मनासारखे झाले नाही, तर अतीव दु:ख होते. नि:स्वार्थपणे एखादे काम करीत असताना माणसाच्या मनाप्रमाणे झाले नाही, तर त्याचे त्याला विशेष वाटत नाही. पण, स्वार्थीबुद्धीच्या माणसाच्या मनाप्रमाणे घडले नाही, तर त्याला फार दु:ख होते. काही माणसे पैशांचा हव्यास धरणारी नसतात, स्वार्थी नसतात, तरीही प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली पाहिजे, असे त्यांना वाटत असते. ही माणसे अहंभावी व स्वयंकेद्रित असल्याने साधीसुधी गोष्टही मनासारखी झाली नाही, तर त्यांनाही फार दु:ख होते. त्यामुळे ‘न होता मनासारिखे, दु:ख मोठे’ हे समर्थांचे विधान व्यवहारातही अनुभवास येते.
निःस्वार्थी, परोपकारी भगवद्भक्तांची, संतांची कीर्ती ते गेल्यावरही वर्षानुवर्षे त्यांच्यामागे राहते, हे आपण पाहतो. तथापि त्यांनी निःस्वार्थबुद्धीने केलेले कार्य, त्यासाठी वेचलेले आयुष्य, त्यांची तपस्या ही सहजपणे लक्षात येत नाही. या संत महात्म्यांच्या प्रेरणेने आपण निदान स्वार्थापासून दूर झालो, तरी काही हरकत नाही. निःस्वार्थता मिळविण्यासाठी मुख्य अडचण असते, ती आपला पैशांचा हव्यास आणि स्वार्थ-अतिस्वार्थ बुद्धी. यांसाठी स्वामी मनाला सांगतात की,
नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे।
अतिस्वार्थबुद्धी न रे पाप सांचें।
घडे भोगणे पाप तें कर्म खोटें।
न होता मनासारिखे दुःख मोठे॥९॥
माणसाची सारी धडपड सुखासाठी चाललेली असते. सुख हवे, पण दुःख नको, अशी सर्वसामान्य माणसाची इच्छा असते. सुख-दुःख या भावना मनाशी निगडित असल्याने त्यांची चर्चा मनाच्या श्लोकात येणे स्वाभाविक आहे. सर्वसाधारणपणे माणसाची अशी अपेक्षा असते की, सुखप्राप्तीचे साधन असलेला पैसा त्याला विनासायास मिळावा. भरपूर पैसा मिळाला की, तो सुखी होईल. परंतु, पैसे मिळवण्यासाठी आळस टाकून कष्ट करावे लागतात आणि त्याचा साठा करण्यासाठी काळ जावा लागतो. लोकांची तेवढा वेळ थांबण्याची तयारी नसते. त्यांना वाटत असते की, आपल्याला झटपट विनासायास द्रव्यप्राप्ती व्हावी. आपल्या अगोदरच्या लोकांनी पैसा मिळवून ठेवलेला असतो. तो जर या-ना त्या मार्गाने आपल्या हाती लागला, तर त्यावर चैन करता येईल. सुखी होता येईल. कारण, देहाला सुखी ठेवणार्या वस्तू बाजारात पैशांनी विकत घेता येतात. यातून पैशांची अतोनात हाव उत्पन्न होते. ती हाव तृप्त करण्यासाठी तो निरनिराळे मार्ग शोधतो. आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन भ्रष्टाचारी मार्गाने खूप पैसा जमा करण्याचा प्रयत्न करतो. पण, त्यात मानसिक स्वास्थ्य गमावल्याने खर्या अर्थाने सुखी होता येत नाही. ज्यांच्या हाती अधिकार नसतो, अशी मंडळी दुसर्यांचा पैसा मिळविण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करतात. कारण, त्यांची पैशांची हाव त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यासाठी ढोंगीपणा करुन ते खोटेही बोलू लागतात.
काही वेळा गोड बोलून, भूलथापा मारुन दुसर्याजवळील द्रव्य लुबाडण्याचा प्रयत्न करतात, तर काही वेळा प्रामाणिकपणे पैसे उसने मागून घेतात व परत करत नाहीत. हे समाजातील सर्वसामान्य माणसाचे चित्र ठाऊक असल्याने या श्लोकात स्वामींनी मनाला स्पष्टपणे सांगितले आहे की, “हे मना, दुसर्याचा पैसा आपल्याला मिळावा, अशी इच्छा करू नको. ही इच्छा हे अतिस्वार्थाचे लक्षण आहे. अशा अतिस्वार्थबुद्धीने मागण्याची माणसाला सवय लागली की, तो पापपुण्याचा विचार करीत नाही.” त्याचा विवेक नष्ट झाल्याने आपला स्वार्थ साधण्यासाठी केलेल्या कृतीचे त्याला काही वाटत नाही. आपण हे पाप करतोय, असे त्याला वाटत नाही. दुसर्याचा पैसा मिळवण्यात काही गैर आहे, असे त्याला वाटत नाही. आपल्या कृतीला समर्थनार्थही नेहमी एक हिंदी भाषेतील वाक्प्रचाराचा उल्लेख करतो. ‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिये।’ यातील विचाराला विकृत स्वरूप देऊन आपल्या स्वार्थी कृतीने समर्थन तो करीत असतो. तो विचार करतो, मी लोकांना फसवले, असे इतरांना वाटते. पण, हे लोक फसतात कसे? ते मुळातच मूर्ख असल्याने फसवले जातात. ‘मी जरी त्यांचे द्रव्य मिळवले नसते, तरी दुसर्या कोणीतरी त्याला फसवले असते.’ अशी स्वत:ची समजूत करून घेऊन तो आपल्या कृतीचे समर्थन करतो. त्यात काही पाप आहे, असे त्याला वाटत नाही, त्यामुळे या स्वार्थी व लबाड लोकांचा पापसंचय वाढत जातो. नंतर पैशांच्या हव्यासापायी केलेल्या पापकृत्यांची फळे पुढे केव्हा ना केव्हातरी भोगावी लागतात.
समाजात नाचक्की होऊन अशांना सज्जन माणसे जवळ उभे करीत नाहीत. पैशांच्या हव्यासापायी युक्त्या करून दुसर्याला फसवण्यास ही माणसे प्रत्येक वेळी यशस्वी होतातच, असे नाही. अशावेळी त्यांच्या मनासारखे झाले नाही, तर त्यांना अतीव दु:ख होते. नि:स्वार्थपणे एखादे काम करीत असताना माणसाच्या मनाप्रमाणे झाले नाही, तर त्याचे त्याला विशेष वाटत नाही. पण, स्वार्थीबुद्धीच्या माणसाच्या मनाप्रमाणे घडले नाही, तर त्याला फार दु:ख होते. काही माणसे पैशांचा हव्यास धरणारी नसतात, स्वार्थी नसतात, तरीही प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली पाहिजे, असे त्यांना वाटत असते. ही माणसे अहंभावी व स्वयंकेद्रित असल्याने साधीसुधी गोष्टही मनासारखी झाली नाही, तर त्यांनाही फार दु:ख होते. त्यामुळे ‘न होता मनासारिखे, दु:ख मोठे’ हे समर्थांचे विधान व्यवहारातही अनुभवास येते.
आता जी दु:खे माणसाला भोगावी लागतात, त्यांचाही विचार करून समर्थांनी त्यावर उपाय सुचवले आहेत. पुढचा श्लोक त्यासाठी आहे-
सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी।
दु:खाची स्वयें सांडि जीवीं करावी।
देहे दु:ख ते सुख मानीत जावें।
विवेके सदा सस्वरूपी भरावें॥१०॥
दु:खे अनेक प्रकारची असतात. अनेक कारणांनी उद्भवलेली असतात. सर्वसाधारणपणे शारीरिक व मानसिक असे ढोबळमानाने त्यांचे वर्गीकरण करता येते. काही दु:खे परिस्थितीजन्य असतात. परिस्थिती बदलणे आपल्या हातात नसते. अशावेळी शांत मनाने परिस्थितीला सामोरे जाऊन आपल्या अंतरंगात बदल करावा लागतो. त्यामुळे शांत राहून दु:ख सोसण्याचे धैर्य मनात तयार होते. समर्थांच्या मते, मनाला जी दु:खं उगाळत बसण्याची सवय लागलेली असते, ती सवय काढून टाकावी. थोडक्यात, आपले दु:ख घोकत बसू नका. आपल्या दु:खाला सारखे कुरवाळत बसू नका. दु:ख विसरण्याची मनाला सवय लावा. मन दुसरीकडे गुंतवले, तर दु:खाचा विसर सोपा होईल. मन गुंतवायचे, तर अशाश्वतात कशाला गुंतवायचे? रामावर प्रेम करण्यात ते गुंतवले, तर दु:खाचा विसर तर होईल, पण ते विसरले गेले नाही, तरी सहन करण्याची ताकद राम आम्हाला देईल.
रामांच्या गुणांचा व रामावरील प्रसंगाचा आठव केला, तर आपले दु:ख क्षुल्लक आहे, हे पटेल. म्हणून ‘सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी.’ देहदु:ख विसरणे सोपे आहे. देहदु:ख हे सुख आहे, अशी कल्पना केली की संपले देहदु:ख! क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे मातृभूमीवरील प्रेमाखातर हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांना यातना झाल्या असतील, पण त्यांनी ते सुख मानून त्याचा स्वीकार केले. देशप्रेमासाठी ही माणसे मरणाला मिठी मारताना सुख मानतात, तर आपण साधं शरीर दु:खाला सुख मानून ते का हलके करू नये? दुसरे आपण भोगत असलेली दु:खे ही पूर्वपापांचे प्रायश्चित म्हणून भोगतो, असा विवेक केल्यास दु:खोपभोगाने पूर्वीच्या पापांचा हिशेब चुकता करीत आहोत, असे वाटून त्यात सुख मानायला काय हरकत आहे? यासाठी दु:खनिवारक विवेक नेहमी, ‘सस्वरूपी भरून’ टाकावा. आपण दु:ख भोगत असताना प्रत्येकाला असे वाटत असते की, ‘ही दु:खे माझ्या वाट्याला का आलीत?’ यासाठी समर्थ विवेक सांगतात की, “अरे, या लोकांत सर्व सुखी असा मनुष्य तुम्हाला सापडतो का?” आणि पुढील श्लोक याच अर्थाचा आहे. त्याचे विवेचन पुढील लेखात... (क्रमश:)
- सुरेश जाखडी