पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद रोखण्यासाठी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2021
Total Views |

india 2_1  H x




पाकिस्तान आपल्या देशात अमली पदार्थांचे व्यसन रुजवत आहे, ‘नार्को टेररिझम’ म्हणजे अफू, गांजा, चरसचे युद्ध चालवत आहे, याविषयी आपण जगाला माहिती देऊ शकतो का? आणि पाकिस्तानला वाळीत टाकण्याकरिता प्रयत्न करू शकतो का? पाकिस्तानी सैन्य आणि ‘आयएसआय’ विरुद्ध आपण माहितीयुद्ध छेडू शकू काय? ज्यामुळे त्यांची दुष्कृत्ये बाहेर येऊन जनमत त्यांच्याविरुद्ध जाईल? पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तान व पख्तुनिस्तानात केलेला शस्त्रांचा वापर समोर येईल. आपण आपली सगळी ताकद पाकिस्तान, आणि चीनच्या विरुद्ध वापरली पाहिजे.



पूॅंछच्या सुरनकोटमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक ‘जेसीओ’ आणि चार जवान नुकतेच हुतात्मा झाले. या भागात तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. ‘एलओसी’ला लागून असलेल्या सुरनकोटमध्ये ही चकमक झाली.अनंतनागमधील चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. दुसरी चकमक बांदीपोरा जिल्ह्यामध्ये झाली. ठार झालेला दहशतवादी अहमद डार हा ‘लष्कर-ए-तोयबा’चा (टीआरएफ) होता.जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या सहा दिवसांत काश्मिरी पंडित, शीख समुदायाशी निगडित सात नागरिकांची दहशतवाद्यांकडून हत्या घडवून आणण्यात आली. यानंतर सुरक्षा दलाकडून जवळपास ७०० हून अधिक बंदी घालण्यात आलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित व दहशतवाद्यांच्या ‘ओव्हरग्राऊंड वर्कर्स’ना (ओजीडब्ल्यू) पकडले.श्रीनगरमध्ये एका शाळेत घुसून सुंदर कौर आणि दीपक चंद या दोन शिक्षकांची हत्या करण्यात आली. यातील एक शीख आणि दुसरा हिंदू असल्याने त्यांना ‘टार्गेट’ केले. श्रीनगरमध्ये औषध दुकानांचा मालक ७० वर्षीय माखन लाल बिंदरू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. इतर दोन नागरिकांत टॅक्सीचालक मोहम्मद शफीआणि पाणीपुरी विक्रेता वीरेंद्र पासवान यांचा समावेश आहे.दहशतवाद्यांकडून हिंदू आणि शीख समाजातील निष्पाप नागरिकांची हत्या घडवून येत असल्याने त्यांचे पलायन सुरू झाले आहे. या भागातील अल्पसंख्याक नागरिकांविरोधात हिंसाचाराच्या घटनांत अचानक वाढ का झाली? तालिबान अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आल्यानंतर पाकिस्तान तालिबानी दहशतवाद्यांचा वापर करून काश्मीरमध्ये दहशतवादाला पुनर्जीवित करेल, हे अपेक्षित होते आणि तेच झाले, आता काय करावे.उरी सेक्टरमध्ये भारतीय सेनेने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं, तर एका १९ वर्षांच्या ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित दहशतवाद्याला जीवंत अटक करण्यात आली. ‘लष्कर-ए-तोयबा’मध्ये दाखल झालेल्या १९ वर्षीय बाबरला मुजफ्फराबादमध्ये दहशतवादाचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं.

दहशतवाद थांबवायला अजून काय करावे?

गेल्या ७० वर्षांत वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबवायचा प्रयत्न केला. परंतु, त्यामध्ये अजून यश मिळालेले नाही. कारणे अनेक आहेत. या विषयावरती मी काही कल्पना सूचवू इच्छितो.

पाक लष्कर प्रभावहीन करण्यासाठी

पाक लष्कर प्रभावहीन करण्यासाठी काय करता येईल? पाक लष्कर ही केवळ भारताची समस्या नसून सर्व जगाला ते अडचणीचे ठरू शकते. यासाठी आपल्याला एक सर्वसमावेशक राजनैतिक मोहीम कायम सुरू ठेवावी लागेल.दहशतवादाला वित्तपुरवठा करणार्‍या देशांवर नियंत्रण ठेवणार्‍या ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ या संघटनेने पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकले आहे. अधिकृतपणे पाकिस्तान काळ्या यादीत गेला तर परदेशी गुंतवणुकीचा ओघ थांबेल. यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडेल.

छुप्या युद्धाविरोधी प्रतिहल्ला
(काऊंटर ऑफेन्सिव्ह)



पाकिस्तानला त्याच्या स्वतःच्याच औषधाची चव चाखवली गेली पाहिजे. पाकिस्तानची सिंध, बलुचिस्तान आणि एनडब्ल्यूएफपी ही राज्ये गोंधळाच्या परिस्थितीत आहेत. तिथे फुटीर चळवळी अस्तित्वात आहेत.भारतही छुपेयुद्ध, बलुचिस्तान आणि एनडब्ल्यूएफपी. या पाकिस्तानी प्रांतांत नेण्याकरिता उपाय करू शकतो. पाकिस्तानी सैन्य छुप्या युद्धात गुंतले आणि सैनिकांचे प्राण अधिक गमावू लागले की, त्यांना जम्मू-आणि-काश्मिरात दहशतवाद्यांना आधार देणे थांबवावे लागेल. पाकिस्तानने भारतास आणि भारतीय सैन्यास, अफगाणिस्तानमध्ये/ नेपाळमध्ये/ बांगलादेशात लक्ष्य केलेले आहे. आपणपण त्यांचा सामना या सर्वच देशांत करू शकू काय?


दीर्घकालीन नियोजन जरुरी

याकरिता काही उपाय अमलात आणले जाऊ शकतात.सिंध, पाकव्याप्त काश्मीर, एनडब्ल्यूएफपी या प्रदेशांत गंभीर हल्ले चढवून त्यात सहभाग असल्याचे नाकारत राहणे. पाकिस्तानातील फुटीरवादात तेल ओतणे. शेजारी देशांतील ‘आयएसआय’च्या कारवायांना आपल्या हस्तकांकरवी आणि त्या देशांत घातलेल्या गुप्त छाप्यांद्वारे पायबंद घालणे. ‘आयएसआय’ला लक्ष्य करण्यासाठी ‘सीआयए’, ‘मोसाद’ यांसारख्या मित्रपक्षी गुप्तवार्ता संकलन संस्थांचा वापर करणे.इराण व बलुची स्वातंत्र्यप्रेमी यांनीही आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. भारतही पाकिस्तानमधल्या अंतर्गत असंतोषाला सक्रिय पाठिंबा देऊन पाकिस्तानचा डाव उलटवू शकतो.दहशतवाद संपवण्यासाठी एक सर्वसमावेशक योजना तयार करणे जरुरी आहे. आपल्याला विजयी व्हायचे असेल, तर दीर्घकालीन नियोजन जरुरी आहे.


देशाच्या सर्व घटकांचा (नॅशनल पॉवर) वापर जरुरी

या घटकांत आर्थिक ताकद, तंत्रज्ञान, सैन्य दले, स्थिर सरकार/परिपक्व लोकशाही इत्यादींचा समावेश होतो. अन्य घटकांत (Intangible Components), राष्ट्रीय इच्छाशक्ती, ऐक्य आणि नीतीधैर्य यांचा समावेश होतो. आर्थिक-सामर्थ्ययुद्ध (इकोनॉमिक वॉरफेअर), माहिती युद्ध (इन्फॉर्मेशन वॉरफेअर), विजकीय युद्ध (इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर), गुप्तचरदल इत्यादींचा पाकिस्तानच्या छुप्या युद्धाचा सामना करण्यासाठी वापर केला जावा.


पाकिस्तानविरुद्ध माहिती युद्ध जिंका

बलुचिस्तान, ‘एफएटीएफ’मधील मानवी हक्कभंगांबाबतची आपली चिंता सातत्याने व्यक्त करू शकू काय? पाकिस्तानातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवरील मानवी हक्कभंगांची प्रकरणे समोर आणू शकू काय? पाकिस्तानातील शिया आणि सुन्नी यांच्यातील भेद आणि शिया, अहमदिया यांच्यावर होणारा अन्याय आपण अधोरेखित करू शकू काय?पाकिस्तान आपल्या देशात अमली पदार्थांचे व्यसन रुजवत आहे, ‘नार्को टेररिझम’ म्हणजे अफू, गांजा, चरसचे युद्ध चालवत आहे, याविषयी आपण जगाला माहिती देऊ शकतो का? आणि पाकिस्तानला वाळीत टाकण्याकरता प्रयत्न करू शकतो का? पाकिस्तानी सैन्य आणि ‘आयएसआय’विरुद्ध आपण माहितीयुद्ध छेडू शकू काय? ज्यामुळे त्यांची दुष्कृत्ये बाहेर येऊन जनमत त्यांच्याविरुद्ध जाईल? पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तान व पख्तुनिस्तानात केलेला शस्त्रांचा वापर समोर येईल. आपण आपली सगळी ताकद पाकिस्तान, आणि चीनच्या विरुद्ध वापरली पाहिजे.


‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’चा वापर


पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील माहितीसंचार रोखणे, बाहेरून रेडिओ बलुचिस्तान सुरू करणे. पाकिस्तानी सैन्याच्या आंतरजालाच्या, प्रक्षेपणास्त्रांच्या आणि आण्विक-मार्गदर्शक-प्रणालीच्या ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’ संकेतांची उकल करणे. प्रत्येक शत्रुत्वपूर्ण कार्यवाहीचे प्रत्युत्तर देणे. मात्र, त्यातील खेळी बुद्धिबळातील खेळींप्रमाणे खेळणे. पाकिस्तानच्या प्रतिसादांसाठी आपण तयार राहावे आणि पाकिस्तान व ‘आयएसआय’करता अशा खेळींचे मोल वाढवत न्यावे.आपल्याला पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये घुसून त्या उद्ध्वस्त करता येणार नाही का? त्यांची माहिती आपण थांबवू शकतो का? त्यांच्या प्रणालीत घुसून त्यांच्यावर आपण लक्ष ठेवू शकतो का? थोडक्यात, त्यांच्याविरुद्ध एक सर्वसमावेशक ‘सायबर युद्ध’ सुरू करण्याची गरज आहे. हिंसाचार आणि स्फोटक-उपाय हे अंतिम पर्याय असावेत.


जशास तसे प्रतिसाद


पाकव्याप्त काश्मीर, ‘एनडब्ल्यूएफपी’, बलुचिस्तान आणि सिंध यांसहित पाकिस्तानच्या भागांत स्वतंत्र चळवळी निर्माण करण्याचा विचार करावा. शिया-सुन्नी-अहमदीभेदाचा, पंजाबी वर्चस्वाचा, सरंजामशाही विरुद्ध व्यापारी समाजभेद आणि इतर अशाच भेदांचा वापर करून घ्यावा. पाकिस्तानला त्याच्या भारतविरोधी कार्यवाहींच्या शिक्षात्मक परिणामांचे भान आणून द्यावे.


पारंपरिक प्रतिसाद

पारंपरिक प्रतिसादांच्या संपूर्ण उपायांचा विचार केला जावा. आक्रमक मुत्सद्देगिरीपासून, सीमेवर सैन्य आणून आक्रमक पवित्रा घेण्यापासून, तोफखाना वापर, नियंत्रणरेषेवरील चकमकींपासून, तर धडक कार्यवाही (हॉट पर्स्यूट) आणि अतिरेकी प्रशिक्षण शिबिरांवर छापे व हल्ले चढविण्यापर्यंत सर्वच उपायांचा विचार केला जावा.प्रादेशिक असंतुलन दुरुस्त करावे आणि काश्मीर खोर्‍याला व खोर्‍यातील नेत्यांना अनावश्यक महत्त्व देऊ नये. उधमपूरला राज्याची आर्थिक राजधानी करावे. ज्यामुळे खोरे व जम्मू यांमधील परस्परसंबंध वाढतील.


आपण इराणच्या मदतीने पाकिस्तानविरुद्ध एक नवी आघाडी उघडू शकतो का?

पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला करण्याकरिता आपण अफगाणी गुप्तहेरचा वापर करू शकतो का? मुख्य लक्ष असावे, पाकिस्तानचे सैन्य आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’.


पाकिस्तानचे तुकडे करा!


पाकिस्तानचे तुकडे करून पाकव्याप्त काश्मीरला भारताच्या बरोबर जोडणे जरुरी आहे. याशिवाय अफगाणिस्तान सीमेजवळील वझिरिस्तान आणि फाटा या प्रदेशांना अफगाणिस्तानबरोबर बृहन पख्तुनिस्तान जोडले जावे. सिंध आणि बलुचिस्तानमध्ये चालू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीला यश मिळाल्यानंतर ते स्वतंत्र देश म्हणून प्रस्थापित केले जावे. म्हणजेच, सध्याच्या पाकिस्तानमध्ये फक्त पाकिस्तान पंजाब एवढेच शिल्लक राहील. यामुळे पाकिस्तानची भारताच्या विरुद्ध दहशतवादी कृत्ये करण्याची क्षमता ही कमी होईल. पाकिस्तानचे तुकडे होणे हे भारताकरिता दहशतवाद विरोधी लढाई जिंकण्याकरिता जरुरी आहे.




- (नि.) ब्रि. हेमंत महाजन



@@AUTHORINFO_V1@@