नामस्मरणाचा अभ्यास...

    23-Nov-2022   
Total Views |
naamsmarana


आध्यात्मिकदृष्ट्या नामस्मरणाचा अभ्यास हा अनुभूतीचा आहे. तो नुसत्या बोलण्याचा विषय नाही. हा अनुभव प्रत्येकाला आपापल्या पात्रतेनुसार मिळत असतो. हा चंचल मनाशी संबंधित असल्याने भगवंतांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे येथे यशासाठी ‘अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते।’ अभ्यासाने आणि वैराग्याने मन वश होते.त्यामुळे नामस्मरणातील पात्रता अभ्यासाने आणि वैराग्याने वाढवता येते.


सुप्रभाती मनात रामाचे चिंतन करावे, असे समर्थ वारंवार सांगत आले आहेत. पहाटेच्या प्रसन्नवेळी श्रीरामाचे गुणविशेष आठवल्याने चित्त प्रसन्न होते. परंतु, त्यानंतर दिवसाचा कामकाजाचा सर्व वेळ अनेक व्यापात जातो. दिवसभरात सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील, असे होत नाही. स्वामी म्हणतात की, न होता मनासारिखे दु:ख मोठे... एखादी घटना या पद्धतीने व्हावी, असे आपले मन ठरवत असते, पण आजूबाजूची बाह्य परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते. आपल्या मनाविरुद्ध काही घडून आले, तर मन साहजिकच दु:खी होते.

क्वचितप्रसंगी दु:ख मोठे असेल, तर मन उदास होेते, निराश होते, अशा प्रसंगी विषण्ण अथवा खिन्न झालेले मन पुढे घडणार्‍या अनुकूल घटनांनाही नाकारु लागते. सकाळी केलेल्या रामाच्या गुणांचे स्मरण राहत नाही. रामाच्या आठवणीने वरील प्रतिकूल परिस्थितीत मनाला सावरतायेईल. आता रामाची सतत आठवण राहावी,त्याच्या गुणांची आठवण राहावी, यासाठी रामनामाशिवाय इलाज नाही. नामस्मरणाने सतत रामाची आठवण मनात राहून त्याच्या अस्तित्वाची जाणीव मन कायम ठेवील. नामस्मरणाचे महत्त्व स्वामींनी पुढील श्लोकात सांगितले आहे-

सदा रामनामें वदा पूर्णकामें।
कदा बाधिजेनापदा नित्यनेमें।
मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा।
प्रभाते मनी राम चिंतित जावा ॥70॥


नामस्मरण या विषयावर समर्थांनी एक समास दासबोधात लिहिला आहे. दासबोधात स्वामींनी नवविधाभक्ती विस्ताराने सांगितल्या आहेत. ज्ञान ऐहिक असो वा पारमार्थिक, त्याची सुरुवात श्रवणापासून होते. म्हणून श्रवणभक्तीला महत्त्व आहे. खूप ऐकले की, ते कोणाला तरी सांगावेसे वाटते. त्यातून कीर्तनभक्ती उदयाला येते. आपले अनुभव कीर्तनाद्वारा दुसर्‍याला सांगणारी व्यक्ती श्रोत्यांच्या श्रवणभक्तीची तृप्ती करीत असते. श्रवण-कीर्तन हे एकमेकांना अनुरूप ठरतात. पण, हे मनाचा ठाव घेण्याअगोदर वातावरणात विरुन जातात, म्हणून स्वामींनी पुढची भक्ती ‘विष्णोस्मरण’ सांगितली.

पुढे निवेदनाच्या ओघात स्वामींनी त्याला ‘नामस्मरण’ म्हणून संबोधले व तेच पुढे रुढ झाले. स्वामींचे आराध्य दैवत श्रीराम त्यामुळे पुढे ते रामनाम झाले, तथापि राम हेच परब्रह्म असल्याचे स्वामी सांगतात, तेव्हा रामानाम सांगताना स्वामी दाशरथी रामाकडून अविनाशी परब्रह्माकडे ते नाम घेऊन जातात. हा तत्त्वज्ञानातील भाग जरा बाजूला ठेवून नामस्मरणाचे महत्त्व स्वामींनी कसे सांगितले आहे, हा या 70व्या श्लोकाचा विषय आहे. नामस्मरणाचा अभ्यास हा भगवंताचे अस्तित्व अनुभवण्याचा विषय आहे. यासाठी रामनामात अर्थात नामस्मरणात सातत्य पाहिजे, असे स्वामी सांगतात.

सर्वसाधारणपणे संकटसमयी अथवा भौतिक कामनापूर्तीसाठी माणसाला भगवंतनामाची आठवण येते. अशावेळी त्या व्यक्तीचे लक्ष नामापेक्षा येणार्‍या परिणामाकडे अथवा फळाकडे असते. तशी मनाला सवय लागलेली असते. ती सवय मोडून मी केवळ भगवतांच्या अस्तित्वाची जाणीव राहावी म्हणून नाम घेतो, असे ज्याला वाटते तो पूर्णकाम होय. त्यावेळी कामना म्हणजे इच्छापूर्तीची वासना मनातून दूर गेलेली असते. काही मिळवायचे नसल्याने मन शांत असते. ते ‘पूर्णकाम मन’ होय. अशा या पूर्णकाम मनाने रामनामाचा उच्चार करावा, असे स्वामी सांगतात.

 पूर्णकाम मनाचा नामस्मरणावर विश्वास असल्याने मनाची एकाग्रता साधते. मन आवडीने नामात तल्लीन होऊ लागते. अशावेळी नामस्मरणासाठी जपमाळेची जरूरी लागतेच, असे नाही. जपमाळेचे दुसरे नाव ‘स्मरणी’ असे आहे. म्हणजे तिच्यामुळे नामस्मरणाचा विसर पडत नाही. जपमाळ हे साधन आहे, ते साध्य नव्हे. नामस्मरणाच्या अभ्यासाचे फळ स्वामी श्लोकाच्या दुसर्‍या ओळीत सांगतात. ते असे आहे, ‘कदा बाधिजेनापदा नित्यनेमें.’

आध्यात्मिकदृष्ट्या नामस्मरणाचा अभ्यास हा अनुभूतीचा आहे. तो नुसत्या बोलण्याचा विषय नाही. हा अनुभव प्रत्येकाला आपापल्या पात्रतेनुसार मिळत असतो. हा चंचल मनाशी संबंधित असल्याने भगवंतांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे येथे यशासाठी ‘अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते।’ अभ्यासाने आणि वैराग्याने मन वश होते. त्यामुळे नामस्मरणातील पात्रता अभ्यासाने आणि वैराग्याने वाढवता येते. त्याचप्रमाणे कुठल्याही अभ्यासात सातत्य महत्त्वाचे असते. एखादा अभ्यास सतत चिकाटीने करीत राहिल्यास त्याचे विलक्षण परिणाम दिसून येतात, असा अनुभव आहे. उदाहरणार्थ पाणी हे सर्वात मृदू आणि पातळ असते. पण, तेच पाणी थेंब-थेंबाने एकाच जागी पडत राहिले तर कठीण दगडलाही दुभंगण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी असते. त्यामुळे नामस्मरणातही सातत्य असावे, नियमितता असावी.
 
 ‘नित्यनेमे’ असलेले नाम भक्ताने घ्यावे, असे स्वामी सांगतात. पूर्णकाम म्हणजे निरीच्छ व शांत मनाने आपण भगवंताचे नामस्मरण करीत राहिलो, तर पारमार्थिक तसेच प्रापंचिक व्यावहारिक संकटे येतील आणि जातील. पण, त्यांची बाधा साधकाला होणार नाही. या ठिकाणी ‘बाधिजेना आपदा’ असा शब्दप्रयोग स्वामींनी केला आहे. आपदा याचा अर्थ आपत्ती, दुर्दैव असा आहे. व्यवहारात अशा स्वरुपाच्या आपत्ती, संकटे येत असतात. काही वेळा ते आपल्या चुकीच्या वागण्याचे परिणाम असतात, तर काही वेळा पूर्वजन्मीच्या पापाच्या प्रायश्चित स्वरुपाचे असतात. माणसाला प्रत्यक्ष संकटापेक्षा त्या संकटाची भीती जास्त सतावत असते. नामस्मरण करणार्‍या माणसाचे मन शांत आणि विवेकी असल्याने आपत्तीसमयी म्हणजे संकटसमयी तो मनाने घाबरत नाही.

 विवेकी मनाने संकटाला सामोरे जाऊन त्यातून तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. आपदेची त्याला बाधा होत नाही, असे स्वामी म्हणतात, ते याचसाठी. अर्थात, हे सर्व करीत असताना वृथा अहंकार, गर्व, ताठा आणि आळस हे सोडून द्यावे लागतात. मी नामस्मरण करतो, मला काही होणार नाही, या कल्पनेने, आळसाने कृती करायचे सोडून दिले तर संकट थोडेच निघून जाणार आहे? यासाठी स्वामी मद आणि आळस सोडून द्यायला सांगतात. शांत मनाने केलेल्या नामस्मरणाने विवेक जागा होऊन मनातील संकटाची भीती नाहीशी होऊन मन खंबीर बनेल. योग्य त्या वेळी योग्य तो निर्णय घेईल, म्हणून साधकाने नेहमी, ‘प्रभाते मनी राम चिंतित जावा।’

भगवंताच्या नामस्मरणाने भक्ताच्या अंगी असलेले महादोषही निघून जातात. असे स्वामींनी यापुढील श्लोकात सांगितले आहे. हे महादोष साधनेला, नामस्मरणाला सुरुवात करण्याच्या पूर्वायुष्यातील अथवा पूर्वजन्मातले असतील, तरी त्यांचा नाश करण्याचे सामर्थ्य नामस्मरणात आहे, असे समर्थ पुढील श्लोकात सांगत आहेत. त्या संबंधीचे विवेचन पुढील लेखात पाहता येईल. आपली सकाळ मोबाईल बघण्यात आणि चहाबरोबर राजकीय उठाठेवी, अपघात, भांडणे यांचे वर्णन करणारी वृत्तपत्र पाहण्यात आपण घालवतो. त्यातील नकारात्मक संदेशांनी आपणच आपला दिवस बिघडवत असतो. त्याऐवजी दिवसाची सुरुवात रामाच्या गुणांच्या सकारात्मकतेने करावी. मग नकारात्मक संदेश तुमच्या शुद्ध मनापर्यंत पोहोचणार नाहीत. तुम्ही प्रसन्नचित्त राहाल.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..