महिला सक्षमीकरणातूनच राष्ट्राची उन्नती : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत , सोलापूरात उद्योगवर्धिनी संस्थेचा 'परिवार उत्सव' कार्यक्रम संपन्न

    17-Jul-2025   
Total Views |

मुंबई  : "वात्सल्याचे वरदान असलेल्या मातृशक्तीत समाजाच्या उद्धाराचा विचार स्वाभाविकपणे असतो. त्यामुळेच ही शक्ती उभी राहील्यानंतर राष्ट्राची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही", असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या उद्योगवर्धिनी संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे गुरुवार, दि. १७ जुलै रोजी 'परिवार उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

यादरम्यान व्यासपीठावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थेचे सल्लागार राम रेड्डी, सेवाभारतीचे सोलापूर शहराध्यक्ष राजेश पवार, उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा चंद्रिका चौहान आणि सचिव मेधा राजोपाध्ये उपस्थित होते.

महिला उद्धाराचे कार्य करत असल्याचा मोठेपणा पुरुषांनी बाळगू नये, असा सल्ला सरसंघचालकांनी यावेळी दिला. ते म्हणाले, "जे काम महिला करू शकतात ते पुरुष करू शकत नाहीत. त्यामुळे महिलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे काम करण्याची मोकळीक द्यावी. त्यासाठी त्यांना सर्वप्रथम अनिष्ट रूढींच्या जोखडातून मुक्त करावे." सरसंघचालकांनी यावेळी आवाहन केले की, 'सामान्यांच्या असामान्य कर्तृत्वातून उद्योगवर्धिनी संस्था उभी राहिली; संस्थेने स्वतःच्या सक्षमीकरणाबरोबरच आपल्या प्रेरणेतून इतरही ठिकाणी उद्योगवर्धिनीसारख्या संस्था उभ्या कराव्यात.'

कार्यक्रमात उद्योगवर्धिनीवर आधारित 'अखंड यात्रा' हा माहितीपट दाखवण्यात आला. तसेच 'उद्योगवर्धिनी की सेवाव्रती' या नयनबेन जोशी लिखित आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर संपादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना राम रेड्डी म्हणाले, "संघर्षमय जीवन जगणाऱ्या महिलांचे आयुष्य प्रकाशमान करण्याचे कार्य उद्योगवर्धिनी करते. गरजू महिलांचा कौशल्य विकास करत त्यांना उद्योगाच्या आधारे सक्षम करण्याची ही प्रक्रिया आहे. केवळ सोलापूरमधील नव्हे, तर महाराष्ट्रातील महिलांना आधार देणारी संस्था म्हणून उद्योगवर्धिनी उदयास येत आहे."

उद्योगवर्धिनी ही समाजाची आहे, समाजाने त्यात योगदान द्यावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी प्रास्ताविकात केले. त्या म्हणाल्या, "ज्येष्ठ संघ प्रचारक नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही संस्था स्वयंसेवकांच्या मदतीने, सोलापूरकरांच्या सहकार्याने आणि महिलांच्या कष्टावर उभी राहिली आहे. महिला सक्षमीकरणासाठी एक प्रशिक्षण केंद्र उभारण्याची तयारी आहे. त्यासाठी प्रशासनासह समाजाच्या सहकार्याची अपेक्षा आहे." सल्लागार समितीच्या सदस्या डॉ. सुहासनी शहा यांनी परिचय, अपर्णा सहस्त्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन, डॉ. माधवी रायते यांनी आभारप्रदर्शन, तर कल्याणी पाटील आणि ऐश्वर्या सारोळकर यांनी पद्य गायन केले. संस्कृती देशपांडे आणि शिल्पा जिरांकलगी यांनी संपूर्ण वंदे मातरम गायले.

आपलेपणा हीच संघकार्याची प्रेरणा : सरसंघचालक

बिहारच्या दुष्काळामध्ये संघ स्वयंसेवकांनी केलेले काम पाहून जयप्रकाश नारायण भारावून गेले होते. त्यांनी दिल्लीतील एका शिबिराला भेट देत स्वयंसेवकांचा परिचय करून घेतला. तेव्हा त्यांना अनेक दशके संघकाम करणाऱ्या स्वयंसेवकांचा परिचय झाला. जयप्रकाशजींनी 'तुमच्या कामाची प्रेरणा काय?' असा प्रश्न स्वयंसेवकांना विचारला. तेव्हा स्वयंसेवकांनी 'समाजाचे दुःख हीच आमची प्रेरणा' असल्याचे सांगितले. "हा आपलेपणाच संघकार्याची प्रेरणा आहे," अशी आठवण सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितली. आत्मियतेच्या प्रेरणेने होणारे कार्य निरंतर चालते. अहंकार दूर करत सहजतेने समाजातील पीडितांचे दुःख दूर करणे आपले कर्तव्य आहे. सर्व समाजच जर स्वार्थ आणि भेद विसरून असा कार्यरत झाला, तर देशाचे भाग्य बदलेल, असेही ते म्हणाले.



ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक