नुपेक्षी कदा राम दासाभिमानी...

    12-May-2022
Total Views | 213
ram 2
 
 
 
 
 
 
दु:खितांचा कैवारी असा हा राम धनुष्य हातात घेऊन पुढे ठाकतो, तेव्हा त्याला पाहताच काळाच्या पोटात धडकी भरते. कारण, त्या धनुष्याला रामाने बाण लावला तर त्याच्यापुढे कोणी टिकत नाही, हे काळालाही माहीत आहे. असा हा राम कोदंडधारी असला तरी, आपल्या भक्ताची दासाची तो कधीही उपेक्षा करीत नाही.
 
 
 
 
गर्विष्ठपणे आणि अहंभावाचा त्याग करून साधेपणाने जीवन जगणे, हे आपल्या समाजाच्या हिताचे असते. आपल्या वागण्या-बोलण्यात-आचरणात निगर्वी वृत्ती दिसून आली पाहिजे. आपण निगर्वी याचा अर्थ नेभळट, भित्रे आहोत, असा होत नाही. त्यासाठी नम्रतेबरोबर आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या बलवान असले पाहिजे. आपण शक्तीचे उपासक असले पाहिजे. सत्वगुणी शक्ती सदैव आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास आपल्या आचरणातून दिसून आला पाहिजे, तरच आपण शक्तीचे उपासक ठरतो. लोक गुणांचा आदर करतात. यासाठी आपण अनेक सात्विक गुण संपादन करण्याचा, आत्मसात करण्याचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. सामान्य माणूस सभोवतालच्या प्रसंगी प्रतिकूल परिस्थितीने त्रासून गेलेला असतो, भयग्रस्त असतो. तसे पाहिले, तर प्रत्येकजण त्या कारणाने भीतीमुळे, चिंतेमुळे, काळजीने गांगरून गेलेला असतो. भीती आणि चिंता माणसाला चहुबाजूंनी सतावत असते. प्रपंचात, व्यवहारात या भीतीने साम्राज्य किती व्यापक स्वरुपाचे आहे, हे नीट विचार केल्यावर समजते. भीती, काळजी, चिंता लागून राहिलेली असते. व्यवसायात, धंदा, उद्योगात भीती असते. नोकरीत नोकराला वरिष्ठांनी भीती, तर वरिष्ठांना आपले काम वेळेत पूर्ण होण्याची चिंता; व्यापारात नफा-नुकसानीची भीती; शेतकर्‍यांना पाऊस वेळेत आणि योग्य प्रमाणात पडेल का, याची भीती; तर पाऊस चांगला पडून भरपूर पीक आल्यावर चांगला बाजारभाव मिळेल की नाही याची भीती! बरे, नोकरी-व्यवसाय-शेतीत सुदैवाने मनासारखा पैसा मिळाला, तरी तो टिकून राहील किंवा नाही, याची भीती. लोकांकडून फसवले तर जाणार नाही, ही भीती.
 
 
 
 
कुटुंबात बायकोला नवर्‍याची भीती, तर नवर्‍याला बायकोची भीती. राजकारणात सत्ता पैसा हाताशी असून भीती. मंत्र्यांना पक्षश्रेष्ठींच्या नाराजींची भीती, तर पक्षश्रेष्ठींना पुन्हा सत्ता मिळेल की नाही, याची भीती. पुढील निवडणुकांच्या निकालाची सर्व राजकीय नेत्यांना भीती. सुशिक्षितांना बेकारीची भीती. अशिक्षितांना उपासमारीची काळजी, अशा किती प्रकारच्या भीती आणि काळज्या सांगाव्या... एकंदरीत काय, प्रपंचात कोणीही भीतीरहित, काळजीरहित नसतो. सर्वच कोणत्या ना कोणत्या भीतीच्या सावटाखाली वावरत असतात. अशावेळी सामान्य माणूस कुठेतरी आधार शोधीत असतो. आदर्श, आदरणीय व्यक्तीच्या पायावर डोके ठेवायला तो तयार असतो. पण, असे पाय त्याला लवकर सापडत नाहीत. आदर्शाला शोधायला समाजात बाहेर पडावे, तर निराशा पदरी येते. शक्तीयुक्त आदराचे स्थान सापडत नाही. कारण, शक्तिमान आदर्श शोधावा, तर लोक विध्वंसक वृत्तीला शक्ती समजू लागले आहेत. अशी शक्ती आपल्याला आधार देऊन परिस्थितीतून बाहेर काढेल आणि समाधान मिळवून देईल, हे सुतराम शक्य नाही. सर्व संत परमेश्वराच्या आधाराचे वर्णन करतात. त्यासाठी पुराणाचे दाखले देतात. पण, सर्वसामान्य माणसाचा असा समज असतो की, तो अध्यात्माचा विषय आहे. तो व्यवहारात कसा उतरावयाचा? स्वामी सांगतात की, तुम्ही देवाला अनन्यभावे शरण जा. मग तुमची काळजी त्याला लागते. परमेश्वरावर, त्याच्या सामर्थ्यावर व कृपाळूपणावर विश्वास असेल, तर तुम्हाला सांसारिक दुःखाला घाबरण्याचे कारण नाही. असे असूनही प्रापंचिक परिस्थितीला सामोरे न जाता जो घाबरतो, त्याला समर्थांनी ‘नामर्द’ म्हटले आहे. अशा नामर्दांसाठी एक आशादायक संदेश समर्थांनी दिला आहे-
भवाच्या भये काय भितोस लंडी। 
धरी रे मना धीर धाकासि सांडी। 
रघूनायका सारिखा स्वामी शीरी। 
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥
प्रापंचिक अडचणींवर मात करण्यात पुरुषार्थ आहे. जो त्या अडचणींना घाबरतो, त्याला समर्थांनी ‘लंडी’ म्हणजे ‘भित्रा’ किंवा ‘नामर्द’ म्हटले आहे. कारण, त्याच्या अंगी धीर नाही, सोशिकता नाही. संकटांची धास्ती, भीती त्याला सोडता येत नाही. समर्थ म्हणतात की, थोडे धैर्य दाखवले तर भीती कमी होईल. प्रत्यक्ष संकटापेक्षा त्याच्या कल्पनेने भीतीने माणूस गांगरुन जातो. ही भीती कमी केली तर संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य परमेश्वर आपल्याला देतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, “संकटे ही माकडांप्रमाणे असतात. माकडे तोंड विचकटून, तोंडातून आवाज काढून तुम्हाला घाबरण्याचा प्रयत्न करतात. पण, तुम्ही जर एखादी साधी काठी हातात घेऊन धैर्याने त्यांना सामोरे गेलात, तर ते पळ काढतात. संकटांचेही तसेच असते.” समर्थ या श्लोकात पुढे सांगतात की, अरे रघुनायकासारखा पराक्रमी स्वामी भगवंताचा आशीर्वादात्मक हात तुमच्या शिरावर असताना तुम्हाला घाबरण्याचे कारण काय? अर्थात, रघुनाथाची सख्यभक्ती तुम्हाला साधली तर प्रत्यक्ष यमराज जरी तुमच्यावर रागावला तरी राम तुम्हाला सोडून जाणार नाही. तुमची उपेक्षा करणार नाही. अर्थात, यासाठी तुम्ही रामाचा खरा भक्त असले पाहिजे. नुसत्या वरवरच्या बोलण्याने हे साधारण नाही. भगवंताला अनन्यभावे शरण गेल्यानेच हे साधणार आहे. शरणागत भक्तांची तो उपेक्षा करीत नाही. देवाची भक्ती कशी करायची यासाठी दासबोधातल्या काही ओव्या अभ्यासणे जरुरी आहे -
देवाच्या सख्यत्वाकारणे। 
आपलें सौख्य सोडून देणें। 
अनन्यभावें जीवें प्राणें । 
शरीर तेंहि वेंचावे॥ (दा.४.८.६) 
देवाच्या सख्यत्वासाठी। 
पडाव्या जिवलगांसि तुटी। 
सर्व अर्पावे सेवटीं। 
प्राण तोहि वेचावा॥ (दा.४.८.८)
समर्थ पुढे त्या समासात सांगतात की, देवाशी अशी अनन्यता साधली, तर ‘देवास लागे भक्ताची चिंता।’ रामाला आपल्या अशा या भक्तांचा दासाचा अभिमान वाटतो.
दीनानाथ हा राम कोदंडधारी। 
पुढें देखतां काळपोटीं भरारी। 
जना वाक्यर नेमस्त हें सत्य मानी । 
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥२८॥
मनुष्य जेव्हा आधार शोधू लागतो, तेव्हा त्याला दोन गोष्टींची अपेक्षा असते - एक म्हणजे ज्याचा आपण आधार शोधला तो स्वामी अथवा मालक अतिशय बलवान असला पाहिजे आणि त्या मालकाने माझ्याकडे दुर्लक्ष करू नये. या दोन्ही बाबतीत राम कसा तत्पर आहे, हे वरील श्लोकात स्पष्ट केले आहे. या पूर्वीच्या काही श्लोकांतून मानवी जीवनाची अपूर्णता स्पष्ट करताना स्वामींनी काळाचे महत्त्व विशद केले आहे. ‘बळे लागला काळा हा पाठिलागी।’ असे सांगून काळ कोणालाही सोडत नाही, असे स्वामींनी म्हटले आहे. तथापि, दु:खितांचा कैवारी असा हा राम धनुष्य हातात घेऊन पुढे ठाकतो, तेव्हा त्याला पाहताच काळाच्या पोटात धडकी भरते. कारण, त्या धनुष्याला रामाने बाण लावला तर त्याच्यापुढे कोणी टिकत नाही, हे काळालाही माहीत आहे. असा हा राम कोदंडधारी असला तरी, आपल्या भक्ताची दासाची तो कधीही उपेक्षा करीत नाही. तो आपल्या दासाकडे दुर्लक्ष करीत नाही, असे आश्वासन देऊन समर्थ थांबत नाहीत. पुढे सांगतात, तर लोकहो, हे माझे वाक्य निश्चितपणे सत्य आहे, हे नीट समजून घ्या. या वाक्यात तीळमात्रही संशयास जागा नाही. ‘नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।’ हे सत्य वाक्य श्रोत्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी पुढे श्लोक क्रमांक ३७ 37व्या पर्यंतच्या दहा श्लोकांतून ते पुन्हा पुन्हा सांगितलेले आहे. (क्रमश:)
 
सुरेश जाखडी
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121