बुद्ध हसतो आहे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2020   
Total Views |
pak_1  H x W: 0


पाकिस्तानाच्या नापाक हरकती थांबायला तयार नाहीत. ‘जशास तसे’ उत्तर देणारे भारत सरकार लाभल्यामुळे पाकिस्तान बावचळला आहे. अतिरेकी हल्ले, घुसखोरी याचा सडेतोड समाचार घेणारे मोदी सरकार आहे म्हणून आपण निश्चिंत आहोत. पण, पाकिस्तानने आता सुरू केलेल्या दुष्कृत्यांना जशास तसे उत्तर तरी कसे द्यायचे? गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात पाकिस्तानकडून आता बुद्धाच्या वारशाची नासधूस सुरू आहे. सगळ्या जगाला शांती आणि अहिंसेचे धडे देणारा बुद्ध युद्धपिपासू पाकिस्तानला कधीच पटणार नाही. किंबहुना, पाकिस्तानला बुद्ध नको आहे. मात्र, त्याकरिता ऐतिहासिक वारसा पुसण्याचा उद्योग चालवून पाकिस्तान नेमका कोणता संदेश देऊ इच्छितो? भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. लवकरात लवकर पाकव्याप्त काश्मीर रिकामा करून भारताला परत करा, अस सज्जड दमही भरला आहे. यानंतर आपण नागरिक म्हणून केंद्र सरकारचे आभार मानायला हवे. भारतात एका विशिष्ट समुदायाला वाचविण्यासाठी भेंडी बाजारातही एक बॉम्बस्फोट झाला आहे, असे खोटं सांगणारे राज्यकर्ते होऊन गेलेत. त्यामुळे गिलगिट-बाल्टिस्तानमधील ऐतिहासिक बुद्ध अवशेष नष्ट केले जात आहेत. यावर सरकारने कधी भूमिकाच घेतली नसती. भारत सरकार याबाबत ठोस भूमिका घेते, हेच आपले सौभाग्य.

प्राचीन हिंदू संस्कृतीचे पुरातत्त्वीय अवशेष पाकिस्तानात आहेत. हडप्पा या जगप्रसिद्ध नागरी संस्कृतीचे अवशेष जिथे सापडले ते ठिकाणही सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. पाकिस्तानने घुसखोरी करून कब्जा केलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानात बुद्धकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत. कारगह बुद्ध हे त्या ठिकाणचे नाव. रावी नदीच्या तीरावर हे अवशेष आढळले. तिथे बुद्धाची एक दगडात कोरलेली विशालकाय मूर्ती आहे. गिलगिट शहराच्या पश्चिमेकडे हे ठिकाण आहे. तिसर्‍या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत गिलगिट हे बौद्ध धर्माचे केंद्र होते. अकराव्या शतकात इस्लामिक आक्रमणे भारतात त्याच दिशेने येत होती. तेव्हा गिलगिट प्रदेशातील बौद्ध धर्माचा प्रभाव नष्ट झाला असावा, असे म्हणायला हरकत नाही. याच भागात तीन बौद्ध स्तुपांचा १९३१च्या दरम्यान शोध लागला. त्यावर संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख आढळले. कारगह बुद्ध हा भारताच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे. भारतात उगम पावलेला बौद्ध धर्म आणि बुद्धविचार किती प्रभावशाली होता, याचेच दाखले असे ऐतिहासिक अवशेष देत असतात. पाकिस्तानला ही सांस्कृतिक मूल्ये नको आहेत. भू-राजकारणाच्या हेतूने पाकिस्तान या कुरबुरी करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.


गिलगिट-बाल्टिस्तान या भागावर पाकिस्तानने अवैध कब्जा केलेला आहे, हे सर्वश्रुत आहे. सध्या पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्‍या भूप्रदेशाचा हा एक भाग आहे. भारताने काश्मीरच्या बाबतीत कडक निर्णय घेऊन वर्ष पूर्ण झालेले नाही. काश्मीरचा विशेष दर्जा हटविणे असो, फुटीरतावादी शक्तींना यमसदनी धाडण्याचे जाहीर कार्यक्रम, भारत सरकारच्या या अशा धोरणांचाच परिणाम म्हणून पाकिस्तान अवैध कब्जा केलेल्या काश्मीरविषयी चिंताग्रस्त असावा. तसेच काश्मीरमध्ये प्रायोजित अतिरेकी कारवाया करणे आता पाकिस्तानला अशक्यप्राय झालेले आहे. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाक कोणतीही भूमिका घेऊ शकलेला नाही. काश्मीरच्या बाबतीत भारत सरकार एकापाठोपाठ एक बेधडक निर्णय घेताना पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी कोंडी करण्यात आली होती. गिलगिट-बाल्टिस्तान आता आपल्या ताब्यात अल्पकाळ आहे, अशी भीती पाकिस्तानला वाटत असावी. कारण, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वात वर्षानूवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न निकाली निघाले आहेत. त्यातही असे अनेक वादग्रस्त प्रश्न होते, ज्याविषयी भारतातील राज्यकर्ते कायम भयगंडाने ग्रासले होते. पाकव्याप्त काश्मीर हा असाच एक प्रश्न. भारत सरकार आता याबाबत कधी कारवाई करेल आणि आपल्याला या भागाचा कब्जा सोडावा लागेल, याचा पाकिस्तानला मागमूस नाही. त्यामुळे भारताच्या संस्कृतीच्या छटा पुसण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू झाला आहे. ऐतिहासिक अवशेष भूभागाच्या संस्कृतीची साक्ष देतात. संबंधित भूभागावर अवैध अधिकार सांगताना असे ऐतिहासिक अवशेष अडसर ठरतात. पाकिस्तानने पुरातन बौद्ध अवशेषावर हल्ले चढवून हा वारसा पुसण्याला सुरुवात केली आहे. मात्र, अहिंसेच्या मूर्तस्वरूप बुद्धाच्या रक्षणार्थ भारत सरकार आहे व त्याला दुष्टांच्या हिंसेचे वावडे नाही, हे पाकिस्तानने ध्यानात ठेवावे.


@@AUTHORINFO_V1@@