दिवा ते छशिमट जलद लोकल सुरू करा : खा. श्रीकांत शिंदे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी; जखमींची विचारपूस

    10-Jun-2025
Total Views |
 
Start fast local dfiva to csmt Shrikant Shinde demand
 
ठाणे: लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, दिवा ते छशिमट जलद लोकल सुरू करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवार, दि. 9 जून रोजी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, त्यावेळी ते बोलत होते.
 
खा. शिंदे म्हणाले की, “कल्याण-कर्जत परिसरात मोठ्या संख्येने नागरिक राहतात. त्यामुळे या मार्गावर लोकल फेर्‍या वाढवणे आवश्यक आहे. प्रवासी संघटनांकडून लोकलसंख्या वाढवण्याची वारंवार मागणी केली जाते. ठाणे-कल्याण पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकल फेर्‍यांची संख्या काही प्रमाणात वाढली. मात्र, पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तार होणे आवश्यक आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाचे काम सुरू आहे. हे काम जेव्हा पूर्ण होईल. तेव्हा लोकल फेर्‍यांची संख्या आणखी वाढेल,” असा विश्वास खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.
 
“कल्याणच्या पुढे तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याचे काम सुरू असून यासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे. लोकलफेर्‍या जेव्हा वाढतील, तेव्हा गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे जाईल. नव्या मार्गिका वाढवण्याबरोबरच 12 डब्ब्यांच्या लोकल 15 डब्ब्यांमध्ये परावर्तित करणे तितकेच गरजेचे आहे,” असेही ते म्हणाले.