केडीएमसी क्षेत्रात आषाढी एकादशी उत्साहात साजरी विठू नामाच्या गजरात दुमदुमली नगरी

    06-Jul-2025   
Total Views |

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे उल्हासनगर येथील बिर्ला मंदीर रविवारी सकाळपासून विठ्ठनामाचा गजरात नाहून निघाले होते.

बिर्ला मंदिर हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशी निमित्त बिर्ला मंदिरात महापूजेचे आयोजन केले होते. उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे आणि केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सहकुटुंब विठ्ठल रूख्मिणीच्या महापूजेस उपस्थित राहून निष्ठा आणि श्रध्दा व्यक्त केली. मंदिरात पहाटे पाच वाजता अभिषेक,सहा वाजता आरती, भाविकांच्या साक्षीने पार पडली. मंदिर परिसर टाळ-मदृंगाच्या गजरात न्हालेला दिसून आला. या महापूजेस सेंचुरी रेऑन कंपनीचे ओमप्रकाश चितलांगे, दिग्विजय पांडे आणि श्रीकांत गोरे आणि सेच्युरियन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका हे उपस्थित होते.

विठ्ठल नामाच्या जयघोषात, भक्तांनी आपल्या श्रध्देचे दर्शन घडवत पुन्हा एकदा या मंदिराला पंढरीची अनूभूती दिली. बिर्ला मंदिरात साजरी झालेली आषाढी एकादशी एक भक्तीपूर्ण, मंगलमय, आणि संस्मरणीय पर्व ठरले आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण विठूंच्या नामस्मरणात तल्लीन

कल्याण डोंबिवलीत ही आषाढी एकादशी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे हरी ओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ यांच्यातर्फे आयोजित केलेल्या आषाढी एकादशी सोहळयात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे विठूनामाच्या नामस्मरणात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.

डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या बाहेर गेल्या अनेक वर्षापासून आषाढी एकादशी सोहळा आयोजित केला जात आहे. दरवर्षी या सोहळयाला आमदार चव्हाण आवुर्जन उपस्थित असतात. चव्हाण यांनी सकाळी सात वाजता पाडुरंगाचे दर्शन घेतले. तसेच भजनी मंडळात सहभाग होऊन ते स्वत: भजन गायला बसले. चव्हाण यांनी भजन सादर करत ते पाडुरंगांच्या नामस्मरणात तल्लीन झाले होते. रेल्वे प्रवासी देखील भजनात सहभागी होतात. त्यानंतरच रेल्वे पक डून आपल्या नोकरीच्या ठिकाणी जातात. ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते रेल्वे स्थानकाबाहेरील आषाढी एकादशीच्या सोहळ्य़ात सहभागी होतात. महाराष्ट्राला सर्व संकटापासून दूर ठेवावे असे साकडे चव्हाण यांनी पाडुरंगाच्या चरणी घातले आहे. पंढरपूरच्या मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे यावर बोलताना चव्हाण म्हणाले, सामान्यांच्या दृष्टीकोनातून जे जे निर्णय घेणे आवश्यक असतात. त्यामुळे त्या दृष्टीकोनातून हे सरकार निर्णय घेत असतात असे सांगितले.

भारत विकास परिषदेतर्फे अडीच हजार तुळशी रोपांचे वाटप

भारत विकास परिषद, कॅप्टन विनयकुमार सचान डोंबिवली शाखेतर्फे सालाबादप्रमाणे तुळशी वाटप करण्यात आले. यावेळी अडीच हजार रोपांचे वाटप केले. डोंबिवलीमधील गणेश मंदिर संस्थान, एमआयडीसी मिलापनगर गणेश मंदिर, गोविंदानंद श्रीराम मंदिर (आफळे मंदिर), पी.एन.टी येथील हनुमान मंदिर या मंदिरात संस्थेचे सभासद सकाळपासूनच उपस्थित होते. त्यांनी तुळशीच्या रोपांचे वितरण केल्याची माहिती अध्यक्षा वृंदा कुलकर्णी यांनी दिली. यावेळी संस्थेचे जुने आणि नवे कार्यकर्ते उपस्थित होते.