‘मोमस’ची संतान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Aug-2020   
Total Views |

vicharvimarsh_1 &nbs

डावी मंडळी आणि त्यांचे पत्रकार मित्र आणि राहुल गांधीसारखे अपरिपक्व नेते ही या ‘मोमस’ची संतान आहे. त्यांना आपण सहन केले पाहिजे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या ७४व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रथेप्रमाणे लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण झाले. या भाषणाविषयी देशात कमालीची उत्सुकता होती. कोरोनाच्या संकटातून देश जात आहे. सीमेवर चीनच्या कटकटी चालू आहेत. पाकिस्तानातून दहशतवादी अधूनमधून काश्मीरमध्ये घुसतात. पाच महिने देशात ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे अर्थव्यवस्था मंद झाली आहे. सर्व जग कोरोनाने ग्रस्त आहे. त्याचेही परिणाम आपल्या आर्थिक जीवनावर आणि राजकीय जीवनावरदेखील झालेले आहेत. कोरोना लसीची वाट उत्सुकतेने सर्वजण पाहत आहेत. अशा पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण देशापुढील सर्व समस्यांना स्पर्श करणारे, आत्मविश्वासाने भरलेले, जनतेवर पूर्ण विश्वास व्यक्त करणारे आणि विचारधारेची विषयसूची उलगडणारे झाले. सामान्य जनतेला ते फारच आवडले. अनेकांनी शंभरपैकी शंभर गुण भाषणाला दिले. काहीजणांनी ८०-९० गुण दिले. शून्य गुण देणारे काहीजण आहेत. त्यात राहुल गांधी आणि देशातील कम्युनिस्ट व या दोघांची विषयसूची चालविणारे विकाऊ आणि भ्रमित पत्रकार आहेत. या सर्वांची वक्तव्ये वाचल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत असलेली एक गोष्ट मला आठवली. समाधीसुखाचा अनुभव घेत एक संन्यासी झाडाखाली बसला होता. एका चोराने त्याला पाहिले. त्याची ध्यानमग्न मूर्ती बघून तो म्हणाला, “हा कुणीतरी अट्टल चोर असावा. राजाचे शिपाई पकडण्यासाठी येतील म्हणून हा ध्यान धरुन बसलेला आहे,” असे म्हणून तो निघून गेला. थोड्या वेळाने झोकांड्या खात एक दारुडा तेथे येतो. तो म्हणतो, “काय मस्त चढली आहे याला, काही बोलत नाही, हलत नाही, निवांत बसून आहे. घरी गेला तर मार खावा लागेल, म्हणून हा इथे बसला आहे,” असे म्हणून तो तेथून निघून जातो. शेवटी एक साधू तेथे येतो. तो समाधी लावलेल्या साधूकडे पाहतो. त्याला आनंद होतो आणि तो त्याची सेवा करु लागतो. म्हणतात ना, ‘वर्म जाणे तो पारखी’ मोदींच्या भाषणाकडे बघण्याच्या तीन वृत्ती आहेत. त्या कशा आहेत, ते आपण बघू.



मोदींनी आपल्या भाषणात चीनचे नाव न घेता चीनची दादागिरी खपवून घेता येणार नाही, असा इशारा आपल्या भाषणात दिला. गलवान खोर्‍यात हुतात्मा झालेल्या आपल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचा गौरव केला. राहुल गांधी म्हणतात, “मोदी डरपोक आहेत. त्यांनी आपल्या भूमीवर ताबा घेऊ दिला आहे.” आपल्या सैन्यदलाच्या क्षमतेवर मोदी सोडून सर्वांचा विश्वास आहे. मोदी यांना ‘डरपोक’ म्हणत असताना मी खूप शूर आहे,” असा भाव राहुल गांधी व्यक्त करतात. ते ज्या घराण्यात जन्मले आहेत, त्याचे मूळ पुरुष पंडित नेहरु आहेत. पंडित नेहरुंच्या शौर्याचे काय वर्णन करावे! त्यांनी तिबेट चीनला देऊन टाकला. लडाखची हजारो चौरस किमीची भूमी चीनला दिली. चीनच्या सीमा भारताला आणून भिडविल्या आणि एक तृतीयांश काश्मीर पाकिस्तानला देऊन टाकला. नेहरुंनी भारताला संकुचित केले. आपल्या पणजोबांच्या घोडचुका कशा दुरुस्त करणार? यावर राहुल गांधींनी बोलले पाहिजे. ज्या कुळात हत्तीची शिकार करण्याचे शौर्य नाही, त्याने दुसर्‍याला ‘डरपोक’ म्हणण्यापूर्वी लाख वेळा विचार केला पाहिजे. राहुलजी, मोदींशी बरोबरी करु नका. कारण, सिंह आणि ससा यांची बरोबरी होऊ शकत नाही.


नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवर, मग ते लोकसभेतील असो, देशाला उद्देशून केलेले असो, लाल किल्ल्यावरुन केलेले असो, त्यात नसलेले दोष दाखविणे हा सीताराम येचुरी आणि कंपनींचा आवडता व्यवसाय आहे. पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील भाषणाच्या संदर्भात येचुरी म्हणतात की, “ज्या नवीन भारताची संकल्पना मोदींनी मांडली, ती आपल्या संविधानाने ज्या भारताची कल्पना केली आहे, त्या कल्पनेच्या विरोधी आहे. मोदींचा भारत ‘आत्मनिर्भर भारत’ नसून विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांना शरण गेलेला भारत आहे. आपल्या संविधानावर अनेक अंगाने जो हल्ला केला जात आहे, तो परतून लावण्यासाठी ‘जनआंदोलन’ हाच एक उपाय आहे.” कम्युनिस्ट सीताराम येचुरी यांचा ‘जनआंदोलन’ हा आवडता शब्दप्रयोग आहे. सगळे डावे विचारवंत, राजनेते, न चुकता जनआंदोलनाचा जप करीत राहतात. अनेकजण जनआंदोलन म्हणत म्हणत ‘मार्क्सवासी’ (स्वर्गवासी) होतात, पण, ‘जनआंदोलन’ काही उभे राहत नाही.


याचे कारण असे की, कम्युनिस्ट विचारधारा भयानक हिंसक विचारधारा आहे, हे भारतीय जनतेला समजत गेलेले आहे. या विचारधारेला आपली धर्मपरंपरा, आपली संस्कृती, आपली जीवनपद्धती, आपला गौरवशाली इतिहास याविषयी काहीही आस्था नाही. बंगालमधील जनतेने याचा अनुभव घेतलेला आहे. केरळची जनता आज याचा अनुभव घेते आहे. देशाला हा अनुभव घेण्याची इच्छा नाही. जनआंदोलन करण्यासाठी लोकांना संघटित करणारे विषय लागतात. केवळ भाजपविरोध हा विषय होऊ शकत नाही. भाजपचा विरोध म्हणजे हिंदू समाजाच्या आशा आणि आकांक्षाचा विरोध. तो सहन करण्याची परिस्थिती आता नाही. येचुरी यांनी राज्यघटनेचा उल्लेख केला. मुळात प्रश्न असा आहे, कम्युनिस्ट विचारधारेला लोकशाही मूल्यांवर आधारित राज्यघटना मान्य असते काय? १९४६साली जेव्हा राज्यघटना स्वीकारली गेली, तेव्हा कम्युनिस्टांनी तिचा विरोध केला. त्यांनी कामगारांच्या राज्याची आणि खासगी संपत्ती नष्ट करण्याची मागणी केली. लोकांना भ्रमित करण्यामध्ये कम्युनिस्टांची बुद्धी अत्यंत वेगाने धावत असते. यासाठी त्यांचेस खरे रुप आपण सदैव लक्षात ठेवायला पाहिजे. राज्यघटना आपल्या अंगभूत सामर्थ्यावर उभी आहे. राष्ट्राचे ऐक्य आणि एकात्मता हे तिचे ध्येय आहे. घटनेच्या उद्देशिकेत ते व्यक्त झाले आहे. येचुरी यांनी ते सदैव वाचावे, अशी त्यांना विनंती!



‘डेक्कन क्रॉनीकल’ या वृत्तपत्रात आकार पटेल या नावाचे एक पत्रकार सुरेख इंग्रजीत, इंग्रजी भाषेला गलिच्छपणा देणारे लेखन करीत असतात. नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजप, हिंदुत्व विचारधारा, यावर ते गलिच्छ, न थकता सतत लिहीत असतात. त्याबद्दल त्यांना भरपूर मानधन मिळत असावे. शेवटी ज्याच्या-त्याच्या पोटापाण्याचा विषय आहे. पोट कसे भरायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. पंतप्रधान मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर ‘डेक्कन क्रॉनीकल’ मध्ये त्यांचा लेख प्रकाशित झाला. काय वर्णन करावे या लेखाचे! पहिल्या वाक्यापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत नकारात्मक लेखन कसे करावे, याचा आदर्श नमुना म्हणजे हा लेख आहे. आकार पटेल म्हणतात की, “मोदी करमणूक करणारे वक्ते आहेत. मी त्यांची भाषणे कधी ऐकत नाही, पण स्वातंत्र्य दिनाचे भाषण ऐकावे लागते. मोदी यांनी राष्ट्रध्वजाला सॅल्युट करु नये, तो सैनिकांचा सन्मान आहे. त्यांच्या भाषणामध्ये कसलीच खोली नव्हती. आपला जीडीपी खाली का घसरत चालला आहे, यावर मोदी काही बोलले नाहीत. कोरोना व्हायरसची लढाई आपण जिंकू असे ते म्हणाले, पण ती कशी जिंकणार हे त्यांनी सांगितले नाही. अशी ही यादी खूप मोठी आहे.”



यावरुन इसापची एक गोष्ट आठवली. ही ग्रीक कथा आहे. ज्युपीटर, नेपच्यून, आणि मिनरवा या तिघांनी अनुक्रमे माणूस, बैल आणि घर तयार केले. तिघांतील कुणाचे काम चांगले, याचा निर्णय करण्यासाठी ते मोमस याच्याकडे गेले. मोमसचा स्वभाव नसलेले दोष शोधण्याचा होता. तो म्हणाला, ’‘माणसाचे हृदय बाहेर असायला पाहिजे होते. त्यामुळे त्याच्या मनात काय चालले हे समजले असते. बैलाच्या शिंगाला डोळे असायला पाहिजे होते. त्यामुळे बैलाला अचूक मारा करता आला असता आणि घराला चाके पाहिजे होती. त्यामुळे नको त्या शेजार्‍यापासून घर दूर नेता आले असते.” त्याचा निर्णय ऐकून देव भडकले आणि त्यांनी त्याला पृथ्वीवर पाठवून दिले. डावी मंडळी आणि त्यांचे पत्रकार मित्र आणि राहुल गांधीसारखे अपरिपक्व नेते ही या ‘मोमसची संतान’ आहे. त्यांना आपण सहन केले पाहिजे.
@@AUTHORINFO_V1@@