखलातून चालू शकत नसे. सुभाषबाबू या सर्व वातावरणाला अपरिचित.कातड्याच्या बुटातून गार पाणी आत शिरायचे. पायमोजे ओलेचिंब झाल्यामुळे पायाची बोटे गारठून गेलेली असायची. पाऊल पुढे टाकताना दमछाक व्हायची.निसरड्या रस्त्यावरून पाय घसरून तोल जायचा.सुभाषबाबूंचे पठाणी वेशातील नाव मोहम्मद झियाउद्दीन आणि भगतराम तलवारचे नाव रहमत खान.वारंवार रशियन वकालतीकडून निराशा पदरी पडायची तेव्हा सुभाषबाबू म्हणायचे, “रहमत खान, अब क्या होगा?”


भगतराम : बाबूजी, सब ठीक होगा।
 
सुभाषबाबू : कब होगा?
 
भगतराम : आज नही तो कल।

या संवादामुळे सुभाषबाबूंच्या मनावरचा ताण कमी व्हायचा. मध्यंतरीच्या कालावधीत मूळ पेशावर येथील उत्तमचंद मल्होत्रा आणि त्यांची पत्नी रामोदेवी अलीकडे काबुलनिवासी झालेले होते. त्यांनी सुभाषबाबूंना आपल्या घरात फार मोठी जोखीम पत्करून निवारा दिला. (पुढे त्याची फार मोठी किंमत या जोडप्याला चुकवावी लागली.) अथक प्रयत्नांती इटालियन वकिलातीमार्फत जर्मन अधिकारी सिन्योरा कारोनी यांनी सुभाषबाबूंना बर्लिनला पाठवण्याची व्यवस्था केली.





subhash chandra bose


दि. १७ जानेवारीला सुभाषबाबूंनी कोलकाता सोडले होते. असंख्य अडचणींवर मात करीत त्यांना १८ मार्च १९४१ पर्यंत काबुलमध्येच थांबावे लागले.उत्तमचंद आणि रामोदेवीचे त्यांनी मनापासून आभार मानले. सुभाषबाबूंनी भगतरामला घट्ट मिठी मारली. हुंदका आवरणे दोघांनाही शक्य नव्हते. दोन महिन्यांच्या सहवासात भगतराम सुभाषबाबूंच्या व्यक्तित्वाचा अविभाज्य भाग बनला होता. सुभाषबाबू चेहर्‍यावर बळेच हास्य आणत म्हणाले, “रहमत खान, आखीर सब ठीक हुआ।”

भगतराम म्हणाला, “उपरवाले की मेहरबानी। खुदा हाफिज।”
दि. १८ मार्चची सकाळ. एक आलिशान गाडी ‘क्रिच्शिनी’ या इटालियन दूतावासाच्या बंगल्यासमोर उभी राहिली. त्या गाडीत एक जर्मन अधिकारी व एक इटालियन प्रतिनिधी बसला होता. त्यांच्या सोबतीनं सुभाषचंद्र काबुलबाहेर पडले. दि. २० मार्चला रशियाच्या हद्दीत प्रवेश करून रेल्वेने मॉस्कोला आणि तिथून पुढे विमानाने ते बर्लिनला पोहोचले. पासपोर्टवर त्यांच्या छायाचित्राखाली त्यांनी धारण केलेलं नवे नाव होते - ऑरलंदो मॅझोत्ता. सुभाषचंद्र बोस उर्फ मोहम्मद झियाउद्दीन उर्फ आरलंदो मॅझोत्ता काबुलमधून बाहेर पडले. दि. १७ जानेवारी ते दि. १८ मार्च, १९४१ हे दोन महिने त्यांना दोन तपासारखे भासले. स्वशांतीसाठी ऋषींनी केलेल्या तपस्येपेक्षा सुभाषबाबूंची साधना खरंच खूप मोठी होती. ही साधना भारतमातेच्या मुक्तीसाठी, तिच्या कोट्यवधी गुलाम अपत्याच्या दुःखसमाप्तीसाठी, त्यांच्या गुलामी मानसिकतेचे दहन करून त्यांच्यात स्वाभिमान, अस्मिता, आत्मसाक्षात्कार निर्माण करण्यासाठी ही साधना, हा संघर्ष आणि हा लढा त्यासाठीच होता.



म्हणूनच स्वतःचे काय होईल याची चिंता कुठे होती? या महानायकाला प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षणाला या दोन महिन्यांत सतत एकच ध्यास होता. बर्लिनला पोहोचून कधी एकदा हिटलरची भेट घेतो. त्यासाठी सर्व प्रकारचे धोके पत्करून कार्यतृप्तीचा आनंद घेणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. असीम त्यागाचा आनंद, समर्पणाचा आनंद, प्रचंड घोंगावणार्‍या वादळात स्वतःला झोकून देण्याचा आनंद. या रणझुंजार महानायकाचा आनंदच सर्वस्वी आगळा नि वेगळा. आम्ही पामरांनी तो कसा शोधावा? दि. २३ जानेवारी, २०२३ या त्यांच्या १२६व्या जयंती निमित्ताने स्वातंत्र्यसंग्रामाच्या या महानायकाला विनम्र अभिवादन.



-प्रा. वसंत गिरी




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.