नवी दिल्ली : (Air India Plane Crash AAIB Report) गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेला एक महिना उलटून गेला आहे. याप्रकरणी प्राथमिक तपास अहवाल एएआयबीने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला १२ जुलै रोजी सादर केला आहे. या अहवालातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी इंजिनाच्या इंधन नियंत्रित करणाऱ्या स्विचकडे विशेष लक्ष दिल्याची माहिती आहे. तसेच अहमदाबाद विमान दुर्घटनेपूर्वी, एअर इंडियाने विमानाचे फ्युएल कंट्रोल स्विच आणि थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल (TCM) दोन वेळा बदलले होते, असे अहवालात म्हटले आहे.
या अहवालातून विमानाच्या इंजिन्सला इंधन पुरवठा करणारे फ्युएल कंट्रोल स्विचला अधोरेखित करण्यात आले आहे. हे स्विच रन मोड म्हणजेच चालू स्थितीतून कटऑफ मोडवर म्हणजेच बंद स्थितीत हलवल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ही मानवी चूक होती की तांत्रिक बिघाडामुळे घडले, हे अद्याप समोर आलेले नाही.
विमान अपघातापूर्वी दोनवेळा एअर इंडियाने बोईंग -787 या विमानाचे फ्युएल कंट्रोल स्विचसह थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल (TCM) बदलले असल्याचे अहवालात म्हटले आहे.
बोईंगने २०१९ मध्ये जारी केलेल्या देखभाल नियोजन दस्तऐवजनुसार (MPD) दर २४,००० उड्डाण तासांनी युनिट बदलणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, साल २०१९ आणि २०२४ असे दोनवेळा टीसीएम बदलण्यात आले होते. मात्र टीसीएमचा फ्युएल कंट्रोल स्विचशी काहीही संबंध नसल्याचे अहवालात म्हटले आहे. यावर एअर इंडियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\