भय इथले संपत नाही...

    21-Sep-2022   
Total Views |
mumbai
 
 
महाराष्ट्रात अजूनही मान्सूनच्या पावसाने उसंत घेतली नसून काही जिल्ह्यांना पावसाने पुरते झोडपले. तेव्हा, पूरस्थितीबरोबरच धोकादायक इमारती अथवा अशा इमारतींचे भाग कोसळण्याचे प्रकारही ऑगस्ट आणि आता सप्टेंबर महिन्यातही घडले. तेव्हा, गेल्या काही वर्षांत घडलेल्या या घटनांमुळे ‘भय इथले संपत नाही...’ ही वर्षानुवर्षांची जीवघेणी स्थिती अद्याप कायम असल्याचेच विदारक चित्र दिसून येते. त्याविषयी...
 
 
पावसाळ्याचा मोसम सध्या सुरू आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे इमारती पडण्याच्या व पाडण्याच्या घटनांमध्ये मुंबई व आसपासच्या परिसरातही कमालीची वाढ झालेली दिसते. खरंतर अशा दुर्घटनांमधून वेळोवेळी बोध घेऊन बिल्डरने, इमारतीतील रहिवाशांनी वा महानगरपालिकेने योग्य ती काळजी घेणेच अपेक्षित. परंतु, दुर्देवाने अशी शेकडे घटना घडल्यानंतरही याबाबत गांभीर्य दिसून येत नाही. त्यातच इमारतींचे बांधकाम बिल्डर मंडळी नेहमी नियमाप्रमाणे करतातच असे नाही. त्यामुळे जुन्या इमारती आणि त्यांचे भाग आज पत्त्यासारखे कोसळताना दिसतात. काही इमारती तर नियमबाह्य उभ्या राहिल्याने त्यांच्यावर कालांतराने हातोडा पडतो. त्यामुळे एकंदर याबाबतीत परिस्थिती लक्षात घेता, अशा सर्व इमारतींचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून, त्या इमारती दुरुस्तीयोग्य वा पाडण्यायोग्य आहेत अथवा नाही, ते सर्वप्रथम ठरवायला हवे.
 
 
त्याचबरोबर संबंधित पालिकेने बिल्डरला शासन करून, धडा शिकवून, बाधित रहिवाशांना तातडीने मदत केली पाहिजे. तसेच तोडकामांवेळी परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षिततेचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे. मुंबई महानगरात असे अनधिकृत व्यवहार वाढीस लागले आहेत. त्यामुळे सरकारने अशा गैरप्रकारांमध्ये वेळीच योग्य ते लक्ष घालावे.
मागील काही काळात पडलेल्या वा पाडाव्या लागलेल्या काही इमारतींची माहिती घेऊ.
 
 
१७ ऑगस्ट - मुलुंडमधील इमारतीचा स्लॅब कोसळला
 
मुलुंडच्या ‘मोतीछाया’ इमारतीचा पहिल्या मजल्यावरचा स्लॅब कोसळला व दोन ज्येष्ठ नागरिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. मुंबई महानगरपालिकेकडून या इमारतीला व जवळच्या इमारतीला तोडकामाकरिता नोटीस बजावण्यात आली होती. कारण, संबंधित दोन्ही इमारती अनधिकृतपणे अगदी जवळ-जवळ बांधल्या होत्या.
 
 
१७ ऑगस्ट - भुलेश्वरमधील जीर्ण इमारतीवर हातोडा
 
दक्षिण मुंबईतील ‘एच. एन. पेटिट विडो होम’ ही १०० वर्षे जुनी व मोडकळीस आलेली इमारत वर्दळीच्या रस्त्यावर आहे. ही इमारत पाडण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. इमारत तीन आठवड्यांत रिकामी केली नाही, तर मुंबई महापालिकेने ती बळजबरीने रिकामी करून पाडावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
 
 
१८ ऑगस्ट - ताडदेवमधील अतिधोकादायक व्यावसायिक इमारत
 
’सूर्योदय इस्टेट’ या मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत भाडेकरूंनी केलेल्या याचिकेच्या निकालात खंडपीठाने महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. इमारत मालकांच्या व गाळेधारकांनी केलेल्या संरचनात्मक परीक्षणाबाबत तफावती आढळल्यावरून महापालिकेच्या तांत्रिक अहवालावर (टॅक) न्यायालयाने सर्वंकष विचार करून इमारत धोकादायक असल्याने ती तोडण्याची आवश्यकता व्यक्त केली. गाळेधारकांबरोबर इमारतींजवळून जाणार्या लोकांच्या जीवितरक्षणाची काळजी घेण्याचेसुद्धा आदेश दिले.
 
 
१८ ऑगस्ट - एलआयसीची योगक्षेम
 
‘मंदार’ नावाची सरकारी वसाहत असलेल्या व ३५ वर्षे जुन्या अशा दोन जोडलेल्या इमारती पाडल्या जाणार आहेत. तेथे एक स्लॅब पडला व संरचनान्मक परीक्षण केले जाणार आहे. या इमारती पाडून तेथे पुनर्बांधणी होईल.
१८ ऑगस्ट - विलेपार्ले (पूर्व)च्या ’जाल’ हॉटेलची ४५ वर्षे जुन्या झालेल्या इमारतीविषयी निर्णय घेणार आहे.
एव्हियन हॉटेल - इमारतीलासुद्धा धोका निर्माण झाला आहे. दोन्हींच्या मध्ये बांधलेली भिंत-तोडताना या ‘एव्हियन’चे सुद्धा नुकसान झाले आहे.
 
 
१९ ऑगस्ट - डोंबिवली पूर्वची पालवाची इमारत एलोरा कासा बेल्ला.
 
पहिल्या माळ्यावरून लिफ्ट शाफ्टमध्ये सुरक्षारक्षकाचा पडून मृत्यू आला. इमारतीच्या मालकाने दुर्लक्ष केले. यावर पोलिसांनी खटला दाखल केला आहे.
 
 
 
२१ ऑगस्ट - मीरा रोडला इमारतीचे ‘सीलिंग’ कोसळल्याने पाचजण जखमी झाले.
 
ही भाईंदरची इमारत २८ वर्षे जुनी असून तिच्यात १४ फ्लॅट्स आहेत. ही मीरा-भाईंदर महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीतील आहे. पाडकामाचा निर्णय संरचनात्मक वा इतर तांत्रिक परीक्षणानंतर घेतला जाईल.
 
 
२२ ऑगस्ट- माझगावच्या प्रिन्स अली खान रुग्णालयाची इमारत धोकादायक अवस्थेत आहे.
 
या इमारतीचे १९४५ साली उद्घाटन करण्यात आले होते. पण, आता ही इमारत मोडकळीस आली आहे. नवीन रुग्णांना प्रवेश देणे व तेथील शस्त्रक्रिया विभागही तातडीने बंद करण्यात आले आहेत. रुग्णालयाच्यावतीने संरचनात्मक परीक्षण आणखी एकदा केले जाणार आहे. हे रुग्णालय १५० खाटांचे असून दरवर्षी साधारणपणे दीड लाख बाह्यरुग्ण व नऊ हजार आंतररुग्णांवर उपचार करण्यात येतात. रुग्णालय बंद केल्यामुळे ९०० हून अधिक कर्मचार्यांगची नोकरी धोक्यात आली आहे.
 
 
 
२३ ऑगस्ट- ठाणे येथील गावदेवी पत्रकार भवनावर हातोडा
 
पत्रकार भवनाशेजारील तळ अधिक तीन माळ्यांची बेकायदा इमारतही तोडण्याच्या कारवाईला ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरुवात केली आहे.
 
 
 
२३ ऑगस्ट - घाटकोपरमधील इमारती धोकादायक
 
बोरिवलीच्या ‘गीतांजली’ इमारतीप्रमाणे ३९ वर्षे जुनी ‘सिद्धी साई’ इमारतसुद्धा गेले पाच वर्षे धोकादायक स्थितीत होती. ही इमारत पाच वर्षांपूर्वी कोसळली. त्या दुर्घटनेत १६ माणसे मृत्युमुखी झाली व १४ जखमी झाली. मुंबई महापालिकेने सुनील शितपना चुकीच्या दुरुस्तीकरिता फ्लॅटमध्ये अनधिकृत फेरफार केल्याबद्दल जबाबदार ठरविले. दि. २८ जूनला चार माळ्यांची नाईक नगर येथील इमारत कोसळून १९ माणसे मृत्यू पावली व १३ जण जखमी झाले. दि. २३ जूनला दोन माळ्यांची ‘इंडस्ट्रियल’ इमारत कोसळून एकजण दगावला व दहा जखमी झाले. दि. ९ जूनला तीन माळ्यांची वांद्रे येथील इमारत कोसळून एक मृत्युमुखी, तर दहा जण जखमी झाले.
 
 
  
२४ ऑगस्ट - विमानतळ परिसरातीलउंचीच्या निर्णयाचे उल्लंघन
 
पुढील एक महिन्यात मुंबई विमानतळाजवळच्या आठ इमारतींनी ५५.१० मी. उंचीची मर्यादा ओलांडली असल्याने त्यांचा अनधिकृत भाग तोडला जाणार आहे. नवी मुंबईतील प्रस्तुत आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या २० किमी परिघातील २२ इमारतींना १६० मी. उंचीचा नियम ‘सिडको’ने शिथिल केला आहे. उच्च न्यायालयाने ’एएआय’ला हा बेकायदा नियम का केला, अशी विचारणा केली आहे.
 
 
 
२५ ऑगस्ट - बोरिवलीचे रहिवासी बदली घराच्या प्रतीक्षेत
 
’आर-मध्य’ प्रभाग कार्यालयाने बोरिवलीमधील आठ इमारतींना सात दिवसांत इमारती रिकाम्या कराव्यात, अशा नोटिसी बजावल्या होत्या. कारण, या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. त्यापैकीच ‘गीतांजली’ इमारत कोसळली होती. ‘त्रिलोक कृपा’ सहा माळ्यांच्या इमारतीतील २७ कुटुंबे बदली घरे शोधत आहेत. बरेचसे रहिवासी १९७५ पासून ‘वन बीएचके’ ५२० चौ. फू. घरात राहत आहेत. काही रहिवाशांना नोटिसी पाठविल्यावर पालिकेने घरातील पाणी व वीजजोडणी तोडल्या आहेत. लिफ्ट्स पण बंद आहेत.
 
 
 
२६ ऑगस्ट - सिद्धार्थनगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्प
 
६७२ रहिवाशांना २००८ ते २०१७ पर्यंत विकासकाकडून फक्त काही वर्षेच घरभाडे मिळाले. सध्या ते रहिवासी बेघर आहेत. त्यांनी आक्रमक होऊन ‘म्हाडा’वर मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. या ठिकाणी काही आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले आहेत.
 
 
 
२६ ऑगस्ट - उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळला
 
शहरातील वर्दळीच्या परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. कॅम्प-२ भागातील ‘कोमल पार्क’ इमारतीत पाचव्या मजल्यावरील ५०२ या सदनिकेत दुरुस्तीचे काम सुरू होते. अचानक स्लॅब कोसळल्याने एका कामगाराचा बळी गेला व एकजण जखमी झाला आहे. या घटनेनंतर इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
२९ ऑगस्ट- वांद्रे पूर्वच्या शासकीय वसाहतीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकाम खात्याच्या अधिकार्यांमबरोबर बैठक घेऊन धोकादायक इमारतींचा आढावा घेतला. एकूण वसाहतीतील ३०२ इमारतींपैकी २६९ इमारतींचे संरचनात्मक परीक्षण झाले व उर्वरित ६३ इमारतींचे परीक्षण पुढील १५ दिवसांत पार पडणार आहे. या अनुषंगाने संबंधित बांधकामे वा पाडकामे नियोजित काळात पूर्ण करण्याचे आदेश चव्हाण यांनी अधिकार्यांाना दिले आहेत.
 
 
 
१३ सप्टेंबर - पायधुनीची इमारत पाडली जाण्यामुळे ९० कुटुंबे बेघर होणार
 
२०१८ मध्ये ‘गुलशन’ इमारत अनधिकृतपणे सात दिवसांत बांधली व महापालिकेने ती पाडण्याकरिता नोटीस बजावली. रहिवाशांनी विरोध दर्शविला. परंतु, उच्च व सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये महापालिकेच्या इमारत तोडण्याविषयीचा निर्णय कायम ठरविला. महापालिकेने ही नऊ मजल्यांची इमारत १३ तारखेपासून तोडायला घेतली आहे.
 
 
२००५ ते २०१९ या काळात इमारती संदर्भातील एकूण १,४७२ दुर्घटना घडून १०६ माणसे मृत्यू पावली व ३४४ जखमी झाली, तरी प्रशासन व धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करणार्यांसना त्याचे पुरेसे गांभीर्य उमजलेले नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभागामध्ये निरीक्षण पथके ठेवावी व अशा घटना कमी होण्यासाठी खबरदारी घ्यावी.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.