‘स्वत्व’ जागृत करणारे रामनाम

    दिनांक  31-Jul-2020 22:31:24   
|
Kameshwar chaupal_1  

‘स्वत्व’ जागृत करणारे रामनाम

"येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत रामजन्मभूमीस्थळी भव्य श्रीराम मंदिराचा भूमीपूजन सोहळा संपन्न होत आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, आज मला मोठया ऋणातून मुक्त झाल्याचे समाधान वाटत आहे. श्रीराम मंदिराची उभारणी ही भारताच्या इतिहासातील महत्वाची घटना आहे, रामनामामध्ये भारतीय समाजाचे स्वत्व जागृत करण्याची क्षमता आहे", असे मत १९८९ साली रामजन्मभूमीस्थळी शिलान्यासप्रसंगी पहिली वीट रचणारे कारसेवक कामेश्वर चौपाल यांनी ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केले. मुंबई तरुण भारतचे प्रतिनिधी पार्थ कपोले यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

 
• ‘रामजन्मभूमी आंदोलना’चे नेमके महत्व तुम्ही काय सांगाल ?
 
- स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक महत्वाचे आंदोलन म्हणजे रामजन्मभूमी आंदोलन आहे. या आंदोलनामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की एरवी हिंदू समाज हा शांत असतो, मात्र हिंदू समाजावर, त्याच्या श्रद्धास्थानांवर सातत्याने हल्ले केल्यास तो ते फार काळ सहन करणार नाही. आपली श्रद्धास्थाने अबाधित राखण्यासाठी हिंदू समाज एकदा हट्टाला पेटला की त्याला कोणी थांबवू शकत नाही. मात्र, त्यासाठी हिंदू समाज जागृत होणे अतिशय गरजेचे आहे, रामजन्मभूमी आंदोलनामुळे देशातील हिंदू समाज असाच जागृत झाला. रामजन्मभूमी आंदोलन हे जनआंदोलन बनले होते, मात्र ते आंदोलन हिंदू समाजाने अतिशय शांतपणे चालविले, कारण आक्रमकता हा काही हिंदू समाजाचा स्वभाव नाही. राज्यघटनेचा आणि न्यायव्यवस्थेचा संपूर्ण आदर राखत हिंदूंनी हे आंदोलन हाताळले. अखेर हिंदू समाजाच्या पाचशेहून अधिक वर्षांच्या लढ्यास यश आले आणि न्यायालयाने रामजन्मभूमीवरील हिंदूंचा हक्क मान्य केला. या आंदोलनाचे महत्व केवळ जमिनीचा ताबा मिळण्याएवढेच नाही, तर या आंदोलनामुळे हिंदू धर्म, संस्कृती, श्रद्धास्थाने यांवर सातत्याने आघात करणाऱ्यांना जोरदार चपराक मिळाली. कोणीही यावे आणि हिंदूंना टपली मारून जावे, असा प्रकार रामजन्मभूमी आंदोलनामुळे बंद झाला. हि सर्व किमया रामनामाची आहे असे मी मानतो, आणि म्हणूनच रामनाम आणि रामजन्मभूमी आंदोलन हे हिंदू समाजाचे स्वत्व जागृत करणारे ठरले, असे माझे मत आहे.
 
• रामजन्मभूमीस्थळी शिलान्यासप्रसंगी पहिली वीट तुम्ही रचली, त्याविषयी काय भावना आहे ?
 
- रामजन्मभूमी आंदोलनात मी अगदी सुरूवातीपासून सहभागी होतो. मात्र, शिलान्यासप्रसंगी पहिली वीट माझ्या हस्ते रचली जाईल, असा विचारही मी केला नव्हता. कारण आंदोलनातील आमचे धुरीण म्हणजे अशोक सिंघल, संतससमुदाय यांच्या हस्ते शिलान्यास होईल, अशी आमची सर्वसाधारण धारणा होती. मात्र, त्यानंतर दलित समुदायातील व्यक्तीच्या हस्तेच शिलान्यास करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि संतसमुदायाने निश्चित केले, मात्र त्यासाठी माझी निवड होईल, असे मला कधीही वाटले नव्हते. अखेर, माझ्या हस्ते शिलान्यास संपन्न झाला. मात्र, त्यानंतर दीर्घकाळ माझ्या मनात एकच प्रश्न होता. तो म्हणजे माझ्या हस्ते शिलान्यास तर झाला, मात्र माझ्या हयातीत मंदिर उभे राहिले नाही तर ?. मात्र, आज मंदिराचे भूमिपूजन होत आहे आणि अवघ्या ३ वर्षांत मंदिर उभे राहिल. त्यामुळे आता मला ऋणातून मुक्त झाल्यासारखे वाटत आहे.
 
माझ्यासारख्या दलित व्यक्तीच्या हस्ते शिलान्यास होणे हे प्रभू श्रीरामाच्या रामराज्याच्या कल्पनेस अनुसरूनच होते. त्याचप्रमाणे रामजन्मभूमी आंदोलनाविषयी गैरसमज पसरविणाऱ्यांनाही ती एक चपराक होती. या घटनेचे अवघ्या देशाने स्वागत केले होते, त्यामुळे दलित समाजाच्या मनातही आपलेपणाची भावना निर्माण झाली होती. अर्थात, काही मंडळींनी दलिताच्या हस्ते शिलान्यास करण्यास विरोध केला होताच. त्यामध्ये शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचाही समावेश होता. अर्थात, अशा प्रकारच्या अडथळ्यांना फारसे महत्व न देण्याचे धोरण सुरूवातीपासून आंदोलनाने पाळले आहे.
 
• रामजन्मभूमी आंदोलनामुळे देशात धार्मिक तेढ वाढली या आरोपात तथ्य आहे का ?
 
- रामजन्मभूमी आंदोलन हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते. आपला हक्क मिळविण्यासाठी हिंदू समाजाने उभारलेले ते जनआंदोलन होते. शेकडो वर्षांच्या आक्रमणाविरोधात आलेली ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. मात्र, स्वत:ला धर्मनिरपेक्ष विचारवंत म्हणवणाऱ्यांनी रामजन्मभूमी आंदोलनाची बदनामी करण्याचे काम केले. खरे तर या धर्मनिरपेक्ष विचारवंतांमध्ये सत्य स्विकारण्याची हिंमत नाही आणि सत्य बोलण्याचे धाडस नाही. त्यामुळे या धर्मनिरपेक्ष विचारवंतांनी हिंदू समाज, हिंदूंची श्रद्धास्थाने यावर दीर्घकाळ झालेल्या आक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. रामजन्मभूमी आंदोलनाच्या लढा काही नव्वदीच्या दशकात सुरू झालेला नाही, तो ५०० वर्षांपूर्वीच सुरू झाला होता. त्याला वैचारिक बैठक होती, हिंदूत्वाचा आधार होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र, या आंदोलनामुळे धार्मिक तेढ वाढली, असे मला वाटत नाही. आपला हक्क मिळविण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे तेढ कशी वाढू शकते, याचे उत्तर या विचारवंतांनी द्यायला हवे.
 
विशेष म्हणजे आता भूमिपूजनात सहभागी होण्याची इच्छा अनेक मुस्लिम व्यक्त करती आहेत. निमंत्रण न दिल्यास आम्ही जलसमाधी घेण्याची घोषणा एका मुस्लिम बांधवाने केली आहे तर अन्य एक पवित्र माती घेऊन अयोध्येकडे निघाला आहे. या एकच अर्थ आहे असे मला वाटते तो म्हणजे काही शतकांपूर्वी बळाने धर्मपरिवर्तन झाले असले तरीही ही मंडळी आपले मूळ म्हणजे हिंदू धर्म विसरलेले नाही. राम आणि कृष्ण हे आपले मूळ आहे, याची जाणीव त्यांना या आंदोलनामुळे झाली आहे ही अतिशय महत्वाची बाब असल्याचे मला वाटते.
 
 
• तुम्ही या आंदोलनाशी कसे जोडला गेलात ?, आता तुमची नेमकी भावना काय आहे ?
 
- माझा जन्म बिहारमधल्या तत्कालिन भागलपूर जिल्ह्यामधला. लहानपणापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आलो. महाविद्यालयीन जीवनाच्या कालखंडात म्हणजे साधारणपणे १९८० साली मी विश्व हिंदू परिषदेचे काम करण्यास प्रारंभ केला. विहिंपने १९८४ साली रामजन्मभूमी आंदोलन हाती घेतले, त्यापूर्वी हे आंदोलन संतसमुदाय आणि धर्माचार्य हाताळत होते. यासाठी १९८४ सालीच दिल्लीतील विज्ञान भवनात एक मोठी बैठक झाली, त्यामध्ये संघ, विहिंपचे नेते आणि सुमारे ८०० धर्माचार्य सहभागी झाले होते. त्या बैठकीत जनआंदोलन करण्याचे निश्चित झाले. तेव्हा मी विहिंपच्या संघटनकार्यात सक्रिय होतो. आम्ही मिथिला ते अयोध्या अशी राम-जानकी रथ यात्रा सर्वप्रथम काढली, त्याच्या आयोजनात माझा सक्रिय सहभाग होता. अयोध्येत रथयात्रा पोहोचली असता तेथे जवळपास ५ लाख लोकांच्या उपस्थितीत श्रीरामजन्मभूमी मुक्त करण्याचा संकल्प घेण्यात आला. तेव्हापासून मी आंदोलनाशी जोडला गेलो आणि ते माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनले.
त्यानंतर या आंदोलनाने संपूर्ण देशभरात एक चैतन्य निर्माण झाले. त्यातच शाहबानो प्रकरणात राजीव गांधी सरकारने कचखाऊ भूमिका घेतली, त्यामुळे हिंदू समाज अधिकच एकजूट झाला. त्यानंतर मग नोव्हेंब८ १९८९ मध्ये शिलान्यास झाला. भारतीय जनता पक्षदेखील मग या आंदोलनात सहभागी झाला. त्यानंतर डिसेंबर १९९२ साली हिंदू समाजाने रामजन्मभूमी मुक्त केली. तेव्हापासूनचा प्रवास मी जगलो आहे, त्यामुळे ज्या स्वप्नासाठी आपण कार्यरत होते ते पूर्ण होताना माझ्या भावना शब्दात मांडता येणार नाहीत.
 
• भूमिपूजनाला काही मंडळींकडून विरोध होत आहे, त्याबद्दल काय सांगाल ?
 
- रामजन्मभूमी आंदोलनास प्रारंभ झाला, तेव्हापासून त्याला विरोध होत आहे. त्यामध्ये सर्वाधिक विरोध हा आपला स्वार्थ साधण्यासाठी टपून बसलेल्या राजकीय मंडळींचा होता. शिलान्यास, जन्मभूमीस्थळाचे कुलूप उघडणे, रथयात्रा काढणे अशा प्रत्येक टप्प्यावर विरोध झाला. एवढेच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकालही अनेकांना रुचलेला नाही. यातला एक योगायोग सांगणे मला आवश्यक वाटते- ऑगस्ट, १९९० साली बद्रिनाथ धाम येथे प्रथम शिलापूजन झाले होते. द्वारका शारदापीठ आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी तेव्हा मुहूर्ताचा वाद निर्माण केला होता. आताही ऑगस्ट महिन्यातच होणाऱ्या भूमिपूजनाला विरोध करतानाही त्यांना मुहूर्ताचाच वाद निर्माण केला आहे. स्वरूपानंद सरस्वती यांनी नेहमीच हिंदू जनमताच्या प्रवाहाच्या विरुद्ध भूमिका घेतली आहे.
 
मात्र, आता रामजन्मभूमीस्थळी भव्य मंदिर उभारणीचे स्वप्न साकार होत आहे. त्याचप्रमाणे डॉ. हेडगेवार यांनी पाहिलेले समर्थ हिंदूराष्ट्राचेही स्वप्न पूर्ण होईल, याची मला खात्री वाटते. श्रीराममंदिराच्या उभारणीस प्रारंभ होणे हा त्याचा शुभसंकेत आहे, असेच मी मानतो.
 
 
• कामेश्वर चौपाल यांचा परिचय
 
कामेश्वर चौपाल यांचा जन्म बिहारमधील तत्कालीन भागलपूर जिल्ह्यात झाला. शालेय जीवनापासून ते रा. स्व. संघाच्या संपर्कात आले. रा. स्व. संघात त्यांनी विस्तारक, जिल्हा प्रचारक अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या, त्यानंतर विहिंपच्या संघटनकार्यात ते सहभागी झाले. रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान त्यांच्याकडे बिहार विहिंप सहसंघटन मंत्री अशी जबाबदारी होती. काही काळ ते भाजपकडून राजकारणातही सक्रिय होते. ते भाजप प्रदेश संघटनमंत्री, प्रदेश महामंत्री, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य होते. त्याचप्रमाणे २००२ साली ते बिहार विधानपरिषदेचेही सदस्य होते. सध्या ते विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय टोली- संपर्क विभागाचे सदस्य आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.