खवले मांजर तस्करांचा कोल्हापूर वनाधिकाऱ्यांवर हल्ला; वन्यजीव रक्षक गंभीर जखमी

    दिनांक  16-Apr-2021 21:15:54
|
pangolin_1  H x


मुंबई (प्रतिनिधी) -
खवले मांजर तस्करीच्या व्यवहारावर छापा टाकत असताना शुक्रवारी सायंकाळी कोल्हापूर वनाधिकाऱ्यांवर तस्करांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक गंभीर जखमी झाले आहेत. खवले मांजर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या वनाधिकाऱ्यांवर तस्करांनी हल्ला केल्याने त्यांनी जीव वाचवण्यासाठी पोलीस चौकीचा आसरा घेतला.
 
 
 
 
गडहिंग्लज-चंदगड रोडवर महागाव जवळ उंबरवाडीनजीक खवल मांजर तस्करीचा व्यवहार होणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बनावट ग्राहकाच्या मदतीने या परिसरात सापळा लावला होता. दरम्यान खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या तस्करांना ही बाब लक्षात आली. त्यावेळी त्यांनी वनाधिकाऱ्यांवर हल्ला चढून काठीने मारहाण केली. यावेळी साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्या डोक्याला काठीचा मार बसल्याने ते रक्तबंबाळ झाले. तसेच सांगलीचे मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांना देखील मारहाण करण्यात आली.


 

या झटापटीमधून खवले मांजर ताब्यात घेऊन वनाधिकारी गडहिंग्लजकडे येत असताना तस्करांनी त्याचा पाठलाग केला. यावेळी गाडीत बसलेले आजरा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अमरजित पवार यांच्यावर तस्करांनी हल्ला करुन त्यांच्याकडील खवले मांजर काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवार यांनी प्रसंगावधान राखून गाडी पळवली. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी शहरातील पोलीस चौकीत जाऊन आतून कडी लावून स्वत:चा बचाव केला. याठिकाणी आरडाओरड केल्यानंतर तस्कर पळून गेले. एकूण पाच तस्करांनी हल्ला केल्याची माहिती पवार यांनी. या तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कारवाईत वनपाल बी.एल.कुंभार आणि वनरक्षक रणजित पाटील सहभागी होते.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.