अहंकारच ठाकरे कुटुंबाला नडला!

    06-Aug-2022
Total Views |

eknath shinde
 
 
ठाकरे कुटुंबाला शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांना, लोकप्रतिनिधींना, प्रमुख पदाधिकार्‍यांना गृहित धरणं, त्यांना पालापाचोळा समजणं नडलं. यानेतेमंडळींनी कायम आपली पालखी वाहिली पाहिजे आणि ते वाहणार, बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंना नेतृत्व म्हणून स्वीकारलं, पुढे नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरेेेंना स्वीकारतील, त्यापुढे तेजस ठाकरेला स्वीकारतील, हा फाजील आत्मविश्वास ठाकरे कुटुंब आणि त्यांच्या गटाला नडला आहे, हे निश्चित!
 
पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सार्वजनिक लोकहिताच्या कामांबद्दल प्रश्न विचारणे, पक्षहितासंबंधी प्रश्न विचारणे किंवा वरिष्ठांपेक्षा वेगळी, पण योग्य भूमिका मांडणे, पक्षप्रमुखांकडून विचारधारेचे संवर्धन, चांगल्या कामाची अपेक्षा करणे हे तर दूरच राहिलं; अगदी याच्या उलट लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या, वरिष्ठ नेत्यांच्या आणि त्यांच्या आजूबाजूला सदैव पिंगा घालणार्‍या त्यांच्या मर्जीतील, कुटुंबातील नेत्यांच्या अपप्रचारात मग्न होऊन, पक्षाधिकाराच्या ओझ्याखाली दबून वरिष्ठ नेत्यांच्या भावनिक ’नाटकी’ भाषणाचे, मुलाखतींचे, कृतींचे बळी पडून नेत्यांना जे हवं तेच करत होते.
 
 
उदाहरणादाखल शिवसेनाचं घ्या. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी ठाकरे कुटुंबाच्या, ‘मातोश्री’च्या विरोधात काहीएक भूमिका घेतल्या नाहीत. सतत ठाकरे कुटुंबीय किंवा त्यांच्या मर्जीतील नेते जे म्हणतील, तेच करत आले. पण, या परंपरेच्या विरोधात जाऊन एकनाथ शिंदे आणि त्यांच्या विचाराच्या शिवसेनेच्या विधिमंडळ सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत शिवसेना सरकार चालवत असताना शिवसेनेच्या मंत्र्यांना, आमदारांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना खूप त्रास होतो आहे. पक्षवाढीसाठी महाविकास आघाडी सरकार योग्य नाही या भूमिकेतून वेगळी भूमिका मांडली आणि याचेच परिणाम म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि मविआ सरकार कोसळलं.
 
 
उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत उरलेले नेते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे आणि यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ‘गद्दार’, ‘विश्वासघातकी’, ‘सत्तापिपासू’, ‘सडलेला पालापाचोळा’, ‘नामर्द’ वगैरे वगैरे असे काहीही उद्विग्न होऊन मागच्या महिन्याभरापासून बडबडत आहेत.
 
 
काल-परवा उद्धव ठाकरे यांची घरगुती मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’चे कार्यकारी संपादक व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली होती. त्यातही बाळासाहेब ठाकरे आमचेच आहेत, शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसला, मुंबईचा घातपात, मराठीमाणसावर चौकशीचा ससेमिरा, आम्ही हिंदुत्व सोडले नाही, आजारपण, त्याग, बलिदान अशा आशयाचे प्रश्न उपस्थित करून लोकांची सहानुभूती कशी मिळवायची, याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले आणि स्वतःच स्वतःची पाठ कौतुकाने थोपटण्याचासुद्धा केविलवाणा प्रयत्न झाला.
 
 
पुढ्यात सुखकर दिसत होतं ते राजकीय भविष्य अंधकारात गेल्यामुळे आदित्य ठाकरेही कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. थयथयाट करत आहेत. शिंदेंच्या विचारांच्या नेत्यांविरोधात वयाचा, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा काहीही विचार न करता काहीही मुक्ताफळे उधळत आहेत आणि त्यांच्या प्रत्येक सभेत, दौर्‍यांत उद्धव ठाकरे आजारी असताना हे सगळं विश्वासघाताने झाले, असे म्हणत सहानुभूती मिळविण्याचे जोरदार प्रयत्न करताहेत. हे असे भावनिक राजकारण शिवसेनेने वेळोवेळी केले. कारण, शिवसेनेचा राजकीय पॅटर्नच भावनिकतेवर अवलंबून आहे. बाळासाहेब असताना स्थानिक मराठी आणि हिंदुत्वाच्या नावावर आणि बाळासाहेबानंतर त्यांच्याच नावाने लोकांना भावनिक साद घालणे, ही शिवसेनेची रूढी आहे.
 
 
मतदारही अशाच भावनिक बाबींना खूप मोठ्या प्रमाणात बळी पडत असतात आणि हे शिवसेनेला चांगलंच ठाऊक आहे. बाळासाहेबांनंतर शिवसेना नेते, पदाधिकार्‍यांनी आणि शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना नेते म्हणून स्वीकारलं होतं. तेच आपले नेते आहेत, असे समजून काम करत होते. पण, २०१४ नंतर पक्षात अनुभवहीन आदित्य ठाकरेंचे महत्त्व वाढवायला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटातील नेत्यांनी सुरुवात केली. २०१४ विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या १५१ जागेच्या आग्रहामुळेच भाजपसोबतची बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केलेली २५ वर्षे जुनी युती तुटली. पुन्हा भाजप विशेषतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनाच्या मोठेपणामुळे सरकार धोक्यात नसतानाही (कारण शरद पवारांनी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता) सेनेला सत्तेत सहभाही होता आलं.
 
 
पुन्हा २०१७ मुंबई महापालिका निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या आग्रहामुळेच भाजप-सेनेला वेगवेगळे लढावं लागलं. भाजपपेक्षा सेनेला केवळ दोन जागा जास्त आल्या होत्या. तरीही देवेंद्र फडणवीस यांनी मनात विचार आणला असता तर मुंबई पालिकेत भाजपचा महापौर २०१७ सालीच बसला असता. पण, स्वभावाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना राज्यात सरकारमध्ये आहे, म्हणून त्यांच्यासोबत दगाबाजी केली नाही.
 
 
‘थेट निवडणुका आम्ही (ठाकरे कुटुंबीय) कधी लढणार नाही’ या बाळासाहेबांच्या विचाराला आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाठवण्यासाठी तिलांजली दिली गेली. (अर्थात, प्रत्येक प्रौढ नागरिकांना निवडणूक लढवण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे) आदित्य ठाकरेंसाठी वरळी मतदारसंघ निवडण्यात आला, त्यावेळी सुनील शिंदे तिथले आमदार होते. त्यांना विधान परिषद देण्याचे आश्वासन देऊन आदित्य यांच्यासाठी माघार घ्यायला लावली. त्याच वरळीचे अजून एक विरोधी गटातले मातब्बर नेते राष्ट्रवादीचे माजी आमदार सचिन अहिर यांनाही विधान परिषदेचे आश्वासन देऊन (पुढे दोघांनाही विधान परिषदेवर घेण्यात आलं) आदित्यची लढत सोपी केली व बाळासाहेब ठकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मतं मागून आदित्यला निवडून आणलं.
 
 
२०१९ साली भाजपसोबत युतीत लढले असताना युतीच्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या, हिंदुत्वाच्या नावाने मतं मागूनसुद्धा आकड्यांचा फसलेला खेळ आणि राजकीय अपरिहार्यता पाहून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची प्रचंड तीव्र इच्छा झाली. मग ते अडीच वर्षांचा मुख्यमंत्रिपद अशी ’कथित’ बोलणी शिवसेनेने पुढे केली आणि भाजपला कोंडीत पकडलं आणि त्यातूनच पारंपरिक राजकीय विरोधी, ज्यांच्याविरोधात प्रचार करून शिवसेना मोठी झाली, अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार जन्माला घातले.
 
 
त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाला विरोध होता. कारण,वयाने लहान, अनुभवही काहीच नव्हता आणि काँग्रेस-राष्ट्रवादीतील प्रचंड अनुभवी, मातब्बर नेते ‘ज्युनियर ठाकरें’च्या मंत्रिमंडळात ‘ज्युनियर मंत्री’ म्हणून काम कसं करतील, हा प्रश्न उभा करून आदित्यला काँग्रेस-राष्ट्रवादीने नाकारलं. मग एखाद्या दुसर्‍या शिवसेना नेत्याला मुख्यमंत्री करणं ठाकरेंना आवडलं नाही. तसे केल्यास शिवसेनेत ठाकरेंचे महत्त्व कमी झाले असते आणि दोन सत्ताकेंद्र निर्माण झाली असती. म्हणून उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्रिपद स्वीकारलं. त्यांच्या मंत्रिमंडळात आदित्यला कॅबिनेट मंत्रिपद देऊ केलं. आदित्य ठाकरेच शिवसेनेचे नेतृत्व आहे, असे ‘प्रोजेक्ट’ करण्यात आले.
 
 
वरिष्ठ नेत्यांना डावलून आदित्य ठाकरेंच्या मनावर शिवसेनेत कोणतेही निर्णय होऊ लागले. आदित्य ठाकरे ‘प्रतिमुख्यमंत्री’ म्हणून वावरू लागले. सरकरमध्येही त्यांचं वर्चस्व वाढलं. त्यांच्याकडून आणि त्यांच्या बगलबच्चांकडून इतर शिवसेना मंत्र्यांच्या खात्यांत ढवळाढवळ करण्याचे प्रकार वाढले. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व चालेल, पण ज्युनियर आदित्यच्या नेतृत्वाखाली काम करण्यास बहुतांश शिवसेना वरिष्ठ नेत्यांना आवडले नाही, हेच खरे!
 
 
आता ‘शिवसेना कोणाची?’ हा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील बर्‍याच याचिका प्रलंबित आहेत. येणार्‍या काळात त्याच्यावर निर्णय होईलच. शिवसेनेचा कोणता गट संविधानाच्या आणि कायद्याच्या चौकटीत बसतो? कोणता गटनेता खरा आणि वैध, कोणते प्रतोद खरे, कोणाचा ‘व्हीप’ कोणाला लागू होणार? या सर्व प्रशांची उत्तरं सर्वोच न्यायालयाच्या निर्णयात मिळणार आहेत.
 
 
त्यावर शिवसेनेच्या, ठाकरे गटाच्या, एकनाथ शिंदे गटाच्या आगामी राजकारणाचे भविष्य ठरणार आहे. ठाकरे कुटुंबाला शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांना, लोकप्रतिनिधींना, प्रमुख पदाधिकार्‍यांना गृहित धरणं, त्यांना पालापाचोळा समजणं नडलं. यानेतेमंडळींनी कायम आपली पालखी वाहिली पाहिजे आणि ते वाहणार, बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंना नेतृत्व म्हणून स्वीकारलं, पुढे नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरेेेंना स्वीकारतील, त्यापुढे तेजस ठाकरेला स्वीकारतील, हा फाजील आत्मविश्वास ठाकरे कुटुंब आणि त्यांच्या गटाला नडला आहे, हे निश्चित!
 
 
 
- ॲड. शिवाजी जाधव
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.