जागतिक सागरी कासव दिन; जाळ्यात अडकलेल्या कासवासाठी मच्छीमार आणि कासवमित्र ठरले देवदूत

    16-Jun-2020
Total Views | 192

turtle _1  H x

 

 

आज 'वेळास' किनाऱ्यावरची घटना

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - निसर्ग चक्रीवादळाने उद्दध्वस्त झालेल्या वेळास गावाच्या किनाऱ्यावर जाळ्यात अडकलेले सागरी कासव आज वाहून आले होते. मच्छीमारांच्या प्रसगांवधानामुळे कासवमित्रांनी या कासवाची जाळ्यातून सुखरुप सुटका केली आणि त्याला पुन्हा समुद्रात सोडले. आजच्या 'जागतिक सागरी कासव दिनी' कासवमित्र आणि मच्छीमारांनी या कासवाला जीवदान दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

 
 

turtle _1  H x  
 
 

मच्छीमारांकडून समुद्रात अनावधाने सुटलेली जाळी सागरी जीवांसाठी घातक ठरतात. समुद्राच्या प्रवाहासोबत वाहत जाणाऱ्या या जाळ्यांमध्ये बऱ्याचदा समुद्री कासवे किंवा डाॅल्फिन, पाॅरपाईजसारखे सागरी सस्तन प्राणी अडकतात. त्यातून स्वत:ची सुटका करुन घेण्याच्या झटापटीत बऱ्याचदा त्यांचा जीव जातो. अशा जाळ्यांना 'घोस्ट नेट' म्हटले जाते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खवळलेल्या समुद्रामुळे जाळ्यात अडकलेले हे जीव किनाऱ्यावर वाहून येतात. असेच जाळ्यात अडकलेले एक सागरी कासव आज संध्याकाळी मंडणगड तालुक्यातील वेळासच्या किनाऱ्यावर वाहून आले होते. किनाऱ्यालगत मासेमारी करणारे मच्छीमार फिरोज दाभिळकर यांना हे कासव दिसले. त्यांनी प्रसंगावधान राखून याची माहिती कासवमित्र मोहन उपाध्ये यांना दिली. उपाध्ये यांनी लागलीच जाळे कापून त्याची पुन्हा समुद्रात सुटका केली.

 

 
turtle _1  H x
 
 
वेळास हे गाव 'कासवांचे गाव' म्हणून पसिद्ध आहे. कारण, दरवर्षी वेळासच्या किनाऱ्यावर समुद्री कासवाच्या माद्या विणीसाठी येतात. काही दिवसांपूर्वीच कोकण किनारपट्टीला धडकलेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाचा फटका वेळास गावाला बसला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही या गावचे रहिवासी असलेल्या उपाध्ये आणि दाभिळकर यांनी कासवाची सुखरुप सुटका केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. हे कासव 'आॅलिव्ह रिडले' प्रजातीचे मादी कासव असल्याची माहिती उपाध्ये यांनी 'महा MTB'शी बोलताना दिली. ते साधारण अडीज फूटाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मोहन उपाध्ये हे प्रसिद्ध कासवमित्र असून सागरी कासव संवर्धन क्षेत्रात त्यांचा गाढा अनुभव आहे. राज्य कांदळवन कक्षाच्या 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या संशोधन विभागात ते सध्या कार्यरत आहेत. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121