आव्हानांच्या ‘सीमा’ ओलांडणारी उद्योजिका

    दिनांक  13-May-2022 11:53:20
|
 
 
 
 
 
 
seema
 
 
 
 
 ‘कुठल्याही क्षेत्रात जाण्याआधी आपल्याला ते क्षेत्र खरेच आवडते का, याची खात्री करूनच त्या क्षेत्रात उतरावे, तरच काम करणे ही आनंदाची गोष्ट होईल, हेच मला या इतक्या वर्षांच्या कामांमधून कळले,” असे सांगणार्‍या आणि ‘आर्किटेक्चर’सारख्या साधारणतः पुरुषांचे क्षेत्र समजल्या क्षेत्रात व्यवसाय करून आणि फक्त व्यवसायापुरत्याच मर्यादित न राहता याच क्षेत्रातल्या शिक्षकी पेशातसुद्धा गेली 30 वर्षे काम करण्याचा अनुभव असलेल्या सीमा बहिरट यांची उद्यमकथा...
 
 
 
 
 
कुठल्याही व्यवसायात प्रवेश करताना आपल्याला आधी आपल्या कामावर प्रेम करता आले पाहिजे. जर आपले आपल्या कामावर प्रेम असेल, तरच आपण आपले काम चांगल्या प्रकारे करू शकू. व्यवसायात मोठे व्हायचे असेल, तर झटपट यश हे जास्त धोकादायक असते. त्यामुळे झटपट यश, झटपट श्रीमंत होणे या आपण टाळल्याच पाहिजेत. आजकाल बर्‍याच नवीन उद्योजकांचा याकडे कल वाढत जातोय, जे खूप धोकादायक आहे. नवीन उद्योजकांनी एकाच गोष्टीवर विश्वास ठेवावा. एकदम लांब उडी मारण्यापेक्षा छोट्या-छोट्या पायर्‍या चढत जाणे, कधीही श्रेयस्कर आणि हाच यशाचा सर्वात चांगला मार्ग आहे.
स्वतःचा व्यवसाय आणि त्याचबरोबरीने शिक्षकी पेशा या दोन्ही गोष्टींमधला ‘बॅलन्स’ सीमा बहिरट गेली ३० वर्षे सांभाळत आहेत. १९९१ मध्ये त्यांनी पुण्याच्या ‘अभिनव कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ मधून पदवीचे शिक्षण सुरू केले आणि आपल्या व्यवसायास सुरुवात केली. ज्या काळात सीमा यांनी काम करण्यास सुरुवात केली, त्या काळात ‘आर्किटेक्चर’ या क्षेत्राकडे महिलांचा ओढा हा मर्यादित स्वरूपाचा होता. म्हणजे फक्त पदवी घेण्यासाठी शिकायचे आणि मग यापुढे फक्त नोकरी नाहीतर संसारास लागणे, याच गोष्टींकडे महिला त्याकाळात वळत असत. या गोष्टीकडे व्यवसाय म्हणून बघणे फारच कमी जणींना जमायचे, अशा काळात सीमा यांनी आपला व्यवसाय सुरू केला. “भारतात त्या काळात जागतिकीकरणाचे वारे वाहायला लागले असल्याने सर्वच क्षेत्रांमध्ये बदल घडत होते. अशा काळात त्यावेळी ‘आर्किटेक्ट्स’ना हाताने सर्व ड्रॉईंग्स काढावी लागत. जर एखादी जरी चूक झाली, तर सगळी मेहनत पाण्यात जायची. त्या ड्रॉईंग्सबरोबरीने ‘फिल्ड’वर जाणे, लोकांशी ‘डील’ करणे, यांसारखी आव्हानेही होतीच. त्या क्षेत्रातल्या सर्वच लोकांना ही सर्व आव्हाने सांभाळतच काम करावे लागते, तसेच ते मला करावे लागले,” असेच सीमा त्यांचा सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगतात.
 
 
 
 
“कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायाचे शिक्षण घेणे ही प्राथमिक गरज आहे. ‘आर्किटेक्चर’ या व्यवसायचेही तसेच आहे. सध्याच्या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये या व्यवसायाला लागणार्‍या जवळपास सर्वच गोष्टी शिकवल्या जातातच, पण या व्यवसायात खूप बदल होत आहेत. नवीन तंत्रज्ञान, नवीन माहिती सातत्याने समोर येते आहे. त्यामुळे जर खरेच आपल्याला या क्षेत्रात व्यवसाय करायचा असेल, तर आपल्याला सातत्याने ‘अपडेट’ होत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण घेत असताना बाहेर मोठ्या ‘आर्किटेक्ट’च्या हाताखाली काम करून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणे, यासारख्या गोष्टी केल्या जाऊ शकतात. त्यामुळेच जर या व्यवसायात यायचे असेल, तर आधी शिक्षण, प्रत्यक्ष अनुभव आणि सातत्याने ‘अपडेट’ होत राहणे या गोष्टी कायम लक्षात ठेवल्याच पाहिजेत, असे मी स्वानुभवाने सांगते,” असे सीमा सांगतात.
 
 
 
 
 
‘आर्किटेकचरिंग’ म्हणजे फक्त एखाद्या बिल्डिंगचे चित्र काढणे का? तर तसे मुळीच नाही. याही क्षेत्रात दोन प्रकार आहेत - एक हौसिंग सोसायटीसाठी काम करणे आणि दुसरे म्हणजे मोठ्या कंपन्यांसाठी काम करणे. दोन्हीमध्ये काम करण्याच्या पद्धती थोड्याफार फरकाने वेगळ्या आहेत. जेव्हा एखादी हौसिंग सोसायटीसाठी काम करत असतो, तेव्हा छोटे-छोटे ब्लॉक्स, मग बाकीच्या सर्व लिफ्ट वगैरे ‘अमॅनिटीज्’साठी जागा ठरवणे यांसारख्या छोट्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. आता मोठी कॉम्प्लेक्स उभी राहत असल्याने मोठ्या कंपन्यांसाठी काम करणे आणि हौसिंग सोसायटीसाठी काम करणे, यात फारसा फरक उरलेला नाही. ‘इंडस्ट्रियल’ गोष्टींच्या बाबतीत बोलायचे असल्यास इथे कायम क्लाएंटच्या गरजेनुसार काम करावे लागते. वेगवेगळी ऑफिसेस वेगवेगळ्या पद्धतीने उभी करावी लागतात. त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे इंटिरिअर वगैरे सर्व गोष्टी बघाव्या लागतात. त्यामुळे तिथे काम करणे थोडेसे आव्हानात्मक आहे, पण गेल्या काही वर्षांतील बदलांमुळे या क्षेत्रातही काम करणे, पूर्वी इतके अवघड राहिलेले नाही. तंत्रज्ञानाचा वापर करून वेळ वाचवून काम करता येते.
 
 
 
 
 
’आर्किटेक्ट’ व्यवसायाबरोबरीने सीमा या विषयाच्या प्राध्यापिकासुद्धा आहेत. गेली २८ वर्षे त्या हा विषय शिकवत आहेत. या दोन्ही भूमिका निभावताना फार काही फरक करावा लागत नाही, असे सीमा यांचे मत आहे. “उलट व्यावसायिक असल्याने मला या क्षेत्राशी रोज संबंध येत असतो. त्यामुळे मुलांना काय शिकवायचे आहे किंवा काय शिकवायला हवे, हे मला कायमच समजते. पूर्वी या क्षेत्रामध्ये बरीच आव्हाने होती. कारण, जराही चूक न करत आम्हाला ‘ड्रॉईंग’ करावे लागे, पण आता हे सहज शक्य आहे. ‘सॉफ्टवेअर’च्या मदतीने अगदी थोड्याच वेळात हे काम पूर्ण होऊ शकते. त्यामुळे आता त्याची फारशी चिंता करावी लागत नाही. पण, याचमुळे आता नवीन पिढीचे या क्षेत्राकडे गांभीर्याने बघणे कमी झाले आहे. सर्वच क्षेत्रांत जसा तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय, तसा तो या क्षेत्रातही वाढतोय. एक शिक्षक म्हणून सर्वात आव्हानात्मक काळ होता तो ‘कोविड’चा. सगळंच बंद असल्याने ऑनलाईन शिकवणे सुरु झाले होते. सुरुवातीला असे शिकवणे अवघड गेले, पण, नंतर सरावाने जमायला लागले. पण, त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले. कारण, आमचा विषय हा प्रत्यक्ष समोरासमोर शिकवण्याचा आहे. समोर बसून ‘ड्रॉईंग’ काढणे, त्यातल्या चुका काढणे हे घडले पाहिजे. जर ते घडले नाही तरच हा विषय व्यवस्थित पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो, पण त्यावेळी इलाज नव्हता. हळूहळू आता ‘ऑफलाईन लेक्चर’ सुरू झाले आहेत. त्यामुळे आता थोडी थोडी परिस्थिती सुधारतेय,” असे सीमा सांगतात.
 
 
 
 
 
कोरोना काळाचा सर्वात मोठा फटका बसलेल्या क्षेत्रांमध्ये बांधकाम क्षेत्राचा समावेश होतो. या काळात खूप नुकसान सहन करावे लागले. अजूनही त्यातून सावरायला काही वर्षे नक्कीच जातील. सगळेच बंद असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला होता. त्यामुळे पैसे अडकून पडणे, नोकर्‍या जाणे यांसारख्या गोष्टी या क्षेत्रात घडल्या. आता हे सगळे हळूहळू सुरू झाले आहे. ग्राहकसुद्धा येत आहेत. त्यामुळे दिलासा मिळतोय, तरी हे सगळे पूर्ण भरून येण्यास काही वर्षे नक्कीच जाणार आहेत. बांधकाम क्षेत्रसुद्धा आता तंत्रज्ञानाच्या वापराकडे जास्त झुकायला लागले आहे आणि हेच या क्षेत्राचे भविष्य म्हणायला हरकत नाही. पूर्वी सगळ्याच कामांसाठी मनुष्यबळाचा वापर जास्त होत होता. तिथे आता तंत्रज्ञानाचा वापर होतोय. नवीन मशीन्स येत आहेत. नवीन साधने बाजारात येत आहेत. यामुळे हे क्षेत्र दिवसागणिक बदलतंय आणि या क्षेत्रातील व्यावसायिक या बदलांना स्वीकारत पुढे जात आहेत. “कुठल्याही व्यावसायिकाने व्यवसाय करत असताना किंवा त्याची सुरुवात करत असताना त्यात आव्हाने येणारच आहेत, हे गृहीतच धरून चालले पाहिजे. कारण, कुठलीही गोष्ट आव्हाने पार केल्याशिवाय शक्यच नाही. त्यामुळे आव्हानांचा सामना हा केलाच पाहिजे. कारण, याच आव्हानांमधून आपण शिकत असतो आणि पुढे जात असतो, हेच येणार्‍या नवीन व्यावसायिकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आजही माझ्यासाठी माझ्याकडे येणारे प्रत्येक नवीन काम हे आव्हानच असते. कारण, प्रत्येक नवीन कामाच्या गरजा वेगळ्या असतात. तसेच अपेक्षाही वेगळ्या असतात. त्यामुळे ही सर्व आव्हाने स्वीकारून ती ओझे न समजता पार केली आणि आपल्या व्यवसायावर प्रेम केले, तर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही,” असा मोलाचा सल्ला सीमा देतात.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.