कोकण किनारपट्टीवर समुद्री कासव विणीला सुरुवात; 'या' किनाऱ्यावर सापडली अंडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2021
Total Views |
sea turtle _1  


मुंबई (अक्षय मांडवकर) -
महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर सागरी कासव ( sea turtle ) विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामातील पहिली दोन घरटी रायगड जिल्ह्यातील आरवी आणि दिवेआगर किनाऱ्यावर सापडली आहेत. आरवी किनाऱ्यावर प्रथमच कासवाचे ( sea turtle ) घरटे आढळून आल्याने वन विभागाच्या कासव विणीच्या किनाऱ्यांच्या यादीत नसणाऱ्या किनाऱ्यांवर देखील लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील (sea turtle) 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा ( sea turtle ) विणीचा हंगाम असतो. यामध्ये वन विभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १३ किनाऱ्यांवर कासवांची विण होते. मात्र, वन विभागाकडे नोंद नसलेल्या किनाऱ्यांवर देखील आता लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, यंदाच्या हंगामातील 'ऑलिव्ह रिडले' कासवाचे ( sea turtle ) पहिले घरटे हे रायगड जिल्ह्यातील आरवी किनाऱ्यावर सापडले आहे.


 

दिवेआगर आणि श्रीवर्धन किनाऱ्याच्या मधल्या पट्ट्यामध्ये आरवी किनारा असून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याठिकाणी घरटे सापडले. वन विभागाच्या कासवाची विण होणाऱ्या किनाऱ्यांच्या यादीमध्ये या किनाऱ्याचा समावेश नाही. त्यामुळे यादीमध्ये नसलेल्या किनाऱ्यांना भेट देऊन त्याठिकाणी सद्यस्थितीत कासवांची घरटी सापडत आहेत का ? याची माहिती जाणून घेणे गरजेचे झाले आहे. आरवी किनाऱ्यावर आम्हाला प्रथमच कासवाचे घरटे ( sea turtle ) आढळून आले असून त्यामध्ये सापडलेली १०० अंडी ही आम्ही दिवेआगरच्या किनाऱ्यावर हलवल्याची माहिती श्रीवर्धनचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली. त्यानंतर दिवेआगरच्या किनाऱ्यावर आम्हाला दुसरे घरटे सापडले असूून त्यामध्ये १०४ अंडी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


२०२०-२१ साली सागरी कासवांच्या (sea turtle) विणीच्या हंगामात कोकण किनारपट्टीवर कासवांची ४७५ घरटी आढळली होती. यातून समुद्री कासवांची (sea turtle) २३ हजार ७०६ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. त्यावेळी पिल्लांची आणि घरट्यांची ही संख्या २०१९-२० सालच्या हंगामापेक्षा दुप्पट होती. तसेच पिल्लांचा जन्म होण्याचा दरही ५७ टक्के होता, जो २०१९ साली केवळ ३५ टक्के होता.
 
 
 
यंदाच्या कासव विणीच्या हंगामासाठी अंड्यांचे संवर्धन करणाऱ्या कासवमित्रांच्या मार्गदर्शनपर कार्यशाळा घेऊन पूर्ण झाल्या आहेत. यंदापासून कासवमित्र हे घरट्यांच्या नोंदी 'एम-टर्टल' अॅपमध्ये नोंदवतील. यासंदर्भातील प्रशिक्षणही कार्यशाळांमध्ये देण्यात आले असून यामुळे कासवांच्या घरट्यांची आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांच्या संख्येची नोंद होण्यामध्ये सुसूत्रता येईल. - विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष 

@@AUTHORINFO_V1@@