कांदळवनांना बळकटी; राज्यातील १,५७५ हे. कांदळवन 'राखीव वनक्षेत्र' म्हणून घोषित

    14-Jan-2021   
Total Views | 287

mangrove _1  H


ठाणे-मिरा भाईंदरमधील १,३८७ हे. कांदळवन राखीव वनांसाठी प्रस्तावित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वन विभागाने १२ जानेवारी रोजी अधिसूचना काढून राज्यातील १,५७५ हेक्टर कांदळवन जमीन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केली आहे. सोबतच ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ताब्यातील १,३८७ हेक्टर जमीन 'वन कायद्याती'ल कलम ४ अंतर्गत राखीव वन म्हणून घोषित करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या क्षेत्रामध्ये मुंबईतील २५३ हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्यामुळे शहरातील कांदळवन संरक्षणाला हातभार लागला आहे. 
 
 
मुंबई उच्च न्यायालयाने २००५ आणि २०१८ साली विविध सरकारी विभागांच्या कांदळवन आच्छादित जमिनी वन विभागाच्या ताब्यात देऊन त्यांना राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश दिले होते. यावर गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेऊन पाठपुरावा केला होता. यावेळी त्यांनी कलम ४ अंतर्गत 'राखीव वन' म्हणून अधिसूचीत झालेल्या कांदळवन जमिनींवरील नागरिकांच्या हरकती आणि दाव्यांची चौकशी १५ जानेवारी, २०२ पर्यंत पूर्ण करुन त्यांनी अंतिम राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्याचे आदेश प्रशासनाला केले होते. शिवाय म्हाडा, एमएमआरडीए, मिरा-भाईंदर महानगरपालिका, वसई-विरार महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व इतर महानगरपालिकांच्या ताब्यातील कांदळवन क्षेत्र राखीव वन म्हणून अधिसूचीत करण्यास व वन विभागास हस्तांतरीत करण्याचे निर्देश विभागीय कोकण आयुक्तांना दिले होते. या आदेशावर कारवाई करत वन विभागाने मंगळवारी राखीव वनक्षेत्राबरोबरच कलम ४ अंतर्गत प्रस्तावित केलेल्या कांदळवन क्षेत्राची अधिसूचना प्रसिद्ध केली. 

 
 
या अधिसूचनेनुसार सिंधदुर्ग, रायगड, ठाणे आणि मुंबईतील अंधेरी-बोरिवली जिल्ह्यातील १,३८६ हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३७४.५ हे, रायगड ३९२ हे, बोरिवलीतील १८२.९ हे, अंधेरीतील ७० हे आणि ठाण्यातील ५५४.७ हे क्षेत्राचा समावेश आहे. या जमिनींवरील नागरी हरकती आणि दाव्यांची पूर्तता करुन त्यांना राखीव वनक्षेत्राचा अंतिम दर्जा देण्यात आला आहे. याशिवाय ठाणे महानगरपालिकेच्या ताब्यातील ३५०.५१ हे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या ताब्यातील १०३६.८८ हेक्टर कांदळवन आच्छादित जमीन कलम ४ अंतर्गत राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती 'कांदळवन कक्षा'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. या जमिनींवरील नागरी दावे आणि हरकतींची पूर्तता केल्यानंतर ही जमीन वन विभागाच्या ताब्यात घेईन राखीव वनक्षेत्राची अंतिम अधिसूचना काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. हे क्षेत्र राखीव वनक्षेत्रासाठी प्रस्तावित झाल्याने राज्यातील एकूण कांदळवन क्षेत्रामध्ये वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. 
 
 
 
 
 
पांजेबाबत बैठक 
राज्यातील कांदळवनांच्या स्थितीसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी मागील बैठकीत दिलेल्या आदेशांचा आढावा घेतला. यावेळी उरणमधील पांजे पाणथळ आणि तेथील कांदळवनांबाबतही चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून पांजेमधील कांदळवन जमिनीवर अतिक्रमणाच्या आणि भरावाच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नाबाबत पांजेची मालकी असणाऱ्या सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत येत्या काही दिवसांमध्ये ठाकरे बैठक घेणार आहेत.
 
 
मँग्रोव्ह सेल, वन व पर्यावरण विभागांच्या संयुक्त प्रयत्नांनी वर्षभरापेक्षा कमी कालावधीत ६,५०० हेक्टर क्षेत्र मँग्रोव्ह क्षेत्र म्हणून भारतीय वन अधिनियम,१९२७ चे कलम-२० अंतर्गत राखीव केले आहे. येत्या जूनपर्यंत हे क्षेत्र १०,००० हेक्टरपर्यंत वाढणार आहे. - आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121