आरेतील प्रस्तावित राखीव वनक्षेत्रात वाढ; ६०० ऐवजी ८०० एकर जागा होणार संरक्षित

    दिनांक  22-Sep-2020 21:40:47
|
aarey _1  H x W

६०० एकरांऐवजी ८०० एकराहून अधिक जागा होणार संरक्षित 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहतीमधील जवळपास ८०० एकर पेक्षा अधिक जमीन ही राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित होणार आहे. राज्य सरकारने आरेतील ६०० एकरचे क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून प्रस्तावित केले होते. सर्वेक्षणाअंती त्यामध्ये २०० ते २१२ एकराची वाढ झाली आहे.
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मेट्रो-३' कारशेड वादाच्या पार्श्वभूमीवर ३ सप्टेंबर रोजी आरेतील ६०० एकर राखीव वनक्षेत्राची घोषणा केली होती. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वन आणि आरे प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आरेतील परिसराचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानंतर ठाकरे यांनी युद्धपातळीवर राखीव वनक्षेत्र अंतिम करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात मंत्रालयात अनेक बैठका पार पडल्या. मंगळवारी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात जागेच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत महसूल, आरे आणि वन विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी राखीव वनक्षेत्राच्या अंतिम जागेबाबत चर्चा करण्यात आली.
 
 
 
या बैठकीअंती ८०० एकर हून अधिक जागा ही राखीव वनक्षेत्रासाठी अंतिम करण्यात आली असल्याची माहिती बैठकीत उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. या राखीव वनक्षेत्रामध्ये आरेमध्ये प्रस्तावित असणाऱ्या प्राणिसंग्रहालयाच्या १०० एकर जागेचाही समावेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'ला लागून असलेला डोंगराळ भाग ज्याठिकाणी बिबट्याच्या हालचालींची नोंद करण्यात आली आहे, अशा जागाही या राखीव वनक्षेत्रात घेतल्याचे, ते म्हणाले. पुढील दोन दिवसांमध्ये महसूल विभागाकडून जागेसंदर्भातील कागदपत्रांची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर आरेतील राखीव वनक्षेत्रासंदर्भातील अंतिम प्रस्ताव शासनाला पाठवला जाईल.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.