निसर्गो रक्षति रक्षित:।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jul-2021
Total Views |

nature_1  H x W
निसर्ग हा प्राणिसमूहाचा जन्मोजन्मीचा सखा आहे. विशेष करून, समाजशील प्राणी म्हणून समजल्या जाणार्‍या मानवाने निसर्गाशी आपले सख्यत्व नेहमी जोडावयास हवे. एक मित्र आपल्या मित्राशी कसा आपुलकीचा व्यवहार करतो? तसाच व्यवहार निसर्गातील सर्व तत्त्वांशी झाला पाहिजे. खर्‍या अर्थाने पर्यावरणरक्षण होते ते याच गोष्टींच्या पालनामुळे!
 
 
 
’निसर्ग’ हा आपला खराखुरा सोबती व परममित्र होय. इहलोक व परलोक सफल करणारे हे एक महत्त्वाचे साधन! ज्याच्या सान्निध्यात राहून माणूस व संबंध जीवसृष्टी आपला सर्वांगीण विकास साधते, अशी एक दिव्यशक्ती म्हणजेच निसर्ग! म्हणूनच तर निसर्गाला ज्ञानीलोक ’देव’ म्हणून संबोधतात. Nature is the God! कारण, निसर्गाने नेहमीच सबंध जगाला सुख व ऐश्वर्य वितरणाचे कार्य केले आहे व आजही तो अव्याहतपणे करीत आहे. यातील पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश ही पंचमहाभूते आणि सूर्य, चंद्र, अन्य ग्रह-नक्षत्रे, समुद्र, पर्वत, वृक्षवल्लींनी नटलेली वनराजी, वनस्पती, नद्या, लता ही सर्व चराचर तत्त्वे एका विशिष्ट नियमांत राहून कार्यरत आहेत. आपल्या मर्यादा न भंग न करता अनवरतपणे इतरांसाठी काहीना काही देण्याचेच कार्य या तत्त्वांद्वारे निरंतर होत आहे. या सर्वांचा सदुपयोग करीत मानवाने तितक्याच कृतज्ञतेने जगा आणि जगू द्या, हा मौलिक संदेश कधी बाळगत स्वतः जगण्याचा व इतरांना जगविण्यासाठी प्रयत्न करावयास हवा.
 
 
 
समग्रसृष्टी ही मानवाच्या उपभोगासाठी आहे, पण जरा बुद्धीचा व विवेकाचा विचार करून. जगण्यासाठी माणसाला काय लागते? अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न आवश्यक करावा. पण, निसर्गनियम तोडून त्या कोणत्याही व कशाही मार्गाने प्राप्त करण्याचा प्रयत्न मात्र नको! जगण्यासाठी आवश्यक तेवढे आणि इतरांना त्रास होणार नाही, याचा विचार करुन ’अपरिग्रह’ वृत्ती बाळगल्यास माणूस खर्‍या अर्थाने सुखी होऊ शकतो! पण, आजचा मानव मात्र इतका स्वार्थी व कृतघ्न बनला आहे की, जीवनदात्या निसर्गालाच त्याने वेठीस धरले आहे. भगवंताने दिलेल्या सद्बुद्धीद्वारे विविध संशोधने करीत निसर्गात दडलेल्या अमाप भौतिक साधन संपत्तीचा सदुपयोग करावा, हेही तितकेच खरे! पण भौतिक ़विकास, प्रचंड श्रीमंती, गर्व, अभिमान, अनाठायी स्वार्थ, क्रूरता, अनैतिकता, सत्तासंघर्ष, सूडबुद्धी यांच्या माध्यमाने निसर्गाला आपल्या हातचे बाहुले बनवत त्याचाच उपहास करणे कितपत योग्य आहे. ज्या निसर्गशक्तीमुळे आपण जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सार्‍या गोष्टी पूर्ण करतो, त्याच्याप्रति कृतज्ञताभाव बाळगत त्याच्याशी अनुकूल राहत जगणे म्हणजे तर आयुष्य होय. याउलट दुर्दैवाने आजचा माणूस निसर्गधर्म विसरत चालला आहे. प्राकृतिक तत्त्वांची पायमल्ली करीत त्याची तो क्रूर थट्टाच करतोय. मग निसर्ग तर का म्हणून गप्प राहील. त्याच्या अस्तित्वालाच संपविण्याचा जेव्हा प्रयत्न मानवांकडून होत असल्यास तो तर हे सर्वकाही कसे काय सहन करणार?
नैसर्गिक नियमांच्या विपरित पाऊल टाकल्यास मानवाला त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात, याचे ताजे उदाहरण म्हणजे कोरोना नावाचा भस्मासूर! या महामारीने गेल्या दीड वर्षांपासून मानव समूहाला जायबंदी केले आहे. याची तीव्र भयानकता भल्याभल्यांचा थरकाप उडवून टाकणारी आहे. सारे जग मृत्यूच्या भीतीने इतके त्रस्त झाले की, धनवैभव, मान-सन्मान, नाते-गोते, समारंभ-उत्सव या सर्वांवर पाणी फिरले. शिक्षण, व्यापार, धर्म-कर्म, अंत्यसंस्कार आदींपासून वंचित राहावे लागलेय. हे सर्व अचानक झाले का? तर कदापि नव्हे. जगातील मानवाची निसर्गाविरुद्धची वाटचाल या आंतरराष्ट्रीय दुर्घटनेला कारणीभूत आहे.
 
 
 
बुद्धीचे वैभव लाभलेला माणूस निसर्गावर जेव्हा घाला घालू लागतो, तेव्हा निसर्गदेखील तितक्याच क्रूरपणे आपले सामर्थ्य दाखवतो. कोरोनाची सुरुवात चीनसारख्या निसर्गनियमांविरुद्ध चालणार्‍या व मांसाहाराचे शिखर गाठणार्‍या क्रूर राष्ट्रामध्ये झाली! निसर्गत: माणूस हा शाकाहारी प्राणी आहे. अन्न-धान्य, पालेभाज्या, मधुर फळे, सुके मेवे, दूध व दुग्धजन्य पदार्थ हा मानवाचा आहार देशी-विदेशाचे शास्त्रज्ञ व चिकित्सक मान्य करतात. पण, मांसभक्षणाला चटावलेला माणूस आपली सवय थोडीच सोडणार? शक्तिवर्धक व्हिटॅमिन्स, प्रोटिन्सच्या नावावर इतर प्राण्यांच्या निर्मम हत्या करून त्यांच्या जगण्याचा निसर्गदत्त अधिकार हिसकावून घेण्याचा अधिकार मानवाला कोणी दिला? आज भारतांसह जगभरात राजरोसपणे मांसाहाराच्या नावावर निष्पाप प्राण्यांच्या सामूहिक हत्या होत आहेत. कत्तलखान्यांमध्ये होणारा दीनदुबळ्या गाई-बैलांचा संहार कोणत्या स्तराचा आहे? याला जबाबदार कोण? या सामूहिक पापकृत्यांची फळे भोगावीच लागणार! निसर्ग नियमांविरुद्ध वाटचाल करीत असंख्य लहान-मोठ्या जीवांची हत्या करण्याचा राजरोसपणे सपाटा चालतोय चिनी व्यवस्थेत! तेथील नागरिकांनी कोणत्याही प्राण्याला सोडले नाही. अगदी साध्यासुध्या जीवांचे प्राणहरण करण्याचे नृशंसनीय दुष्कृत्य तिथे अगदी सहजपणे घडतेय. जर पशु-पक्षी आणि जीवजंतूंच्या जीवावरच तिथला माणूस उठणार असेल, तर मग त्याच्या अंत:करणात पवित्र बुद्धी, दया, करुणा, सहिष्णुता, वात्सल्य आदी गोष्टी कशा काय जाग्या होणार? या अनिष्ट कृत्याने अहिंसेसारखा पवित्र विचार तर त्या मांसाहारी क्रूरकर्म्यांच्या अंतर्मनात कसा काय डोकावणार? म्हणूनच याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर दुष्परिणाम म्हणजेच कोरोना महामारी! निसर्गाला तुम्ही संपवाल तर निसर्गदेखील तुमची गय करणार नाही, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कोरोना!
 
 
 
निसर्ग हा प्राणिसमूहाचा जन्मोजन्मीचा सखा आहे. विशेष करून, समाजशील प्राणी म्हणून समजल्या जाणार्‍या मानवाने निसर्गाशी आपले सख्यत्व नेहमी जोडावयास हवे. एक मित्र आपल्या मित्राशी कसा आपुलकीचा व्यवहार करतो? तसाच व्यवहार निसर्गातील सर्व तत्त्वांशी झाला पाहिजे. खर्‍या अर्थाने पर्यावरणरक्षण होते ते याच गोष्टींच्या पालनामुळे! ’परि’ म्हणजे आपल्या आजूबाजूचे, सभोवतालचे आणि ’आवरण’ म्हणजेच आच्छादन! जशी आपण स्वतःची काळजी वाहतो, आपल्या कुटुंबाचे पर्यावरण जपण्याचा प्रयत्न करतो, तद्वतच आपण आपली गल्ली व परिसरातील पर्यावरणाच्या रक्षणाचा विचार करावयास हवा. पशु-पक्ष्यांवर दया, वृक्ष लागवड, संगोपन व संवर्धन, अंतर्बाह्य स्वच्छता, आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा उपयोग! तसेच भूमिमातेची सेवा, अन्नधान्यांना रासायनिक विषांपासून वाचविणे या सर्व बाबी पर्यावरणरक्षणाचाच भाग आहेत. म्हणूनच प्रत्येक मानवाने त्यासाठी कटिबद्ध व्हावयास हवे.
 
 
 
जसे आपण पण स्वतःला जपतो, त्याचप्रमाणे आपल्या परिसराला जपावयास हवे. आपल्या विपरित वागण्यामुळे वायू, जल, भूमी, अन्न, वृक्ष, नद्या हे प्रदूषित होता नयेत. वायू शुद्ध असेल, पाणी निर्मळ असेल, जमीन सुपीक असेल, अन्न शुद्ध व परिष्कृत असेल, झाडे पाना-फुलांनी व फळांनी डवरलेली असतील आणि नद्या नेहमीच वाहत असतील, तर त्यांच्यामुळे मानवांबरोबरच इतर प्राण्यांचे आरोग्य उत्तम राहते. आपल्या परिसरात वावरणार्‍या गाय, बैल, म्हैस, शेळी, घोडा आदी उपकारक पशूंचे सदैव रक्षण व्हावयास हवे. त्यांच्या माध्यमाने आम्हास दूध, दही, तूप इत्यादींचा लाभ होतो व शेतीची ही कामे होतात. गाईच्या पंचगव्यामुळे सर्व प्रकारचे आजार दूर होतात. म्हणूनच गाईला माता म्हणून संबोधले जाते.
 
 
 
खरेतर निसर्गातील ही सर्व जड व चेतन तत्त्वे आमच्याकरिता सर्वदृष्टीने इतकी मौल्यवान असताना आम्ही त्यांच्यापासूनचे दूर का जावे? स्वार्थपूर्ण अशा विपरित आचरणाने निसर्गाशी असलेले मैत्रीचे नाते का तोडावे? जर काय वेळीच आम्ही आमच्यात निसर्गानुकूल बदल केला नाही, तर यापुढेही नानाविध असाध्य रोग, दुःख व संकटे कोसळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी समग्र प्राणिमात्रांच्या व्यापक हिताचा विचार करीत विवेकशील बुद्धी बाळगणार्‍या मानवाने निसर्गाशी आपुलकीचे नाते जोडले, तर निश्चित तो आम्हा सर्वांचा रक्षणकर्ता ठरेल.
 
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
 
 
@@AUTHORINFO_V1@@