तुझा तू वाढवी राजा...

    दिनांक  07-Apr-2021 21:17:53
|

Samarth_1  H x
 
 
स्वामी भक्ती व शक्ती दोघांचेही उपासक होते. आदिशक्ती राज्यकर्त्यांना कशी प्रेरणा देते, यांचेही वर्णन स्वामींनी केले आहे. राजकारणात अडचणींचे पेचप्रसंग वारंवार येतात, त्यावर मात करण्यासाठी मर्दगडी पाहिजे. भित्र्या, नामर्द लोकांचे ते काम नव्हे.
 
‘मुख्य ते हरिकथा निरूपण’ असे स्वामींनी दासबोधातील दशक ११, समास ५, ओवी क्र. ४ मध्ये म्हटले आहे, हे खरे आहे. तथापि, स्वामी आयुष्यभर फक्त हरिकथाच करीत हिंडले नाहीत. स्वामींनी ‘हरिकथा’ का मुख्य मानली हे न समजल्याने त्यांचे आक्षेपक, टीकाकार नेहमी दावा करतात की, रामदासांना केवळ धर्म आणि भक्तिमार्गाचा प्रसार करायचा होता. त्यासाठी भजन, कीर्तन व देवतार्जन हे रामदासांचे जीवितकार्य होते. हा आक्षेप जर खरा मानला तर मग स्वामींनी शक्तीची उपासना करण्यास कशासाठी सांगितले? नुसता भक्तिप्रसारच करायचा होता, तर त्यासाठी भोळाभाव पुरेसा होता. त्याचप्रमाणे देवाची पूजाअर्चा आणि कीर्तन करण्यासाठी लागणारी गायनकला, थोडेसे वक्तृत्व, सभाधीटपणा एवढ्या गोष्टी धर्म आणि भक्ती यांच्या प्रसारासाठी पुरेशा होत्या. स्वामींना फक्त देवतार्चनच करायचे होते, तर मग ही आदिशक्तीची उपासना, तुळजाभवानीची स्तोत्रे लोकांसमोर मांडून या भवानीमातेच्या वराने रामाने दुष्ट रावणाचा वध केला हे सांगायचे काय प्रयोजन होते? शिवराय हे रामाचा अवतार आहेत आणि औरंगजेब हा दुष्ट कपटी रावण आहे, हे रुपक तत्कालीन लोकांना माहीत होते. दुष्ट यवनांचा नाश ही ‘रामवरदायिनी’ करून घेणार आहे. यासाठी शक्तीची उपासना करायला सांगणे योग्य होते. आता राहिला ‘हरिकथा निरुपणाचा’ उद्देश काय होता, हा प्रश्न. हिंदू संस्कृतीतील सत्य, अक्रोध, सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश, सद्गुणांची जोपासना, ईशतत्त्वाशी शरणागती आणि अखेरीस सर्व मायामोहातून मुक्ती या गुणांचा स्वामींना ‘हरिकथेतून’ प्रचार करायचा होता. या प्रसाराने हिंदवी स्वराज्यासाठी धैर्यवान, सुसंस्कृत, सद्गुणी, चारित्र्यसंपन्न, स्वामिनिष्ठ असा मराठी माणूस घडवायचा होता. हिंदवी स्वराज्याचे सुराज्य करायचे होते. हे ध्येय सतत नजरेसमोर असल्याने स्वामी म्हणाले होते, ‘मुख्य हरिकथा निरूपण.’ स्वामींनी बलोपासना स्वतः आचरून लोकांना शिकवली. लोकांना शक्तीचे महत्त्व पटवून दिले. शक्तीची उपासना करायला सांगितले. त्यामुळे स्वामींना फक्त धर्मप्रसारक ठरवू पाहणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली. आपण शक्तीचे महत्त्व विशद केल्याने भावी काळातील टीकाकारांची गैरसोय होणार आहे, याची स्वामींना काय कल्पना! स्वामींना तर एकंदर हिंदू समाजाची, संस्कृती अवनतीची चिंता लागून राहिली होती. राज्य अन्यायी जुलमी कपटी म्लेंच्छांच्या हाती गेले होते. अशावेळी शक्तीची उपासना लोकांना सांगून त्यांना हिंदवी स्वराज्य कार्यासाठी तयार करायचे स्वामींच्या मनात होते. ‘शक्तीने मिळती राज्ये, कोण पुसे अशक्तीला’ हे सांगून त्यांना लोकक्रांती करायची होती. म्हणून स्वामींनी तुळजाभवानीची स्तोत्रे सांगितली.
 
रामदासस्वामींनी तुळजाभवानीची जी स्तोत्रे सांगितली, त्यातील कोणती स्तोत्रे कोणत्या प्रसंगी, कोणत्या काळी लिहिली, याचा अंदाज करता येत नाही. कालगणनेचा उल्लेख करण्याची त्याकाळी प्रथा नव्हती. परंतु, स्वामींनी सांगितलेले लिहून घेणारे त्यांचे जे शिष्य होते, त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगी सांगितलेली भवानीची प्रार्थना एकाच स्तोत्रात सलग लिहून ठेवल्यामुळे प्रसंगांची थोडी सरमिसळ झाली आहे. या संदर्भात श्री. म. माटे यांचा तुळजाभवानी स्तोत्राबद्दलचा अभिप्राय उद्बोधक म्हणावा लागेल. श्री. म. माटे यांच्या मते, स्वामींनी केलेले भवानीस्तोत्र अखंड नसून त्या तीन वेगवेगळ्या प्रसंगी केलेल्या भवानीमातेच्या प्रार्थना आहेत. पुढे या तीनही प्रार्थना टिपण करणाऱ्यांनी एकत्र लिहून त्याचे एकच स्तोत्र केले असण्याची शक्यता आहे. या स्तोत्रातील एक प्रार्थना भवानीमातेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेली आहे. दुसऱ्या प्रार्थनेचा प्रसंग स्वामींच्या घरातील श्रेष्ठांनी केलेला नवस फेडण्यासाठी प्रतापगडच्या देवीला केलेल्या प्रार्थनेच्या वेळीचा असावा आणि तिसरी प्रार्थना शिवरायांना यश चिंतिण्यासाठी केलेल्या वेळची असावी. या सर्व स्तोत्रांतून जो भाग ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास होणे जरुरीचे आहे. या अभ्यासांतून स्वामींचे तडफदार व मायाळू व्यक्तिमत्त्व, शिवरायांशी असलेले त्यांचे घनिष्ठ संबंध यावर प्रकाश टाकण्यास मदत होणार आहे. या स्तोत्रांत स्वामींनी शक्तीचे अनन्यसाधारण महत्त्व विशद केले आहे. स्वामी भक्ती व शक्ती दोघांचेही उपासक होते. आदिशक्ती राज्यकर्त्यांना कशी प्रेरणा देते, यांचेही वर्णन स्वामींनी केले आहे. राजकारणात अडचणींचे पेचप्रसंग वारंवार येतात, त्यावर मात करण्यासाठी मर्दगडी पाहिजे. भित्र्या, नामर्द लोकांचे ते काम नव्हे. भवानीस्तोत्रातील स्वामींची मर्दानी भाषा पाहा.
 
उदंड खस्तिची कामें।
मर्द मारुनि जातसे।
नामर्द काय ते लंडी।
सदा दुश्चित लालची॥
 
‘दुसरे ते राजकारण’ हे सांगायला स्वामी विसरत नाहीत. राजकारणातील या धकाधकीच्या मामल्यासाठी आदिशक्तीची उपासना, प्रेरणा आवश्यक आहे. या आदिमायेशी सख्य केले, तर ती प्रवृत्तिनिवृत्तीमधील तोल सांभाळते. नुसते प्रवृत्तिवादी अहंकारी होतात व कार्याचा नाश होतो. नुसते निवृत्तिवादी प्रपंचविज्ञानाकडे दुर्लक्ष करतात. यापासून आदिमाया आदिशक्ती तुळजाभवानी भक्तांना सांभाळते. ती सर्वत्र पाहते. भक्तांची संकटे, तसेच दुष्ट दुर्जनांना दूर सारते.
 
सर्वचि मूळ हे माया।
मूळमाया म्हणोनिया।
सृष्टीची आदिशक्ती हे।
आदिशक्ती म्हणोनिया॥
 
ही आदिशक्ती ‘दासे धुंडून काढली’ असे स्वामींनी स्तोत्रात म्हटले आहे. त्याकाळी यवनांची धाड आली की, ते देवळातील मूर्तींचे भंजन करीत, हे माहीत असल्याने अशावेळी लोक भीतीपोटी मूर्ती दडवून ठेवत. अशा अनेक मूर्ती स्वामींनी डोहातून शोधून काढल्या आहेत. तुळजाभवानीबद्दलही असे काही घडले असावे किंवा गूढार्थाने असेही म्हणता येईल की, स्वामींनी या शक्तीचा ‘शोध घेतला’ आहे. श्री. म. माटे यांनी म्हटले आहे की, स्वामी नेहमी ‘शक्तीचा शोध‘ घेत असत. ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी...’ या मारुतीच्या आरतीची शेवटची ओळ ‘रामी रामदासा शक्तींचा शोध’ अशी आहे. यावरून आदिशक्तीचा शोध घेताना ‘दासे धुंडून काढीली’ असे त्यांनी म्हटले असावे.
 
या तुळजाभवानीच्या स्तोत्रातील पहिली प्रार्थना त्यांनी तुळजापूरला जाऊन केली असावी. त्यावेळी शिवाजी राजे लहान होते. देवीची कृतज्ञता व्यक्त करुन स्वामींनी मागितले की,
 
‘येकचि मागणे आता।
द्यावें तें मजकारणे।
तुझा तूं वाढवी राजा।
शीघ्र आम्हाचि देखता॥
 
स्वामी म्हणतात, “देवी, तू मला सर्व दिले आहेस. पण, तरीही एक मागतो. शिवाजी राजे, त्यांचे वैभव, राज्य लवकर आमच्या डोळ्यांदेखत वाढव. तुळजाभवानीने शिवाजी महाराजांना सर्व काही दिले, तेव्हा पुन्हा ३०-३२ वर्षांनी स्वामींनी त्याबद्दल देवीचे आभार मानले आहेत. याचा अर्थ हयातभर स्वामींचे लक्ष शिवाजी महाराजांकडे होते. त्यांचे घनिष्ठ संबंध होते, जिव्हाळ्याचे होते. इ. स. १६७८ मध्ये वैशाख महिन्यात आपल्या दोन पुतण्यांना घेऊन श्रेष्ठांनी केलेला नवस फेडण्यासाठी स्वामी प्रतापगडावर तुळजाभवानीच्या दर्शनास गेले. त्यावेळी त्यांनी सोन्याचे फूल देवीच्या चरणी वाहिले. प्रार्थना केली की, तुझ्या कृपेने मी महंत म्हणून प्रसिद्ध पावलो. माझी पराधीनता गेली. आज सर्वत्र माझी पारमार्थिक सत्ता चालते. हे सर्व तुझेच देणे आहे. माझे काहीच नाही. सर्व तुझेच आहे.
 
तुझेचि तुजला दिल्हें।
म्यां हे कोठूनि आणिंले।
संकटे वाढिली नाना।
रक्षिलें बहुतांपरी॥
 
स्वामींच्या अंतर्मनात नेहमी हिंदवी स्वराज्याचा विचार होता. या माझ्या राज्याला तू दुष्टांपासून वाचव. तू पूर्वी राक्षसांना मारले, त्या सामर्थ्यांची प्रचिती आता दाखव.
 
दुष्ट संहारिले मागे।
ऐसे उदंड ऐकतो।
परंतु रोकडे काही।
मूळ सामर्थ्य दाखवी॥
 
तुळजाभवानी ही समर्थांची कुलस्वामिनी असल्याने त्यांची तिच्या ठिकाणी सख्यभक्ती होती. त्या अधिकाराने ते देवीला विचारते की, दुष्टांना मारल्याचे तुझे पराक्रम आम्ही उदंड ऐकले. आता या संकटसमयी तुझे मूळ सामर्थ्य आम्हाला स्पष्टपणे दाखव व आम्हाला दुष्ट, कपटी, दुर्जन म्लेंच्छ सत्तेपासून सोडवायला मदत कर.
 
- सुरेश जाखडी
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.