पाकिस्तानची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

pakistan_1  H x
 
 
 
आरोग्यसंबंधित समस्या वा आपत्काळामुळे जीवन संकटात आले, तसेच पाकिस्तानची दुबळी आरोग्य प्रणाली जवळपास उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आली. ‘कोविड-१९’च्या या भयावह स्थितीने पाकिस्तानच्या आरोग्य व्यवस्थेची दुबळी बाजू उघड करण्याचे काम केले.
 
मानवी संस्कृतीच्या ज्ञातकाळापासून इतिहासाला वळण देणाऱ्या अनेक घटनांची आपल्याला माहिती मिळते. त्यात युद्ध आणि महामारीचे स्थानही महत्त्वाचे राहिले आणि मेसोपोटेमिया किंवा इजिप्तसारख्या प्राचीन संस्कृतीच्या विध्वंसातही महामारीने मध्यवर्ती भूमिका बजावली. अर्थात, केवळ प्राचीन काळातच नव्हे, तर आजच्या आधुनिक काळातील मानवी संस्कृतीसमोरही महामारीने संकट उभे केले व महामारी मानवासमोरील धोकाच ठरत आली. आताच्या ‘कोविड-१९’ महामारीने पुन्हा एकदा जगाला ठप्प केले आणि आरोग्य विज्ञानात अभूतपूर्व प्रगती केल्यानंतरही जगातील सर्वाधिक विकसित देश-क्षेत्रदेखील त्यासमोर किंकर्तव्यमूढ ठरले. जगातील विकसितांची अशी दशा असेल, तर पाकिस्तानसारख्या कैकपटींनी मागास देशात ‘कोविड-१९’बद्दल सरकार आणि जनता काय विचार करत असेल, ‘कोविड-१९’ने सामान्य जनजीवन कशाप्रकारे प्रभावित केले असेल, हे जाणून घेणे जिज्ञासेचा विषय होतो.
 
नोव्हेंबर २०१९मध्ये चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातल्या एका प्रयोगशाळेतून एक संदिग्ध विषाणू, दुर्घटना किंवा षड्यंत्रपूर्वक मुक्त झाला व त्यातूनच श्वसनासंबंधित आजारांच्या रहस्यमय समूहाला जन्म दिला. थोड्याशा कालावधीतच या विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या कह्यात घेतले. १७ नोव्हेंबर, २०१९ रोजी कोरोना विषाणूबाधित पहिले संशयित प्रकरण आले आणि जानेवारी २०२०च्या अखेरपर्यंत सुमारे सात हजार लोकांना त्याची लागण झाली. परंतु, चिनी सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या बेपर्वा वृत्तीने जग या आजाराचे वास्तविक रूप समजण्यापासून व त्यानुरूप तयारी करण्यापासून वंचित राहिले. जागतिक आरोग्य संघटनेने ३० जानेवारी रोजी ‘कोविड-१९’ला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आपत्काळ आणि ११ मार्च रोजी महामारी घोषित केले. परंतु, तोपर्यंत स्थिती मोठ्या प्रमाणावर बिघडली होती आणि महामारीचा प्रसार बेलगाम झाला होता.
 
२२ कोटी लोकसंख्येसह पाकिस्तान जगातला पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून त्याची उत्तर सीमा चीनला भिडलेली आहे. तथापि, चीनशी घनिष्ठ संबंध असूनही दीर्घकाळपर्यंत पाकिस्तान ‘कोविड-१९’च्या प्रकोपापासून दूर राहिला आणि २६ फेब्रुवारी, २०२० रोजी त्या देशात ‘कोविड-१९’चा पहिला रुग्ण आढळला. दरम्यान, विषाणू प्रसार रोखणे व जनतेला संक्रमणापासून वाचवण्यासाठी जगातील अनेक देशांतील सरकारांनी कठोर ‘लॉकडाऊन’ लावून त्याचा सामना करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाकिस्तानसारख्या विकसनशील देशावर ‘लॉकडाऊन’चा अनेक प्रकारे परिणाम झाला. पाकिस्तानमधील जवळपास ७१ टक्के बिगर-कृषी रोजगार अनौपचारिक क्षेत्रात असून तिथले कार्यबळ फार मोठ्या प्रमाणावर असंघटित असून रोजंदारीवर अवलंबून आहे, तसेच त्यात सामाजिक सुरक्षेचे प्रमाण कमी आहे. ‘लॉकडाऊन’मुळे त्यांचा जीवननिर्वाह कठीण झाला तर आरोग्यसंबंधित समस्या वा आपत्काळामुळे त्यांचे जीवन संकटात आले, तसेच पाकिस्तानची दुबळी आरोग्य प्रणाली जवळपास उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आली. ‘कोविड-१९’च्या या भयावह स्थितीने पाकिस्तानच्या आरोग्य व्यवस्थेची दुबळी बाजू उघड करण्याचे काम केले.
 
आरोग्यसेवेत संस्थात्मक कमतरता
 
 
पाकिस्तानात सार्वजनिक कल्याणाच्या इतर अनेक कार्यक्रम-उपक्रमांप्रमाणे आरोग्य प्रणालीदेखील वाईट परिस्थितीत आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय अर्थसंकल्पात आरोग्यावरील खर्च सकल घरगुती उत्पन्नाच्या एक टक्क्यापेक्षाही कमी असून ते ‘डब्ल्यूएचओ’च्या निर्धारित बेंचमार्क अर्थात जीडीपीच्या किमान सहा टक्के खर्चापेक्षा कमी आहे. २०१० साली पाकिस्तानच्या संविधानातील अठराव्या घटनादुरुस्तीनंतर आरोग्य संवैधानिकरीत्या राज्यसूचीतील विषय झाला आणि मानवसंसाधन प्रबंधनाची जबाबदारी आता संबंधित प्रांतीय सरकारांची आहे. तथापि, ‘कोविड-१९’सारख्या वैश्विक आपत्तीचा सामना करण्यासाठी राष्ट्रव्यापी धोरणाची आवश्यकता असून प्रांता-प्रांतातील स्वतंत्र आरोग्य प्रणालीसारख्या विखंडित धोरण निर्धारणाने त्याची अंमलबजावणी पुरेशा प्रभावी पद्धतीने होऊ शकत नाही. केंद्रीय आणि प्रांतीय सरकारांदरम्यान समन्वय आणि भूमिकेच्या स्पष्टतेची कमतरता, दुबळी आरोग्य प्रणाली, संसाधनांची कमतरता आणि जिल्हा व त्याखालील स्तरावरील वाईट कार्यान्वयन, अशिक्षा व उच्च लोकसंख्या घनता ही पाकिस्तानच्या आरोग्यसेवेला दुबळे करणारी प्रमुख कारणे आहेत.
 
 
पाकिस्तान सातत्याने भूकंप आणि महापुराबरोबरच महामारीसारख्या आपत्तींचा सामना करत आला. ‘नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटी’ पाकिस्तानमध्ये आपत्तीवर मात करणे आणि नियंत्रण मिळवण्यासाठीची शीर्षस्थ धोरण-निर्मिती संस्था आहे. नैसर्गिक वा अन्य आपत्तींचा सामना करण्यासाठी अनेक आकस्मिक योजनादेखील आहेत. परंतु, पाकिस्तानकडे आरोग्यविषयक आपात स्थितीचा सामना करण्यासाठी एक समन्वित राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन योजना नाही. देशाचे वैश्विक आरोग्य सूचकांक गुण १०० पैकी ३५.५ असून त्याचा १९५ देशांच्या यादीत १०५ वा क्रमांक लागतो. तसेच महामारीचा सामना करण्यासाठी ज्या देशांची तयारी सर्वात कमी आहे, अशा देशांच्या यादीत त्याचा समावेश होतो. ‘कोविड-१९’शी लढण्याच्या त्याच्या एकंदरीत कृतीवेळी ते स्पष्ट दिसलेही.
 
 
आरोग्यविषयक अधोसंरचनेत गहिरी कमतरता
 
 
पाकिस्तानमध्ये डॉक्टर्स, परिचारिका आणि संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांची भीषण कमतरता आहे. डॉक्टर आणि लोकसंख्येचे प्रमाण १:१३०० इतक्या निम्न स्तरावर आहे. सोबतच परिचारिका-रुग्णांचे प्रमाण १:५० इतके असून दर एक हजार लोकसंख्येमागे परिचारिका/दायांची संख्या ०.६६ आहे. ग्रामीण भागात तर ही परिस्थिती अतिशय भयावह असून पाकिस्तानमध्ये एक लाख ९४ हजार नोंदणीकृत डॉक्टर आहेत व त्यातील ३० हजार डॉक्टर अतिदक्षता विभाग किंवा ‘आयसीयू’मध्ये काम करतात. पाकिस्तानकडे एका बळकट आरोग्यसुविधेचा अभाव आहे. २२ कोटी लोकसंख्येच्या आरोग्यविषयक गरजा भागवण्यासाठी देशात पाच हजार ५२७ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ६८६ ग्रामीण आरोग्य केंद्रे आणि पाच हजार ६७१ औषधालये आहेत. २०१८ साली १,६०८ रुग्णांमागे पाकिस्तानात केवळ एक रुग्णशय्या उपलब्ध होती. तसेच औषधपुरवठा साखळीतील कमतरता हीदेखील एक मोठीच दुबळी बाजू आहे. ‘कोविड-१९’चे परिदृश्य पाहता, पाकिस्तानी सरकारसाठी लोकसंख्येच्या औषधाशी संबंधित गरजा पूर्ण करणेदेखील एक मोठे आव्हान आहे. ‘डब्ल्यूएचओ’द्वारे निर्धारित लक्ष्य दहा हजार लोकांमागे पाच औषधविक्रेते असावे, असे असून पाकिस्तानात मात्र त्याचे प्रमाण दहा हजार लोकांमागे १.६ औषधविक्रेते इतके अल्प आहे.
 
 
 
एका बाजूला पाकिस्तानात आरोग्याशी संबंधित संसाधने आणि आराखड्याची कमतरता असून, दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या आरोग्य प्रणालीवर दहशतवादी हल्लेही सातत्याने होत असतात. खैबर पख्तुनख्वासारख्या अशांत आणि उपद्रवग्रस्त प्रांतात आरोग्यविषयक सोयी-सुविधांच्या जवळपास १९ टक्के आराखड्याला नष्ट करण्यात आले आहे. इस्पितळे आणि अन्य सुविधांची कमतरता, संक्रमित रुग्णांचे निदान, उपचारातील विलंब ‘कोविड-१९’मुळे होणाऱ्या मृत्यूसाठी उत्तरदायी आहे.
 
 
लोकसंख्या आणि लोकआरोग्य!
 
 
पाकिस्तान एक निम्न मध्यम उत्पन्नाचा देश असून त्याचा मानव विकास सूचकांक १८९ देशांत १५२व्या क्रमांकासह ०.५६० आहे. पाकिस्तान गेल्या काही दशकांत आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करत आला. परंतु, शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चातील कमतरतेने तिथली स्थिती अधिकच बिघडली. उत्तम आरोग्यविषयक मानदंडांची पूर्तता करण्यातील अपयशामुळे पाकिस्तान साथरोगांचे आगर झाला नि साथरोगांमुळे मोठ्या संख्येतील लोकांनी आपले प्राण गमावले. ‘रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’ आणि क्षयरोग पाकिस्तानातील मृत्युदराच्या शीर्ष कारणांपैकी एक होते. पाकिस्तानच्या लोकसंख्येत जवळपास एक तृतीयांश शहरवासी (३७ टक्के) आणि दोन तृतीयांश (६३ टक्के) ग्रामवासी सामील आहेत. तथापि, शहरवासीयांपेक्षा ग्रामवासींमध्ये महामारीची बाधा होणाऱ्यांची बहुसंख्या आहे. या क्षेत्रातील ग्रामीण आरोग्य केंद्रात उपलब्ध सुविधा, आपत्तीवेळी ग्रामीण समुदायांच्या गरजा भागवण्यासाठी अपुऱ्या आहेत. पाकिस्तानमध्ये बिगरसंक्रामक जुनाट आजार अर्थात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोगाचे प्रमाण सर्वाधिक असून जवळपास ८० टक्के वृद्ध या जुनाट आजारांनी ग्रासलेले आहेत. अशा स्थितीत ‘कोविड-१९’चा धोका अधिकच वाढतो.
 
 
व्यापक माहिती प्रसारणाचा अभाव!
 
 
दरम्यान, पाकिस्तानमध्ये वरील कारणांव्यतिरिक्त वेळोवेळी उद्भवणाऱ्या साथरोगांचा धोका कमी करण्यासाठी जलद माहिती प्रसारण तंत्राचा अभाव आहे. ‘ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी इंडेक्स २०१९’नुसार पाकिस्तानने आरोग्य देखभाल प्रणालीच्या अनेक पैलूंत ‘शून्य इंडेक्स स्कोर’ मिळवला. त्यात आपत्कालीन तयारी आणि प्रतिक्रिया योजना, आरोग्य कार्यकर्त्यांबरोबर संचार, संक्रमण नियंत्रण प्रणाली आणि उपकरणांची उपलब्धता, जोखीम संचार प्रणाली, सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन प्रतिक्रियेवर सीमेपलीकडे करार इत्यादींचा समावेश होतो. तथापि, २००५ साली जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने एक ‘डिसीज अर्ली वॉर्निंग सिस्टीम’ विकसित करण्यात आली. पण, तिला व्यवस्थित लागू करण्यात आले नाही.
 
 
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, संपूर्ण पाकिस्तानी आरोग्य क्षेत्रात मोठे असंतुलन असून, त्या असंतुलनाला बरोबर घेऊनच तो देश आपत्तीचा सामना करत आहे. आरोग्य सुरक्षेशी संबंधित मनुष्यबळ, वितरण व आरोग्यसेवांच्या विभिन्न स्तरावरील संसाधनांचा अपुरा पुरवठा पाकिस्तानचा मोठा दुबळेपणा आहे. परंतु, पाकिस्तानमध्ये वैचारिक पातळीवरील तार्किकतेचा अभाव, वैज्ञानिक विचारांची कमतरता, धार्मिक कट्टरपंथीयांचे वर्चस्व आणि जीवनाबद्दलचा निराशावादी दृष्टिकोन पाकिस्तानच्या बहुसंख्य जनतेला ‘कोविड’च नव्हे, तर कोणत्याही आपत्तीसमोर दुर्बल करतो आणि त्यामुळे त्या देशातील जीवनपण प्रभावित होते.
 
 
(अनुवाद : महेश पुराणिक)
@@AUTHORINFO_V1@@